Tuesday, 13 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.04.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 April 2021

Time 7.10AM to 7.25AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ एप्रिल २०२१ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कोविड परिस्थिती लक्षात घेऊन नवीन तारखा जाहीर होणार.

·      जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी.

·      रशियात संशोधित झालेली कोरोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक-वी’ च्या आपत्कालीन वापराला भारतात परवानगी.

·      राज्यात ५१ हजार ७५१ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ८७ जणांचा मृत्यू तर सात हजार ६०१ बाधित.

·      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उद्याची जयंती साधेपणानं, घरीच राहून ऑनलाईन साजरी करण्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन.

आणि

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उद्या सीबीआयकडून चौकशी.

****

राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली. त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या –

दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत, त्या पुढे ढकलण्या संदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे. दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि बारावीची परीक्षा ही मे च्या शेवटी होईल, की जेणेकरुन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये. सर्व लोकप्रतिनीधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, टीसीएस यांनी सुध्दा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या त्या आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्या. राज्यशासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डांनी स्वीकारावा, असं सुध्दा आता हे त्यांना सांगण्यात येईल.

विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध राजकीय संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांशी चर्चेनंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केंब्रीज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे.

 

दरम्यान, दहावी बारावी परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढे भारतीच तंत्रज्ञान संस्था- आय. आय. टी, संयुक्त प्रवेश परीक्षा- जेईई, राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा- नीट वगैरे परीक्षा देऊन इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचे असतात हे लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेचं नियोजन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. परीक्षेसंदर्भात सुनियोजित कार्यप्रणाली शालेय शिक्षण विभागाने निश्चित करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी, परीक्षेसाठी मोठे हॉल शोधले जावेत, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसवावं, परीक्षा केंद्राची, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याकडे लक्ष देण्यात यावं, अतिरिक्त मनुष्यबळाचं नियोजन करण्यात यावं, परीक्षा यंत्रणेतील सर्वांचं लसीकरण करून घ्यावं, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या दोन्ही परीक्षांचं नवीन वेळापत्रक राज्यातली कोविडची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन जाहीर केलं जाणार आहे.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी, काल नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची सरकारची भूमिका नाही. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून, परीक्षा घेण्यासंदर्भातला निर्णय पुढील ७२ तासांत घेऊ, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातील, असं देशमुख यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलं.

****

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे, राज्यातली कोरोनास्थिती आणि प्रतिबंधक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ तसंच वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही पवार यांनी केली. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे असून याकाळात रुग्णखाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

****

रशियात संशोधित झालेली कोरोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक-वी’ च्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध महानियंत्रक - डीसीजीएनं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता कोविड प्रतिबंधासाठी देशात तिसरी लस उपलब्ध होईल. भारतात या लसीची वैद्यकीय चाचणी हैदराबाद इथली डॉ रेड्डीज प्रयोगशाळा करत आहे. भारतीय औषध महानियंत्रकांनी स्पुटनिक-वी ही लस कोविड प्रतिबंधासाठी ९१ पूर्णांक ६ दशांश टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

****

राज्यात काल ५१ हजार ७५१ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६ झाली आहे. काल २५८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५८ हजार २४५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला आहे. काल ५२ हजार ३१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८१ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ६४ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ६०१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ८७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २३, नांदेड जिल्ह्यातल्या २६, परभणी १५, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ५, लातूर ०६, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ४९२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ७९८, लातूर १ हजार ३३९, परभणी ५३२, बीड ७०३, जालना ७६८, उस्मानाबाद ६८०, तर हिंगोली जिल्ह्यात २८९ नवे रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सर्व उपचार सुविधांसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोरोना चाचण्यांची दोन नवीन यंत्रं प्रशासनाला प्राप्त झाली असून, आणखी एक यंत्र मिळणार आहे. त्यामुळे आता दररोज दहा हजारांच्यावर चाचण्या करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्ह्यात वीस हजार ५१० रुग्णखाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

बीड जिल्ह्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन ऑक्सिजन पुरवठा, वाढीव रुग्णखाटा, यासह विविध बाबींवर सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडणार नाही, सर्व अत्यावश्यक औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध असेल, सध्या असलेल्या दोन हजार ८०० रुग्णखाटांशिवाय आणखी साडेआठशे खाटा नव्याने उपलब्ध होणार असल्याचं, मुंढे यांनी सांगितलं. नागरिकांनी कोविड त्रिसूत्रीचं पालन करावं, तसंच गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नये, असं आवाहन पालकमंत्री मुंढे यांनी केलं.

****

नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता कोव्हिड लसीकरण करून घ्यावं, उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारच्या लस सुरक्षित आहेत असं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या वतीनं कोविड-19 लसीकरण तसंच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियानाच्या उदघाटन प्रसंगी काल ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात पुढील २० दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी काल ‘ब्रेक द चेन’ला विरोध करत दुकाने सुरु केली. मात्र, पोलिस प्रशासनानं ही दुकाने पुन्हा बंद करायला लावली. येत्या एक दोन दिवसात संपूर्ण टाळेबंदी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्यात आली होती, टाळेबंदी लावण्यापूर्वी शासनानं व्यापारी वर्गाला वेळ द्यावा. १०० टक्के टाळेबंदी लावावी, ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारही पूर्ण बंद करण्यात यावे अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केली आहे.

****

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू कालगणनेनुसार आजपासून शालिवाहन शके १९४३ ला प्रारंभ होत आहे. घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं उल्हासात स्वागत केलं जातं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणूवर मात करून आरोग्याची गुढी उभारू या असं ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक ती त्रिसूत्री पाळत कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून आज घरीच राहून सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या साजरी होणारी जयंती यंदा गर्दी न करता, साधेपणानं, घरीच राहून ऑनलाईन अभिवादन करून साजरी करावी, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. चैत्यभूमी वर गर्दी न करता, शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करावं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

‘चैत्यभूमीचं लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करावं. इथला स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. या स्तुपाची दुरुस्ती तातडीनं झाली पाहिजे असं आठवले यांनी म्हटलं आहे.

****

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही नागरिकांना उद्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोविड नियम पाळून साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

१४ एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मागच्या वर्षभरामधे आपण महामानवांची, महापुरूषांची जयंती, उत्सव, यात्रा आपले सण हे सर्व अतिशय निर्बंधामधे पाळले. त्याच निर्बंधात, त्याच नियमामधे सुध्दा आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे. या ठिकाणी कोविडच्या संदर्भामधे कोविडच्या नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करावं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यासंदर्भात विविध ठिकाणी शांतता समितीची बैठक घेण्यात येत आहे. काल वैजापूर तालुक्यातल्या शिऊर आणि वीरगाव इथं शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

****

मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान महिन्यात तरावीहच्या विशेष प्रार्थनेसाठी टाळेबंदीतून सूट देण्याची मागणी जमियत उलमा ए हिंद या समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तहसील कार्यालयात याबाबतचं निवेदन देण्यात आलं. उद्यापासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्यात दररोज रात्री आठ वाजेनंतर तरावीह ही विशेष प्रार्थना केली जाते.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर काल पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट संदेशाद्वारे सांगितलं आहे. 

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं त्यांना उद्या बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली आहे.  

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या रेल्वे उड्डाण पुलाचं काम तत्काळ पूर्ण करावं, या मागणीसाठी गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी काल परभणी इथं बेमुदत उपोषण पुकारलं होतं, मात्र उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आमदार गुट्टे यांनी उपोषण मागे घेतलं.

****

लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. रेणापूर तालुक्यात कारेपूर परिसरात काल झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे, भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

****

जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदीपात्राच्या साफसफाई मोहिमेला कालपासून सुरवात करण्यात आली. मुंबई इथला समस्त महाजन ट्रस्ट, घाणेवाडी जलसरंक्षण मंच, आनंदनगरी मित्रमंडळ आणि हंड्रेड रुपीज सोशल क्लब यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. पुढील दोन महिने ही स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे.

****

कोल्हापूर ते नागपूर विशेष रेल्वेगाडी येत्या २७ तारखेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही गाडी उस्मानाबाद, लातूर, परळी, परभणी, पूर्णा आणि हिंगोली मार्गे धावते. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.

****

परभणी शहरासह परिसरात काल रात्री सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

दरम्यान, मराठवाड्यात पुढचे तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विभागातल्या सर्वच जिल्ह्यांत खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

हिंगोली शहरातून पोलिसांनी तीन लाख ३० हजार ७२० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या पथकानं काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी सागर माने या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment