Wednesday, 12 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** एसीएसी बॅटरी उत्पादन योजनेसाठी १८ हजार कोटी रुपये खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

** लहान मुलांच्या कोविड उपचारासाठी आवश्यक सुविधांची माहिती त्वरित पाठवण्याचे  वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

** औरंगाबाद इथं आज १९ तर जालन्यात १३ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे एक हजार २७० रुग्ण

आणि

** औरंगाबाद इथं कोविड लसीची पहिली मात्रा शासनाच्या निर्देशानुसार तुर्तास स्थगित

****

ऊर्जा साठवणुकीसाठी प्रगत तंत्रज्ञानाधारित अत्याधुनिक केमिस्ट्री सेल एसीसी बॅटरी च्या उत्पादन प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठीच्या १८ हजार १०० कोटी रुपये खर्चाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. या बॅटऱ्यांचं उत्पादन वाढल्यावर विजेवर चालणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसंच अवजड वाहनांना त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल, असं जावडेकर म्हणाले. सध्या देशात २० हजार कोटी रुपयांच्या बॅटरी उपकरणांची आयात होते, मात्र या योजनेमुळे देश एसीसी बॅटरीच्या क्षेत्रात स्वावलंबी होईल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.

****

जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यू एच ओ च्या अहवालात कोरोना विषाणूच्या बी १ पूर्णांक ६१७ या प्रकाराला भारतीय अवतार म्हटल्याचं वृत्त निराधार आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. डब्ल्यू एच ओ च्या या अहवालात कुठेही भारतीय या शब्दाचा उल्लेखही नसल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

म्युकर मायकोसिस आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय योजना करत आहे. या औषधाची आयात वाढवण्याच्या तसंच देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. विदेशातून आलेल्या या औषधीचं राज्यांना वाटप करण्यात आलं आहे. राज्यांनी सरकारी तसंच खाजगी रुग्णालयामध्ये या औषधीचं योग्य वितरण करावं असं सरकारनं सूचित केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात आजपासून २३ मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिक फक्त वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडू शकतील, किराणा दुकाने तसंच भाजीपाला दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि औद्योगिक क्षेत्रातले कारखाने बंद राहणार आहेत. फक्त ज्या कारखान्यात कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे, किंवा दोन किलोमीटर क्षेत्रात त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था शक्य आहे, असेच कारखाने सुरू ठेवता येणार आहेत.

****

कोविड उपचारांसंदर्भात लहान मुलांसाठी आवश्यक उपचार सुविधांची माहिती त्वरित पाठवण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बालरोगशास्त्र विभागांना दिले आहेत. कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोविड प्रादुर्भावाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून देशमुख यांनी आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठक घेऊन हे निर्देश दिले. यासंदर्भात विविध उपाययोजना, विशिष्ट औषधांची यादी याबाबतची माहिती सर्व रुग्णालयांच्या अधिष्ठातांमार्फत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे त्वरित पाठवावी, वैद्यकीय शिक्षण संचालक या सर्व टिप्पणीचा अभ्यास करून या अनुषंगाने उपचारपद्धती आणि व्यवस्थापनाबाबत धोरण निश्चित करतील, असंही देशमुख यांनी सांगितलं. मुलांच्या उपचाराबाबत पालकांच्या समुपदेशनाची गरज व्यक्त करत, शासकीय रुग्णालयांत टेली काउन्सिलिंग आणि हेल्पलाइन सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी केली.

दरम्यान, लातूर जिल्ह्यासंदर्भातही देशमुख यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यात शासकीय तसंच खाजगी रूग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारणीला गती द्यावी, प्राणवायू तसंच व्हेंन्टिलेटर रुग्णखाटांची संख्या वाढवावी, लहान मुलासाठी स्वतंत्र विशेष कक्षाची उभारणी करावी, आदी सूचना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री देशमुख यांनी केल्या.

****

विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडे यांना आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत अवताडे निवडून आले आहेत.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १९ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १३, अहमदनगर तीन, जालना दोन आणि जळगाव जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ८०९ रुग्णांचा कोविड विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात पाच लाख २ हजार ६८३ नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसींचा पहिला आणि दुसरा डोस घेतला असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज दिवसभरात २४३ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५४ हजार ६९ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ८५१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार २७० नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २१३, अंबाजोगाई १७४, केज १७३,आष्टी १४६, गेवराई १४२, शिरुर १४१, माजलगाव ७४, धारुर ६८, परळी ५८, वडवणी ४१ आणि पाटोदा इथल्या ४० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

****

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद परवा शुक्रवारी साजरा होत आहे, हा सण साजरा करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं सर्वांनी पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम धर्मगुरूंसह पोलीस तसंच प्रशासनाच्या बैठकीत चव्हाण बोलत होते. सर्व जनतेने पाळलेली स्वयंशिस्त तसंच विविध उपाय योजनांमुळे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी करण्यात यश प्राप्त झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं कोविड लसीची पहिली मात्रा सध्या कोणालाही दिली जाणार नसल्यानं, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितलं आहे. सध्या पहिली मात्रा घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध नसल्यानं, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं आवाहन डॉ पाडळकर यांनी केलं आहे.

****

ओडिशातल्या अंगुल इथून वैद्यकीय प्राणवायू घेऊन एक रेल्वे आज नागपूर रेल्वे स्थानकात पोहचली. यामध्ये ४ टँकर मधून ५९ मेट्रीक टन प्राणवायू या रेल्वेद्वारे आला असून तो नागपूर शहरातल्या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरला जाणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्राला आतापर्यंत रेल्वेद्वारे ४०७ टन प्राणवायू पुरवठा करण्यात आला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात आज परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उमरगा इथं आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तर तुळजापूर इथं आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी परिचारिकांचा सत्कार केला

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करुन याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी आज मुंबईत मंत्रालयात टोपे यांची भेट घेतली. यावेळी टोपे यांनी यासंदर्भात सकारात्मक विचार करुन आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिल्याचं, चव्हाण यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून राबवण्यात येणाऱ्या ‘मदतीचा एक घास " या उपक्रमाचा आज आमदार प्रणिती शिंदे यांनी शुभारंभ केला. या उपक्रमा द्वारे पक्षातील पदाधिकारी महिला स्वत:च्या घरी स्वयंपाक करून गरजूंना भोजन पुरवणार आहेत.

****

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवरून राबण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसंच कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरी कामं सुरू करण्या उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या योजना अनुसूचित जाती - जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्याने, निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावीत, असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे.

//**********//

No comments:

Post a Comment