Tuesday, 13 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

देशातल्या विविध राज्यांमध्ये आज नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे.महाराष्ट्रात गुढी पाडवा तर, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात आज ‘उगाडी’ तर कर्नाटकात ‘युगादी’ सण, साजरा केला जात आहे. तमिळनाडूमध्ये ‘पुथांदू’, केरळमध्ये ‘विशू’, पंजाबात ‘वैसाखी’, ओडिशामध्ये ‘पाना संक्रांती’ आणि पश्चिम बंगालमध्ये ‘बोहाग बिहू’ हे सण स्थानिक परंपरेनुसार साजरे होत आहेत. 

नवीन वर्षानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ ते १४ एप्रिल पर्यन्त लसीकरण उत्सव पाळण्याच्या आवाहनानंतर, भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेला उल्लेखनीय गती मिळाली आहे. या विशेष लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी काल रात्री ८ वाजेपर्यंत लसीच्या ३७ लाखांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या. या मोहिमेमुळे एकाच दिवसात २६००० नवी लसीकरण केंद्र कार्यरत झाली असून देशातील कोविड लसीकरण केंद्रांची संख्या ७१ हजार इतकी झाली आहे. कामाच्या ठिकाणीच सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांमध्येही वाढ होत आहे. देशात कालपर्यन्त कोविड लसीच्या १० कोटी ८२ लाख ९२ हजारांवर मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. चंद्रा आजपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळण्यास सुरुवात करतील. चंद्रा, या आधी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. त्यांचा कार्यकाळ २४ मे २०२२ पर्यंत असणार आहे.

****

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन तासांपेक्षा कमी वेळाच्या देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना भोजन न पुरवण्याच्या सूचना, हवाई वाहतूक मंत्रालयानं दिल्या आहेत. दोन तासांहून अधिक काळाचा प्रवास असेल तर मात्र भोजन पुरवता येईल, असं विमान कंपन्यांना सांगण्यात आलं आहे.

****

देशात गेल्या २४ तासात कोविडचे एक लाख ६१ हजार ७३६ नवीन रूग्ण आढळले. तर ९७ हजाराहून अधिक जणांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली.

****

No comments:

Post a Comment