Monday, 19 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

काही विशेष उद्योग वगळता देशात औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिलं आहे. हा निर्णय २२ एप्रिल पासून अंमलात येणार आहे.

****

कोरोनाच्या नवा विषाणुचा महाराष्ट्रातला शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रवासापूर्वी ४८ तासांत केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या प्रवाशांनाच, महाराष्ट्रातल्या रेल्वे स्थानकांवर उतरता येणार असल्याचं, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या १६२ प्राणवायू प्रकल्पांपैकी ३३ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. या ३३ प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प मध्य प्रदेशात, चार हिमाचल प्रदेशात, चंदीगड, गुजरात, आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन, बिहार, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी दोन तर महाराष्ट्रासह एकूण नऊ राज्यातल्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

****

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल शिरूर अनंतपाळ इथं, कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांवरील उपचाराच्या दृष्टीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करून, हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं रिलायन्स उद्योग समूह येत्या १० दिवसांत प्राणवायू प्रकल्प आणि आरटीपीसीआर परीक्षण केंद्र उभारणार आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ही माहिती दिली.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ७३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे एक हजार ४२९ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ८१३, नांदेड एक हजार २८७, बीड एक हजार १४५, जालना ९०९, परभणी ४८९, उस्मानाबाद ४७७ तर हिंगोली जिल्ह्यात १८८ नवे रुग्ण आढळून आले.

****

No comments:

Post a Comment