आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाची
साखळी तोडण्यासाठी काल रात्री आठ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी
लागू झाल्यानंतर शहरांमधील रस्त्यांवरची वर्दळ घटल्याचं दिसून आलं. मुंबईत नागरिकांचा
संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतल्या सर्व बाजारपेठा
कडकडीत बंद आहेत.
नांदेड शहरात मात्र ही संचारबंदी
मोडीत काढत आज सकाळी नागरीकांनी भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
देशात लसीकरण अभियानाच्या
काल चौथ्या आणि अखेरच्या दिवशी विक्रमी लसीकरण झालं. ३१ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना
काल लस देण्यात आली, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सांगितलं.
****
मराठवाड्यात काल नव्या आठ
हजार ४६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११४ रुग्णांचा या संसर्गानं
मृत्यू झाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या पोलीस
मुख्यालयात आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं काल
कोविडमुळे निधन झालं. अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोन पोलिसांच्या निधनामुळे पोलीस
दलात हळहळ व्यक्त होत आहे.
****
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन
पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य राबवण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातल्या, ६००
किलोमीटर लांबीच्या पांदण रस्त्याचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. ज्याप्रमाणे
महामार्ग महत्वाचे आहेत, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पांदण रस्ता महत्वाचा असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर,
सीमा सुरक्षा बल आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्याच्या तंगधार भागामध्ये एकत्रितपणे केलेल्या
कारवाईत दहा किलो अंमली पदार्थ जप्त केले. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानस्थित काही दहशतवादी
अमली पदार्थांसह आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
मराठवाड्यातल्या काही भागात
कालही अवकाळी पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातल्या शेंद्रा, कुंभेफळ, करमाड तसंच
लाडगाव परिसरात काल हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात
झालेल्या पावसामुळे अनेक फळबागा आणि काढणी आलेल्या पिकांचं नुकसान झालं.
****
No comments:
Post a Comment