Friday, 23 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ एप्रिल २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

पालघर जिल्ह्यातल्या विरार पश्चिमेला असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत १३ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज पहाटे ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून, इतर रुग्णांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येक ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. 

****

देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत. या बैठकांसाठी त्यांनी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखलेला पश्चिम बंगालचा आजचा दौराही त्यांनी रद्द केला आहे. सुरवातीला पंतप्रधान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ते दुपारी, देशातील आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांशीही बोलणार आहेत. 

****

राज्यातल्या कोविड रुग्णांसाठी प्राणवायुची तीव्र टंचाई भासत असून, राज्याला आणखी प्राणवायू द्यावा, अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रासाठी ठरवण्यात आलेला वाटा ग्रीन कॉरीडॉर करुन इतर राज्यातून तातडीनं उपलब्ध करुन द्यावा, त्यासाठी राज्य सरकार सगळ्या पद्धतींनी नम्रतेने विनंती करत असल्याचं टोपे म्हणाले. 

****

नागपूर इथल्या साहित्यिक आणि समीक्षक आशा सावदेकर, यांचं काल निधन झालं, त्या ७२ वर्षाच्या होत्या. मराठी साहित्यावर ज्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेला आहे, अशा अनेक नामवंत प्रतिभावान साहित्यिकांच्या लेखनाची, त्यांनी चिकित्सक समीक्षा केली आहे.

****

औरंगाबाद शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची तात्काळ कोरोना विषाणू संसर्ग चाचणी करण्यात ये आहे. काल २०४ नागरिकांची तात्काळ चाचणी करण्यात आली, यात तीनण बाधित असल्याचं आढळून आलं.

****

मराठवाड्यात काल नव्या सात हजार ८०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६६ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

****

No comments:

Post a Comment