Wednesday, 21 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

नागरी सेवा दिवस आज पाळण्यात येतो. जनसेवेसाठी स्वत:ला समर्पित करण्यासाठी नागरी सेवा हा दिवस साजरा करतात. बदलत्या काळातल्या आव्हानांचा सामना करणं, आणि भविष्यातली रणनिती तयार करण्याप्रती असलेली कटीबद्धता, हा दिवस दर्शवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी नागरी सेवेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

रामनवमी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रामनवमीनिमित्त भाविकांना पूजा किंवा दर्शनासाठी मंदिरांमधे जायला बंदी घालण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान देशाला संबोधित करत होते. देशाला संकल्प, साहस आणि तयारीसह कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला पार करायचं असल्याचं ते म्हणाले.

****

स्वस्तात सोनं देण्याच्या आमिषानं लुटणाऱ्या आंतरराज्यी टोळीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. यात चार आरोपी असून, त्यांनी फसवणूक करून लुटलेली ६५ लाखांची रोकड आणि तीन लाख रुपये किंमतीची कार असा ६८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

****

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात वांगणी इथं कार्यरत पॉईंटमन मयूर शेळके यांना, रेल्वे मंडळानं ५० हजार रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. शेळके यांनी परवा, वांगणी इथं, रेल्वे रुळावर पडलेल्या बालकाला प्रसंगाधान राखून वाचवलं, त्यासाठी त्यांना हे बक्षीस जाहीर झालं आहे.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ५६५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

****

No comments:

Post a Comment