Thursday, 22 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात खासगी वाहनांना आंतरजिल्हा प्रवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत राज्य सरकारनं काल आणखी काही निर्बंधांची घोषणा केली. सबळ कारण असेल तरच खासगी वाहनांना आंतरजिल्हा वाहतूक करता येणार आहे. लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. आज रात्री आठ वाजेपासून, एक मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. या टप्प्यात ४३ विधानसभा मतदारसंघांसाठी ३०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

****

घरोघरी जाऊन लसीकरण करणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही बाब स्पष्ट केली.

****

नाशिकच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर आता या ठिकाणी ऑक्सिजन टाकी दुरुस्त करून पुरवठा सुरळीत झाला आहे. कृषी मंत्री दादा भूसे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली. काल प्राणवायूच्या टाकीला गळती लागल्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या २४ रुग्णांचा मृत्यू झाला.

****

रामनवमीचा उत्सव काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं मात्र कोविडचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्यात आला. औरंगाबाद शहरातल्या किराडपुरा इथं रामजन्मोत्सव साध्या पद्धतीनं आणि मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. जालना, बीड, परभणी, नाशिक या जिल्ह्यांमध्येही रामनवमी साधेपणानं साजरी झाली. 

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३५ गावाच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. या गावात सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ४६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ३४, लातूर २८, नांदेड २५, उस्मानाबाद २३, परभणी २१, जालना १७, तर हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार २०७ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात एक हजार ६६८, नांदेड एक हजार ३७२, बीड एक हजार ४७, जालना ७९६, उस्मानाबाद ७६७, परभणी ५१२, तर हिंगोली जिल्ह्यात १९९ रुग्ण आढळून आले. 

****

No comments:

Post a Comment