Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09
April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ एप्रिल २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशात आतापर्यंत नऊ कोटी ४३ लाख नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. काल देशभरात
३६ लाख ९१ हजार नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, देशात काल नव्या एक लाख ३१ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर ७८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशभरातल्या कोविड बाधितांची
एकूण संख्या, एक कोटी ३० लाखांहून अधिक झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, एक लाख
६७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ६१ हजार रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत,
एक कोटी १९ लाख रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या जवळपास नऊ लाख ७९ हजार
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
राज्य लोकसेवा आयोग - एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. राज ठाकरे
यांनी मुख्यमंत्र्यांशी आज फोनवरून संवाद साधल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर
यांनी दिली. राज्याच्या विविध भागातून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे राज ठाकरे यांना
फोन आले, काही विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना परीक्षेला
बसता येणार नाही. ही बाब राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्याची
माहिती, बाळा नांदगावकर यांनी दिली.
****
रस्ते निर्मिती प्रक्रियेत सिमेंट आणि लोखंड याला पर्यायी स्वरूप देवून मृद संधारण
पद्धतीचा सुयोग्य वापर केला जाईल, तसंच पर्यावरणपूरक दळणवळण प्रणाली राबवली जाईल, असं
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – ‘निरीच्या’ ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान आत्मसात करावं,
यासाठी सामाजिक संपर्क माध्यमांचा अधिकाधिक वापर व्हावा, असं त्यांनी सूचवलं. ई-वाहन
हे आपलं भविष्य असून त्याबद्दल जनजागृती करावी, यातलं नवं संशोधन लोकापर्यंत पोहचवत
रहावं, असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं.
****
कोविड उपचारासाठी वापरात येणारे रेमडीसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या
दोन जणांना, काल परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ.कुंडेटकर यांनी रंगेहात पकडलं. हाके मेडिकलचा
चालक विजय हाके आणि दलाल अंधारे अशी या दोघांची नावं असून, न्यायालयानं त्यांना १५
एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथंही रेमडेसीवीर साठ्याबाबत अनिश्चितता आढळलेल्या
पाच औषधी दुकानांवर कारवाई करण्यात आली. नाशिक शहरासह जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शनची
टंचाई जाणवत असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल मालेगाव इथं
या औषध दुकानांना अचानक भेट दिली असता, या दुकानांमध्ये बिलेही संशयास्पद असल्यानं
त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, या आजारात गंभीर होणाऱ्या
रूग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नांदेड शहरास दहा हजार रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा
करण्यात यावा, अशी मागणी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर
यांनी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. टोपे यांनी ही मागणी मान्य केल्याची
माहिती, कल्याणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या मंगल सावंगी इथले काँग्रेस पक्षाचे नेते
मल्हारराव वाघमारे यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. वाघमारे
हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, कंधार तालुका पंचायत समितीचे
माजी उपसभापती, तसंच मंगलसांगवीचे माजी सरपंच होते.
****
नांदेड - पनवेल ही विशेष रेल्वे ३१ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या
भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणचे काम सुरु असल्यामुळे ही रेल्वे
रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वे जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****
‘इंडियन प्रीमिअर लीग – आयपीएल’च्या १४ व्या स्पर्धेला आजपासून सुरवात होत आहे.
यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद या
सहा ठिकाणी होणार आहेत. पहिला सामना सध्याचा विजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर
बंगळुरू या दोन संघात चेन्नई इथं होणार असून, विजेतेपदाचा सामना ३० मे रोजी अहमदाबाद
इथं होणार आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये
आयोजित करण्यात आली होती. या वर्षीही या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेचं
आयोजन संबंधित सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीत केलं जाणार आहे.
****
सांगलीत जमावबंदी आदेश झुगारून बेकायदा मोर्चा काढल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा
दाखल करण्यात आला. राज्य शासनाच्या कडक निर्बंधांच्या विरोधात सांगली शहरातल्या व्यापाऱ्यांनी
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला होता.
****
No comments:
Post a Comment