Thursday, 13 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.05.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेले कठोर निर्बंध एक जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश आज राज्य सरकारनं जारी केले. बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीआसीरआर अहवाल असणं बंधनकारक असून, प्रवेश करण्याच्या ४८ तास आधी हा अहवाल काढलेला असावा, असं आदेशात नमूद आहे. कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू असतील. महानगरपालिकांनी स्थानिक बाजारपेठा तसंच बाजार समित्यांवर लक्ष ठेऊन कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी, असं या आदेशात म्हटलं आहे. जर एखाद्या ठिकाणी नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून आलं, तर स्थानिक प्रशासन त्याठिकाणी निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतं, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची, दोन ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांवर चाचणी करण्यास, भारतीय औषध महानियंत्रक - डी सी जी आय नं मान्यता दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका, वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी करण्याची शिफारस, तज्ञ समितीने केली होती. भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर, समिती तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची शिफारस करणार आहे.

****

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये, आणि वेळेवर पुरवठा व्हावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात खतांचा बफर स्टॉक केला जात असून, येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा, याबाबत कृषीमंत्र्यांनी मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं खतांची मागणी एकाचवेळी वाढली, त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन, यंदा दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी, कंपन्यांनी खत पुरवठ्याचं जे नियोजन आणि वेळापत्रक केलं आहे, त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही, याची क्षेत्रीय यंत्रणांनी खातरजमा करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. पुढील दोन महिने सतर्क राहून मागणीप्रमाणे खत पुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही, कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी, पाणीपट्टीवरील विलंब आकार, कर्जावरील दंडनीय व्याज तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांकरता व्याज माफीच्या सवलतीची अभय योजना राबवण्यास, या प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, काल मंत्रालयात ही बैठक झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, डोंगराळ किंवा पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना, आणि पेरी अर्बन योजनांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दराचा आढावा, या बैठकीत घेण्यात आला, तसंच सुधारित दरांना मंजुरी देण्यात आली. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मंडळ कार्यालय, तर धुळे आणि उदगीर इथं विभागीय कार्यालय स्थापन करण्यास, या बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव मंडगीकर यांच आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. १९९७ साली ते नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मंडगीकर हे १९७९ ते १९९१ या काळात देगलूर पंचायत समितीचे सदस्य होते. त्यांनी समाज प्रबोधनात्मक अनेक गीत लिहिली आहेत. मंडगीकर यांनी समाजातल्या उपेक्षित घटकांनी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून गावोगाव मेळावे घेतले होते, या कार्याबदल त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कारानं सन्मानित केलं होत

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथल्या महावितरण कार्यालयातला वरिष्ठ तंत्रज्ञ बाळनाथ जोरे याला तीन हजार ५०० रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. शेतातील विहिरीसाठी वीज जोडणी देण्यासाठी जोरे यानं ही लाच घेतली.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडांगणासाठी, जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून लवकरच क्रीडांगणचं काम सुरु करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेऊन क्रीडांगण विकासासाठीचा प्रस्ताव सादर केला होता.

****

No comments:

Post a Comment