Thursday, 8 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 08.04.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 08 April 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत लसीकरण अभियानावर चर्चा होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था -एम्स इथं कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला पराजित करण्यासाठी असलेल्या काही उपायांपैकी लसीकरण एक आहे, आपण जर लसीकरणास पात्र असाल तर कोविड डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज मुंबईत जे जे रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.

****

महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली या राज्यांना कोविड लसीकरण वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव मनोहर अगनानी यांनी या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राला लसीच्या एक कोटी सहा लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या, त्यापैकी ९० लाख ५३ हजार मात्रा वापरण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाच्या कार्यक्रमात सुधारणा करणं आवश्यक असल्याचं, गगनानी यांनी म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कामगारांनी स्थलांतर करु नये, तसंच अफवांना बळी पडू नये, असं आवाहन कामगार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत राज्यातले कारखाने, उद्योग तसंच असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत, याची संपूर्ण दक्षता आणि काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत असल्याचं, मुश्रीफ म्हणाले.

****

कोविड-19 साथीशी समर्थपणे लढा देऊ, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी, काल वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आढावा बैठकीत व्यक्त केला. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्यानं, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा असून, केंद्रीय संस्थांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्यानं, ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. तसंच वैद्यकीय शिक्षण प्रणालीत येणाऱ्या संस्था, होमिओपॅथी, नर्सिंग अशा विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम आणि विद्यालयंही, टाळेबंदीतून वगळण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

मनसुख हिरेन कथित हत्या प्रकरणी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या, राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएच्या विशेष पोलीस कोठडीत, उद्यापर्यंत वाढ केली आहे. त्याचबरोबर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी, केंद्रीय अन्वेषण संस्थेला वाझे याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. या बाबतीत सीबीआयनं एनआयएशी समन्वयानं काम करावं, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामापंचायतींनी, ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांचे वार्षिक आर्थिक अभिलेखे ऑनलाईन करुन, राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी, सर्व अधिकारी कर्मचार्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

नांदेड शहरात खाजगी वैद्यकीय क्षेत्राकडून सर्व सामान्य रुग्णांची होत असलेली आर्थिक लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीनं काल या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

नोकरीत कायम करण्यासह विविध मागण्यांसाठी, औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातल्या कोविड योद्ध्यांचं साखळी उपोषण, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसंच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्या आश्वासनानंतर, स्थगित करण्यात आलं. आयटक या कामगार संघटनेकडून ही माहिती देण्यात आली. न्याय्य मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी कोविड योध्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मात्र सुरुच राहणार असल्याचं, आयटकनं स्पष्ट केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात शिधापत्रिकेवर वाटप होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचं वाटप थांबवण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाने दिले आहेत. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

****

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १५ एप्रिलपासून राज्यभर शासकीय काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कंत्राटदारांची प्रलंबित देयकं देण्यात यावीत, कामासाठी निधीची तरतूद करावी, कागदपत्र मंजुरीच्या जाचक अटी बदलाव्यात, अश्या मागण्या महासंघानं केल्या आहेत.

****

लातूर इथल्या दयानंद कला महाविद्यालयात कार्यरत ४५ वर्ष वयावरील प्राध्यापक तसंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सपत्नीक लसीकरण करून घेतलं. महाविद्यालयातल्या प्राध्यापक तसंच कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

****

No comments:

Post a Comment