Monday, 3 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक०३ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरशी तर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये परीवर्तन.

·      पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान अवताडे विजयी.

·      इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी ऊसासोबतच आता भात आणि मक्याच्या वापरालाही केंद्र सरकारची परवानगी.

·      राज्यात ५६ हजार ६४७ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १२१ जणांचा मृत्यू तर सहा हजार ३१५ बाधित.

·      मराठवाड्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस; सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू.

आणि

·      डहाणूचे माजी खासदार दामू शिंगडा यांचं निधन.

****

चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरशी तर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सत्तारुढ पक्षांना पराभव स्वीकारावा लागला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवत, सत्ता कायम राखली असली, तरीही पक्षाच्या प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्रान मतदारसंघातून पराभूत झाल्या. तृणमूल काँग्रेसमधून भाजपात आलेले सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा एक हजार ९५६ मतांनी पराभव केला.

तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये २०९ जागांवर विजय मिळवला, तर चार जागांवर आघाडीवर आहे. भाजपानं ७६ जागा जिंकल्या, तर एका जागेवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय सेक्यूलर मजलिस पार्टी एका, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला.

तामिळनाडूमध्ये सत्तारुढ ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. एकूण २३४ जागांपैकी द्रविड मुनेत्र कळघमनं ११० जागा जिंकल्या, तर २२ जागांवर आघाडीवर आहे. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमनं ६० जागा जिंकल्या असून, सात जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसनं १३ जागांवर विजय मिळवला असून, पाच जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं तीन जागा जिंकल्या तर एका जागेवर आघाडीवर आहे. तर भाकप आणि माकपनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला.

आसाममध्ये सत्तारुढ भाजपनं १२६ पैकी ६० जागा जिंकल्या. काँग्रेसनं २९, तर आसाम गण परिषदेनं नऊ जागा जिंकल्या.

केरळमध्ये १४० जागांपैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं ६२ जागांवर विजय मिळवला असून, काँग्रेस पक्षानं २१, तर भाकपनं १७ जागा जिंकल्या.

पुद्दुचेरीमध्ये ३० जागांपैकी, ऑल इंडिया एन आर काँग्रेसनं दहा जागा जिंकल्या असून, भाजपनं सहा जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं दोन जागांवर विजय मिळवला आहे.

****

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी विजय मिळवला. अवताडे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यावर तीन हजार ७३३ मतांनी विजय मिळवला. मतमोजणीच्या ३८ व्या फेरी अखेर अवताडे यांना एक लाख नऊ हजार ४५० मतं, तर भालके यांना एक लाख पाच हजार ७१७ मतं मिळाली. या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात होते, पण अवताडे आणि भालके वगळता इतर उमेदवारांना एक हजार मतांचा टप्पा गाठणंही अवघड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयाबद्दल पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतल्या द्रविड मुनेत्र कळघमच्या उत्तम कामगिरीबद्दल पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांचंही पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

****

इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं, ऊसासोबतच आता भात आणि मक्याच्या वापरालाही परवानगी दिली आहे. तसंच, ऊसाचा रस, काकवी आणि मळीपासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी दिली असून, कारखान्यांनी अतिरिक्त ऊस इथेनॉलसाठी वापरावा, असंही सूचित करण्यात आलं आहे.

कृषी अर्थव्यवस्थेचा विकास, तसंच आयात इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशानं, सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण, येत्या २०२२ पर्यंत दहा टक्के तर, पुढे २०२५ पर्यंत वीस टक्के करण्याचं ठरवलं आहे.

****

कोविडवरील उपचारासाठीचं फ्रान्समधून पाठवलेलं २८ टन साहित्य, काल भारतात दाखल झालं. यात रुग्णालयांसाठी आठ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. ही मदत म्हणजे भारत-फ्रान्स मैत्रीचा पुरावा असल्याचं, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रात कोविड संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीनं, अन्य ठिकाणाहून होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना, संवेदनशील उगमस्थान म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली. या दोन राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी, कोविड प्रतिबंधक नियमावली लागू असेल.

****

राज्यातल्या बांधकाम कामगारांसह घरगुती कामगारांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यानुसार घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत एक लाखांहून अधिक घरेलु, आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत १३ लाख बांधकाम कामगारांना, प्रत्येकी दीड हजार रुपये थेट बॅंक खात्यात दिले जाणार आहेत. याद्वारे एकूण साडेपंधरा कोटींहून अधिक रुपये निधी वितरीत करण्यास शासनानं मान्यता दिल्याचं, राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

राज्यात काल ५६ हजार ६४७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४७ लाख २२ हजार ४०१ झाली आहे. काल ६६९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७० हजार २८४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ५१ हजार ३५६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८४ पूर्णांक ३१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात सहा लाख ६८ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सहा हजार ३१५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२१ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २८, नांदेड २५, लातूर २३, जालना १५, बीड दहा, परभणी नऊ, उस्मानाबाद सहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा समावेश आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात काल ८३५ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात एक हजार ३४५, लातूर १ हजार १२६, जालना ९३५, परभणी ८२१, नांदेड ५१८, उस्मानाबाद ४८६, तर हिंगोली जिल्ह्यात २४९ नवे रुग्ण आढळून आले

****

राज्याच्या सर्व जिल्ह्यात वैद्यकीय प्राणवायू पुरवठा समप्रमाणात होण्यासह, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती, या खात्याचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. राज्यातल्या प्राणवायू उत्पादकांना, दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा, यासाठीचं विवरणपत्र देण्यात आलं आहे. केंद्रातर्फे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा मंजूर केलेला असून, त्याचं वितरण आवश्यकतेप्रमाणे होत आहे, येत्या काही दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेत वाढ होणार असल्याचही, शिंगणे यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड संसर्ग रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी समाधान व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं कोविड आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील संसर्गाचं प्रमाण वाढत असून, पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत, संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खबरदारीपूर्वक काम करण्याची सूचना, देसाई यांनी केली. पोलिसांच्या कुटुंबियांच्या आरोग्य उपचार सुविधांची विशेष काळजी घेण्यात यावी, ऑक्सिजन साठा, औषधी, खाटांची उपलब्धता पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, तसंच पोलीस वसाहती अधिक सुविधांयुक्त करण्यासाठीच्या बाबींची पूर्तताही प्राधान्यानं करावी, अशा सूचना देसाई यांनी केल्या.

****

औरंगाबाद शहरात महानगरपालिकेकडे सध्या लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण होणार नाही. त्यामुळे त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी केलं आहे. तसंच १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या मुकुंदवाडी, सादात नगर आणि कैसर कॉलनी, या तीन आरोग्य केंद्रांवर सकाळी दहा ते चार या वेळेत लसीकरण सुरू राहणार आहे. या लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर जणांना लस दिली जाणार आहे.

****

परभणी शहरातल्या कोविड सुश्रुषा केंद्रांवर रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी, शिवसेनेच्या वतीनं दोन्ही वेळेच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही व्यवस्था करण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक रुग्णखाटा असलेल्या सर्वच शासकीय आणि खाजगी रुग्णालयात, प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. सध्याची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, आगामी काळात प्राणवायूच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणं गरजेचं असल्याचं, त्यांनी नमूद केलं. त्यादृष्टीने ताबडतोब नियोजन करून अंमलबजावणी करावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले.

दरम्यान, लातूर शहरात कोविड प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महापालिकेनं कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश, देशमुख यांनी दिले आहेत. काल, यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी, नगरसेवकांनीही या मोहिमेच्या अंमलबजावणीत अधिक लक्ष देण्याचं सूचित केलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या विकासकामांचं भूमिपूजन, आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते काल झालं. यात आमदुरा गावालगत गोदावरी नदीकाठावरील घाट बांधण्याच्या कामासह, आमदुरा-चिकाळा आणि डोणगाव-कोल्हा या मार्गावरील रस्ता डांबरीकरण कामांचा समावेश आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तेर इथं संत गोरोबा काका यांचा वार्षिक समाधी सोहळा आणि यात्रा, कोविड संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले. दरम्यान सध्याच्या कालावधीत कोणीही मंदिराच्या परिसरात येऊ नये असं आवाहन, मंदीर प्रशासनानं केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोविड बाधितांच्या पार्श्वभूमीवर, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, काल गंगापूर इथं उप जिल्हा रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी आवश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची उपलब्धता तसंच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात विद्युत जनरेटर कार्यान्वीत करण्यात आला आहे. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामध्ये विभागात सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

औरंगाबाद तालुक्यात शेंद्रा औद्योगिक वसाहत परिसरात दोन कामगारांचा वीज पडून मृत्यू झाला. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बीड जिल्ह्यात नेकनूर तसंच केज तालुक्यात प्रत्येकी एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. परभणी जिल्ह्यात ठोळा शिवारात दोन बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा, वीज पडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. विभागात काल अनेक ठिकाणी जनावरंही वीज कोसळून दगावल्याचं वृत्त आहे.

बीड जिल्ह्यात, केज, अंबाजोगाई, धारूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला या पावसात आंब्याचं मोठं नुकसान झालं.

परभणी जिल्ह्यात पालम, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिंतूर तालुक्यात विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास अवकाळी पाऊस झाला, यामुळे फळबागांना मोठा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात या पावसामुळे आंबा, केळी, चिकू, पपई या फळबागांचं नुकसान झालं आहे.

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेडनेट, आंबा फळांचं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.

दरम्यान, मुंबईत नजिक अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हवामानात बदल झाला आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या जानेफळ गावात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं कोविड लसीकरण झालं आहे. गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांच्या पुढाकारानं, गावकऱ्यांची सर्वप्रथम कोरोना तपासणी करण्यात आली. यात एकाही व्यक्तीचा अहवाल बाधित आला नाही. यानंतर लसीकरण करण्यात आलं. या गावात आजपर्यंत एकही नागरिक कोरोना बाधित झालेला आढळला नाही.

****

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दामू शिंगडा यांचं काल वसई इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते. अनेक वर्ष ते काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते.

****

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातल्या चौघांना ‘पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह’ जाहीर झालं आहे. यामध्ये संजय बाबर, शांताराम वाघमोडे, इजहार अहमद शेख, वाहेद गफुर मुल्ला या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य पोलीस दलातल्या कर्तव्यनिष्ठ, उत्तम-उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांना, राज्य पोलीस महासंचालकांतर्फे पुरस्कृत केलं जातं. वर्ष २०२० साठी ७९९ पोलिस या सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासाठी पात्र ठरले आहेत.

****

No comments:

Post a Comment