Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– १६ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन
श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी
दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला
मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर
राखावं, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि
सुरक्षित रहा.
****
**
अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौत्के चक्रीवादळाचं गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण; कोकण किनारपट्टीला समुद्राच्या लाटांचे तडाखे, अनेक भागात पाऊस, राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथकं मुंबई आणि गोव्यात तैनात
**
मराठवाड्यातही वादळाच्या परिणामाची शक्यता, वादळी
वाऱ्यासह पाऊस अपेक्षित; नागरिकांनी झाडाखाली न थांबण्याचा तसंच इलेक्ट्रीकलशी संबंधित कामे न करण्याचा सल्ला
**
कोविडग्रस्त रुग्णांना उपचारासाठी देण्यात आलेल्या कृत्रिम जीवरक्षक
यंत्रांच्या वापराचे तत्काळ लेखा परीक्षण करण्याचे पंतप्रधानांचे
आदेश
**
राज्यात ३४ हजार ८४८ नवीन कोविड रुग्णांची
नोंद, मराठवाड्यात १२१ जणांचा मृत्यू तर
३ हजार ५०९ बाधित
आणि
**
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या
परीक्षा रद्द झालेल्या नाहीत - अफवांवर विश्वास न ठेवण्याचं
सीबीएसईचं आवाहन
****
अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौत्के चक्रीवादळ
तीव्र स्वरूप धारण करीत गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण
करत आहे. यामुळे आज आणि उद्या त्याच्या वाटेवर असलेल्या मुंबईसह
कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे. या वादळाच्या वाटेवरच्या या जिल्ह्यांमध्ये कालपासूनच वातावरणात
बदल झाला आहे. समुद्र खवळला असून जोरदार लाटांचे तडाखे किनाऱ्याला
देत असल्याचं आमच्या रायगडच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जोरदार वाऱ्यासह
महाड, तळा, रोहा,
इंदापूर माणगाव या दक्षिण रायगडमधील भागाला
मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही वादळामुळे मोठं नुकसान झालं असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
ठाणे शहर आणि परिसरातही काल
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
अनेक भागात काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता.
दरम्यान,
या तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथकं मुंबई आणि गोव्यात तैनात आहेत, याशिवाय गरज भासली तर पुणे इथं १४ पथकं सज्ज असल्याची माहिती, दलाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली.
आज
हे वादळ अतितीव्र स्वरूप धारण करेल आणि समुद्रात
वाऱ्यांचा वेग ताशी १२५ ते १७५ किलोमीटर राहील, असा इशारा हवामान विभागानं दिला
आहे. परवा १८ मे रोजी हे वादळ गुजरातच्या
पोरबंदरजवळ धडकून पुढे जाईल. त्यानंतर त्याचा वेग आणि प्रभाव कमी होईल. गुजरातलाही
त्याचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावरही जाणवणार असून मराठवाड्यात अनेक
ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची
शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी झाडाखाली थांबू नये तसेच शक्यतो
इलेक्ट्रीकल कामं टाळावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. रात्री
नऊ ते मध्यरात्री पर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या, असं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
सातारा जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस सुरू असून वादळी वाऱ्यामुळे अनेक
भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
देशातली कोरोनाविषयक स्थिती आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेविषयी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. कोविडग्रस्त रुग्णांना
उपचारासाठी राज्यांना देण्यात आलेल्या कृत्रिम जीवरक्षक यंत्र - व्हेंटीलेटर्सच्या
वापराविषयी पंतप्रधानांनी गंभीर दखल घेत
या व्हेंटिलेटर्सच्या वापराचे तत्काळ लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले. संसर्गाचं
प्रमाण अधिक असलेल्या राज्यांनी स्थानिक पातळीवर प्रतिबंधित क्षेत्रं तयार करणं, तसंच ग्रामीण भागात प्राणवायू वितरण योग्य प्रकारे करण्याची सूचना
पंतप्रधानांनी केली. घरोघरी जाऊन कोरोनासंबंधीच्या चाचण्या आणि तपासणी कराव्यात,
आरोग्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपकरणं हाताळण्याचं प्रशिक्षण द्यावं,
ग्रामीण क्षेत्रातल्या आरोग्यविषयक सुविधा वाढवण्यावर भर द्यावा,
अंगणवाडी कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करावं, अशा
सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यातल्या १७
जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान येत्या २० मे रोजी
दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत, आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ही माहिती
दिली. या जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र, उपलब्ध असलेली
संसाधनं तसंच त्याची मागणी याबाबत पंतप्रधान आढावा घेणार असल्याचं टोपे यांनी
सांगितलं.
राज्यात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय
आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारावेत, उपचारासाठी विशेषज्ञ आणि परिचारिका यांचे स्वतंत्र पथक करावं अशा सूचना विभागाला
दिल्याची माहिती, टोपे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून, महात्मा
फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार
केले जाऊ शकतात, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या
आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले
जात आहेत. काल पाच हजार इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आल्याचं
ते म्हणाले. हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून एक लाख इंजेक्शन खरेदीची
प्रक्रिया सुरू असल्याचे टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, जालना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सामाजिक
उत्तर दायित्त्व निधीतून १०० खाटांचं रुग्णालय उभारण्याबरोबर जालना शहरात येत्या
१९ मे पासून विद्युत शवदाहिनी सुरू करण्यात येणार असल्याचं टोपे यांनी यावेळी
सांगितलं.
****
राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी आज दुपारी १२ वाजता सामाजिक संपर्क
माध्यमावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कृती दलातले
तज्ञ डॉक्टर्स यावेळी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील
वैद्यकीय चिकित्सकांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
राज्यात काल ३४ हजार ८४८ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५३ लाख ४४ हजार ६३
झाली आहे. काल ९६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८० हजार ५१२
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे.
काल ५९ हजार ७३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४७ लाख ६७ हजार
५३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ८८ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात चार लाख ९४ हजार ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३५०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर १२१ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, लातूर ३५, परभणी १५, उस्मानाबाद १२,
नांदेड ९, बीड ३४, तर जालना १३,
आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ३ रुग्णांचा समावेश
आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १५० रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ३०४, औरंगाबाद ५९६, लातूर ५४०, परभणी ५६३, उस्मानाबाद
६०७, नांदेड २७३, तर हिंगोली जिल्ह्यात
७८ नवे रुग्ण आढळून आले.
****
काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली
असून त्यांना कृत्रीम जीवरक्षक यंत्रणा - व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. सातव
यांच्यावर पुण्यात जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच सातव
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले होते. परंतु त्यांना आता न्यूमोनियाचा संसर्ग
झाला असल्याचं, रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, सातव लवकरच बरे होतील, असं
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काल जहांगीर
रुग्णालयात सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर थोरात
पत्रकारांशी बोलत होते.
****
कोविड विषाणू संसर्गाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्राचे
सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी वर्तवली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते काल बोलत होते. जोपर्यंत ७० ते ७५
टक्के नागरिकांचं लसीकरण होत नाही तो पर्यंत कोविड विषाणू संसर्गाच्या लाटा येतच
राहतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. जोपर्यंत या विषाणू संसर्गावर रामबाण
औषध येत नाही तोपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब अत्यावश्यक
असल्याचं म्हैसेकर यांनी नमूद केलं.
****
संरक्षण संशोधन आणि विकास प्रणाली डीआरडीओनं एक प्राणवायू दक्षता प्रणाली
विकसित केली आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचं प्रमाण स्थिर ठेवता येऊ
शकतं. या प्रणालीद्वारे रुग्णाच्या शरीरात कमी दबाव आणि इलेक्ट्रॉनिक नियंत्रण
प्रणालीच्या सहय्याने आपोआप प्राणवायू पोहोचतो, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
गडकिल्ल्यांचं संवर्धन करतांना त्यांचं पावित्र्य जपत, ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का लागू देऊ नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल
दुर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकादऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत
होते. या किल्ल्यांच्या खालील परिसरात आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना वैभवशाली वारशाची माहिती द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या
कामाचे सनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयातल्या संकल्प कक्षातून व्हावं, असेही निर्देश त्यांनी दिले.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या
नाहीत, या बद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये,
असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. परीक्षांबाबत कोणताही निर्णय
घेतल्यास त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांना अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल,
असं मंडळानं कळवलं आहे. दरम्यान, सीबीएसईची
इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे
निकाल वस्तुनिष्ठ पद्धतीनुसार जाहीर करण्याची विनंती, या
याचिकेत करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद मधील संपूर्ण बाजारपेठा सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्याची
परवानगी देण्याची विनंती जिल्हा व्यापारी महासंघानं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांना केली आहे. याबाबतचं निवेदन काल त्यांना सादर करण्यात आलं. व्यवसाय बंद
असल्याने बँकांचे कर्जहप्ते, दुकान भाडे, कर भरणा आणि वीज देयकं भरण्यासाठी अडचणी येत आहेत. पावसाळा लवकरच सुरू
होणार असल्यानं दुकानांची देखभाल करण्यासाठी बाजारपेठा उघडण्याची परवानगी देण्यात
यावी. कोट्यावधी रुपयांच्या मालाचं नुकसान होण्याची भीती या निवेदनात वर्तवण्यात
आली आहे.
****
परभणी महानगरपालिका क्षेत्रातील ९ केंद्रांवर आज, ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा दिली
जाणार आहे. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेऊन महानगर पालिकेस सहकार्य करावं, असं आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ पोलिस स्थानकावर काल एका जमावानं केलेल्या
दगडफेकीमध्ये आठ पोलिस अधिकारी तसंच कर्मचारी जखमी झाले. एका समाजाला डिवचणारे फोन
कॉल आल्याने याबाबत दोन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात काही जणांनी तक्रार
नोंदवली होती. या बाबत पोलिस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत दीडशे ते
दोनशे जणांच्या जमावाने काल दुपारी बारा वाजेदरम्यान दगडफेक केली. जमावाला
नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, त्यानंतर
जमाव पांगल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकारानंतर शहरात शोधमोहीम सुरु करण्यात
आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर शहरातल्या औसा मार्गावरील रिलायन्स मॉलमध्ये ५० कामगार एकत्र काम करत
असल्याचं आढळून आल्यानं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. महानगरपालिका
आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
****
औरंगाबाद
शहरातील कोविड केअर सेंटर्स तसंच रुग्णालयातील अग्नीशमन यंक्षणेत सुधारणा करावी, अशी
अंतिम नोटीस मनपा अग्नीशमन विभागाने बजावली आहे. यानंतरही अग्नीशमन यंत्रणा सक्षम करण्यात
आली नाही, तर कारवाई केली जाईल, असं अग्नीशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांनी सांगितलं
आहे. दरम्यान, ग्रामिण भागातील कोविड केअर सेंटर आणि हॉस्पीटलचेही फायर ऑडीट सुरु करण्यात
आले असून त्यात आढळलेल्या त्रुटींनुसार संबंधितांना नोटीसा बजावल्या असल्याचंही सुरे
म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला आता अकरावी आणि
बारावी वर्गासाठी श्रेणीवाढ करुन संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला
आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून या
आश्रमशाळेमध्ये अकरावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून
बारावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत असं या संदर्भातल्या शासन निर्णयात निर्देशित
करण्यात आलं आहे.
****
हिंगोली इथं काल मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मराठा
आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारा
आंदोलन केलं. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली
नसल्याचा आरोप करत, मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक
भिसे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे, हिंगोली शहर पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात
घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबध्द केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जूनपूर्वी कापूस
लागवड करू नये, असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी
यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे, खरीप हंगामात इतर राज्यांतून
अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या अनधिकृत
बियाण्याची लागवड करु नये, असं आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
//**************//
No comments:
Post a Comment