Wednesday, 7 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कालपासून कडक निर्बंध लागू; व्यापार बंद - मात्र रस्त्यावर गर्दी कायम.

·      राज्यात ५५ हजार ४६९ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ९१ जणांचा मृत्यू तर पाच हजार ४४५ बाधित.

·      देशात कोविड लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर.

·      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त घरातूनच अभिवादन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन.

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘परीक्षा पे’ चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार.

·      राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या.

·      औरंगाबादच्या मौलाना आझाद शिक्षण न्यास तसंच संस्थेच्या अध्यक्ष शिक्षण तज्ञ, पत्रकार पद्मश्री डॉक्टर फातिमा झकेरिया यांचं निधन.

आणि

·      परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड.

****

राज्यात वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कालपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. काल पहिल्या दिवशी राज्यातल्या अनेक शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळला, मात्र दुकानं बंद असतानाही रस्त्यावरील नेहमीची गर्दी कायम होती. राजधानी मुंबईत मात्र कालही नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली.

दरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असल्यानं, अनेक जिल्ह्यांमध्ये व्यापाऱ्यांनी ‘ब्रेक द चेन’ अभियानाला विरोध केला.

आज आणि उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटून त्यांच्या समोर व्यापाऱ्यांची कैफीयत मांडण्यात येईल आणि उद्या सायंकाळ पर्यंत राज्य शासनानं निर्णय न बदलल्यास शुक्रवारी राज्यातले सर्व व्यापारी दुकानं सुरू करतील असा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं घेतला आहे. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या सर्व व्यापाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेलं ब्रेक द चेनचं धोरण प्रत्यक्षात व्यापाराला आळा घालणारं असून, व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता असा निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण झाली असल्याचं, मंडलेचा यावेळी म्हणाले.

 

नांदेड जिल्ह्यातल्या टाळेबंदीला वंचित बहुजन आघाडी पक्षानं विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, शहरात दोन जम्बो कोविड रुग्णालयं सुरू करावीत, खाजगी रुग्णालयात ५० टक्के खाटा सर्वसामान्यांसाठी आरक्षित ठेवाव्यात, या आणि अन्य मागण्यांचं निवेदन, आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना सादर केलं. मागण्या मान्य न केल्यास ११ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

 

औरंगाबाद शहरात लहान मोठ्या व्यापारी तसंच व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात केणेकर यांनी, टाळेबंदीला व्यापारी वर्गाचा विरोध असल्याचं सांगितलं. प्रशासनाच्या सर्व नियम आणि अटींचं पालन करून व्यवसाय करण्याचं आश्वासन व्यापारी वर्गानं दिल्याचं, केणेकर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 

बुलडाणा शहरात राज्य शासनाच्या वतीनं लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी विरोधात, काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. व्यापारी बांधवांनीही यावेळी रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली, तसंच दुकानं बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. सिंदखेडराजा इथं सर्व व्यावसायिकांनी टाळेबंदी विरोधात तहसीलदार तसंच मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं, मॉल, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल जारी केले. केशकर्तनालय, ब्युटीपार्लर बंद ठेवण्याबाबत या आदेशात नमूद आहे. सरकारी कार्यालयं, सहकारी संस्था, खाजगी उद्योग, बांधकाम क्षेत्र, कारखाने याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी तसंच कामगारांसाठी, नियमावली लागू करण्यात आली असून, आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ३० एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

****

राज्यात काल ५५ हजार ४६९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३० लाख ६३ हजार ४४३ झाली आहे. काल २९७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५६ हजार ३३० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे. काल ३४ हजार २५६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २५ लाख ८३ हजार ३३१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८२ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात चार लाख ७२ हजार २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार ४४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९१ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३०, नांदेड जिल्ह्यातल्या २३, बीड दहा, परभणी नऊ, उस्मानाबाद आठ, जालना पाच, तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ३३७ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ६२, लातूर ९२५, बीड ७१६, परभणी ४३६, जालना ४२५, उस्मानाबाद ४१५, तर हिंगोली जिल्ह्यात १२९ नवे रुग्ण आढळून आले.

****

नांदेड जिल्ह्यात २०० खाटांचं तात्पुरत्या स्वरूपात जंबो कोविड सेंटर उभारलं जात असून, इथे कृत्रिम प्राणवायूच्या सुविधेसह, कोविड-१९ आजाराच्या इतर उपचार सुविधा उपलब्ध असतील. जिल्ह्यातल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. दरम्यान, जिल्ह्यातल्या सर्व हॉटेल चालक, अन्न पदार्थ उत्पादक-वितरक विक्रेत्यांना, आणि अशा व्यवसायाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व कामगार तसंच मालकांना, कोविड-19 ची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. अन्न आणि औषध विभागाचे सहायक आयुक्त प्र.म.काळे यांनी ही माहिती दिली

****

देशात सुरू असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनानं लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत कुंटे बोलत होते.

राज्यात आतापर्यंत ऐंशी लाखांहून जास्त नागरिकांनी लस घेतली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्याला आतापर्यंत कोविड लसीच्या एक कोटी सहा लाख मात्रा प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ८८ लाख मात्रांचा वापर झाला आहे. राज्यात लस वाया जाण्याचं प्रमाण तीन टक्के एवढं आहे. सोमवारपर्यंत राज्यात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.

****

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या यंदा कोविड पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता, त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. व्यावसायिकांना विक्रीसाठी दुकानं उघडी ठेवण्याची येत्या दोन ते तीन दिवसात परवानगी द्यावी, टाळेबंदीच्या काळातील वीज देयक सरसकट माफ करावं, शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात यावा, आदी मागण्याही ठाकरे यांनी केल्या.

****

राज्यात शिवभोजन थाळी आता पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल याबाबतचे आदेश दिले. मात्र पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. राज्यात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

राज्यात कोविड-19चा मोठ्या प्रमाणात झालेला संसर्ग लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. राज्यातल्या वैद्यकीय पदवी अभ्याक्रमाच्या अंतिम सत्राची परीक्षा येत्या २० एप्रिलला संपणार आहे, या परीक्षेचा निकाल तातडीनं लावून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सेवा इंटर्नशीपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध नर्सिंग कॉलेजमधल्या जी एन एम आणि ए एन एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या १५ हजार परिचारिकांच्या नोंदणीचं काम तातडीनं पूर्ण करुन, त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तिसावी जयंती परंपरेनुसार पूर्ण सन्मानानं साजरी केली जावी, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, गर्दी न करता, घरातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. चैत्यभूमी इथल्या स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा, तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी, योग्य सुविधा देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचं पालन केलं जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्य सरकारनं काल याबाबतचे आदेश जारी केले. राज्यस्तरीय शिखर संस्था, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी सूत गिरण्या, पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संस्था, सहकारी रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था, खरेदी विक्री संघ आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचा यात समावेश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सात एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आज सायंकाळी सात वाजता ऑनलाईन स्वरुपात आयोजित केला जाणार आहे. परीक्षेचा ताणतणाव घालवण्यासंदर्भात या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल, असं पंतप्रधानांनी एका ट्विट मध्ये म्हटलं आहे.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राज्य सरकारच्या अखत्यारितल्या तपास यंत्रणेची बाजू ऐकून न घेताच त्रयस्थ तपास यंत्रणेला चौकशीचे अधिकार देणं, हे राज्याच्या अधिकारावर गदा असल्याचं, राज्य सरकारनं म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनीही स्वतंत्रपणे उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उच्च न्यायालयानं बाजू ऐकून न घेताच चौकशीचे आदेश दिले, हा एक नागरिक म्हणून वैयक्तिक अधिकाराचा भंग असल्याचं मत, त्यांनी व्यक्त केलं.

****

दिलीप वळसे पाटील यांनी काल राज्याच्या गृहमंत्री पदाची सूत्रं स्वीकारली. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही याची काळजी घेऊ, असं वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. आगामी काळात विविध सण उत्सव येत असल्यानं, प्रत्येक धर्मियांच्या दृष्टीने हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी आव्हानात्मक परिस्थिती उभी असल्याचंही, ते म्हणाले.

****

मौलाना आझाद शिक्षण न्यास तसंच संस्थेच्या अध्यक्ष शिक्षण तज्ञ, पत्रकार पद्मश्री डॉक्टर फातिमा झकेरिया, यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. ताज मासिकाच्या संपादक म्हणून कार्यरत असलेल्या झकेरिया यांनी, १९७० साली टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातून पत्रकारितेला प्रारंभ केला. हॉटेल व्यवस्थापन न्यासाच्या ‘बोर्ड ऑफ गर्व्हनर’वर उपाध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत होत्या. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातल्या योगदानासाठी, २००६ साली त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरवलं होतं. पत्रकारितेतल्या योगदानासाठी १९८३ साली त्यांना सरोजिनी नायडू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. झकेरिया यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार सुरेश वरपुडकर यांची, तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विरोधी गटाकडून दिलेल्या मुदतीत एकही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी, ही बिनविरोध निवडीची घोषणा केली असल्याचं सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत, ७२० गावं आणि २७३ वाड्यांवर नळाद्वारे पाणी पोहचवण्यासाठी, ३७३ कोटी १० लाख रूपयांचा आराखडा मंजुर करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २५५ गावांत वाढीव पाणी टाकी बांधण्यात येणार आहेत, तर ३२ गावांत पहिल्यांदाच पाणी पुरवठा योजना राबवण्यात येत आहे.

****

अॅथलेटिक्स फेडेरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं घेण्यात आलेल्या तांत्रिक अधिकारीच्या पंच परीक्षेत, औरंगाबादच्या डॉ.पूनम राठोड या उत्तीर्ण झाल्या आहेत. डॉ.पूनम राठोड ह्या अॅथलेटिक्सच्या राष्ट्रीय खेळाडू असून, सरस्वती भुवन महाविद्यालयात क्रीडा शिक्षक आहेत. देशभरात ऑनलाइन लेखी आणि प्रात्यक्षिक पद्धतीनं घेण्यात आलेल्या या पंच परीक्षेत, औरंगाबादमधून उत्तीर्ण झालेल्या त्या एकमेव विद्यार्थी आहेत. 

****

परभणी जिल्ह्यात सेलू शहरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं काल दुपारी वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमालासह दोन जणांना ताब्यात घेतलं.

****

No comments:

Post a Comment