Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 April 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ एप्रिल
२०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काल रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू
करण्यात आली. संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरांमधील रस्त्यांवरची वर्दळ घटल्याचं दिसून
आलं. मुंबईत नागरिकांचा संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता
मुंबईतल्या सर्व बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. औरंगाबाद शहरातही सर्वत्र बंद पाळण्यात
येत आहे. नांदेड शहरात मात्र या संचारबंदी मोडीत काढत आज सकाळी नागरीकांनी भाजीपाला
खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरातल्या रस्त्यांवरही
रहदारी दिसत असून, पोलिस नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन करत आहेत.
****
देशात
ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता याचा उपयुक्त साठा उपलब्ध केला जाईल, असं केंद्र
सरकारनं म्हटलं आहे. देशात सध्या ५० हजार मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा असल्याचं, केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. राज्यांनी उपचारासाठी उपयुक्त ऑक्सिजनचा योग्य वापर करावा
आणि नासाडी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं, असे निर्देश केंद्रानं दिले आहेत.
****
देशात
लसीकरण अभियानाच्या काल चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विक्रमी लसीकरण झालं. ३१ लाखांपेक्षा
जास्त नागरिकांना काल लस देण्यात आली असल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्रालयानं सांगितलं. देशभरात आतापर्यंत ११ कोटी ४३ लाख ९३ हजार २३८ नागरिकांचं लसीकरण
झालं आहे.
****
दरम्यान,
देशात काल नव्या दोन लाख ७३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार
३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक
कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ७३ हजो १२३ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर काल ९३ हजार ५२८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी २३ लाख
२९ हजार ५६४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
न्यायव्यवस्था
हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ असून, तो मजबुत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या
विधी शिक्षणाची आवश्यकता असल्याचं, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं आहे. नागपूर
शहराजवळच्या वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचं
उद्घाटन काल सरन्यायाधीशांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय दृष्टीकोन
आणि चारित्र्य विकसीत करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचं योगदान देईल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
कोविड-19
आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना
सक्रीय सहकार्य करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे.
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या
राज्यपालांबरोबर संवाद साधला. या परिस्थितीत जनतेचं मनोधैर्य उंचावणं तसंच या आपत्तीतून
बाहेर पाडण्यासाठी जे प्रयत्न विविध पातळ्यांवर सुरु आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना
सहकार्य करून, अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचवण्यामध्ये राज्यपालांनी महत्त्वाची भूमिका
पार पाडावी, असंही नायडू यांनी म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांची
गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य राबवण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातल्या,
६०० किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. ज्याप्रमाणे
महामार्ग महत्वाचे आहेत, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या रूई धानोरा या गावात सरपंच अमोल कदम, उपसरपंच भिमराव
वाढवे, ग्रामसेवक आर. जी. गुडुप्प यांनी गावातल्या नागरिकांची भेट घेऊन कोविड विषयक
जनजागृती केली, तसंच नागरीकांना लस घेण्याचं आवाहन केलं.
****
जालना
मुंबई जनशताब्दी विशेष रेल्वे १७ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य
रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
बीड
जिल्ह्याच्या अनेक भागात काल गारपीट झाली, यामुळे मोठ्या प्रमाणावर फळबागा, भाजीपाला,
आंबा तसंच धान्याचं नुकसान झालं आहे. शासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची
मागणी शेतकर्यांनी केली आहे.
****
कोरोना
विषाणूची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सांगली मार्केट यार्डात
कृषी मालाची उलाढाल ठप्प झाली असून, कांदा, बटाट्याचे भावही कोसळल्यामुळे शेतकरी चिंतेत
असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत असतानाच, जिल्ह्याला चार हजार १५३ इंजेक्शन
प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनानं या इंजेक्शनचा काळाबाजार टाळण्यासाठी नियमावली
तयार केली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment