Friday, 14 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      मराठा आरक्षणासंबंधीच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल.

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू निर्बंधाना एक जूनपर्यंत मुदतवाढ.

·      कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांममधल्या अंतरात बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढ.

·      राज्यात ४२ हजार ५८२ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात एकशे एकोणवीस जणांचा मृत्यू तर चार हजार ३५५ बाधित.

·      परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही- राज्य सरकारचे स्पष्टीकरण.

·      गर्दी जमवून विकास कामांचं उद्घाटन केल्याप्रकरणी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचा बिनशर्त माफीनामा स्वीकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा नकार.

आणि

·      आज रमजान ईद सणाचा सर्वत्र उत्साह.

****

मराठा आरक्षणासंबंधीच्या याचिकेवरील निकालावेळी राज्यघटनेतल्या एकशे दोनच्या दुरुस्तीचा जो अर्थ न्यायालयानं लावला, त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयानं एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. मागास प्रवर्गामध्ये जातीचा समावेश करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे आणि राष्ट्रपतींच्या संमतीने अशा प्रकारच्या मागास जातींची यादी तयार करता येऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र राज्यांनाही याबाबत अधिकार असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.

दरम्यान, एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीसोबतच इंद्रा सहानी प्रकरणातील ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विनंती करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मराठा आरक्षणासह देशभरातल्या इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं कातडी बचाव धोरण स्वीकारु नये, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू निर्बंध, येत्या एक जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. संसर्ग साखळी तोडण्याच्या मोहिमेअंतर्गत उद्या शनिवारपर्यंत लागू असलेले हे निर्बंध वाढवण्यात आल्याचे आदेश, राज्य सरकारनं काल जारी केले. बाहेरुन राज्यात येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून काहीशी कमी होत असली, तरी धोका कायम असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं, सरकारनं म्हटलं आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये, आता दोन जणांना प्रवास मुभा असेल, आणि त्यांच्यासाठीही चाचणी अहवाल आवश्यक असेल. इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू असतील. किराणा तसंच फळे, भाजीपाला, मांस, मासे, त्या बरोबरच खाद्य पदार्थ, कृषी विषयक दुकानं आदींसह येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं, सकाळी सात ते अकरा वाजेदरम्यान सुरू ठेवता येणार आहेत. महानगरपालिकांनी स्थानिक बाजारपेठा तसंच बाजार समित्यांवर लक्ष ठेऊन कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी, असं या आदेशात म्हटलं आहे. निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून, यासाठी ४८ तास आधी सूचना द्यावी, असं सरकारनं म्हटलं आहे.

****

कोविडवर कार्य करणाऱ्या गटाच्या सल्ल्यानुसार, कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांममधलं अंतर, बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. यापूर्वी हे अंतर, सहा ते आठ आठवडे इतकं होतं. डॉ. एन. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कोविड गटानं, कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली असून, आरोग्य मंत्रालयानं ती स्वीकारली आहे. को-व्हॅक्सिन लस मात्रेच्या अंतरामध्ये कोणताही बदल करण्याची शिफारस, मात्र या गटानं केलेली नाही.

****

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र, राज्यस्थान, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि दिल्ली, या सहा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत, काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सर्व राज्यांनी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्यावर, तसंच ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण करण्यावर भर द्यावा, असं त्यांनी सांगितलं. कोविड विरुद्धच्या लढ्यात चाचण्या, संशयितांचा शोध, पाठपुरावा आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधा विस्तार आणि मनुष्यबळाचं सक्षमीकरण, या महत्वाच्या गोष्टी असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय धोरण तयार करावं, अशी मागणी केली. राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत, तसंच म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून मिळावा आणि या औषधावरचं कमाल मूल्य कमी करावं, आदी मागण्याही टोपे यांनी यावेळी केल्या. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच, बालरोग तज्ञांचा कृती दल आणि मिशन ऑक्सिजन बाबत अन्य राज्यांकडून दखल घेतली गेल्याचं, टोपे यांनी सांगितलं.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाची २७ जून रोजी होणारी पूर्वपरीक्षा, कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता दहा ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचं, आयोगातर्फे कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८, आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ मध्ये, पात्र ठरलेल्या ७३७ उमेदवारांना, जून-२०२१ पासून, नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये, मुलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

****

राज्यात काल ४२ हजार ५८२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५२ लाख ६९ हजार २९२ झाली आहे. काल ८५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७८ हजार ८५७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांशा टक्के झाला आहे. काल ५४ हजार ५३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४६ लाख ५४ हजार ७३१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८८ पूर्णांक ३४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ३३ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल चार हजार ३५५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एकशे एकोणवीस जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३२, औरंगाबाद २२, बीड १८, नांदेड १५, जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी ११, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १५ रुग्ण आढळले, औरंगाबाद जिल्ह्यात ६३१, उस्मानाबाद ६२३, लातूर ६२२, जालना ५९१, परभणी ४७८, नांदेड २९२, तर हिंगोली जिल्ह्यात १०३ नवे रुग्ण आढळून आले. 

****

परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या परवानाधारक रिक्षा चालकांना पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय, शासनानं घेतला आहे. त्यासाठी काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षाचालकांकडून फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे येत आहेत. मात्र, परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान, त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचं काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना आणि रिक्षाचालकांना, याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केलं जाईल, असं परिवहन आयुक्तांनी कळवलं आहे.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असताना गर्दी जमवून विकास कामांचं उद्घाटन केल्याप्रकरणी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी सादर केलेला बिनशर्त माफीनामा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्वीकारण्यास नकार दिला. यासंदर्भातल्या वृत्ताची दखल घेऊन खंडपीठानं नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, भुमरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोर्डे यांचा अर्जही न्यायालयानं फेटाळून लावला.

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी, मराठवाड्यातल्या रुग्णालयातल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात स्वत: हजर होत खंडपीठाला माहिती दिली. विविध ठिकाणाहून ऑक्सिजन उपलब्ध करणं, तसंच स्थानिक पातळीवर उपलब्धता वाढवण्याबरोबरच राज्य शासनाकडेही मागणी नोंदवली असल्याचं, केंद्रेकर यांनी न्यायालयाला सांगितलं.

****

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राज्यातल्या नागरिकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. रमजानचा सण नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा आहे. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना विषाणू संसर्ग संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करू या, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना, आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्व बंधूत्वाची, सर्वांशी प्रेमानं वागण्याची शिकवण देतो, असं म्हटलं आहे. कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातल्या गरीब, दुर्बल, वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या ईदगाह इथं आयोजित केली जाणारी ईदची विशेष नमाज यंदा होणार नाही.

****

केंद्र सरकारनं ४५ वर्षे वयोगटावरच्या सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी, जलद आणि मोठ्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करावा, या मागणीचं पत्र, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांना पाठवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १० लाख १३ हजार ८६२ एवढ्या लसीची आवश्यकता असल्याचं, त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावं, यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड आजारानं दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची वस्तुस्थिती आणि सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

****

परभणी महापालिका क्षेत्रातल्या नऊ केंद्रांवर आज पंचेचाळीस वर्षांवरील वयोगटातल्या नागरीकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. नागरिकांना सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान या ठिकाणी क्रमांक वाटप करण्यात येणार असून, सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान प्रत्यक्ष लस देण्यात येणार असल्याची माहिती, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात ९१ केंद्रांवर आज ४५ पेक्षा अधिक वर्षे वयाच्या नागरिकांना लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ १०० लोकांना ही मात्रा दिली जाईल.

****

परभणी जिल्ह्यात गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कला संच आणि सेवाभावी संस्थेच्या वतीनं, लोककलावंतांना किराणा साहित्य, सॅनिटायझर आणि मास्क आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं. समाजासाठी जनजागृती करणाऱ्या कलावंतांना मदत करण्यासाठी पुढं येणं गरजेचं असल्याचं आवाहन, माजी सभापती अरविंद देशमुख यांनी यावेळी केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात जो तालुका कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या शुन्यावर आणण्याचा प्रयत्न करेल‌, तिथल्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला पाच लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल असं आश्र्वासन, शिवसेनेचे उपनेते तसंच जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी दिलं आहे. संसर्ग प्रादुर्भाव खंडित करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून, संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक शहर, गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावर शिवसेनेच्या कार्यकतर्त्यांनी जनजागृती करावी, तसंच रुग्ण सेवा द्यावी, असं आवाहन आमदार सावंत यांनी, काल झालेल्या पक्षीय आढावा बैठकीत केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या आशाताई कार्यकर्त्यांसाठी, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपलं एक महिन्याचं वेतन प्रोत्साहनपर निधी म्हणून दिलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. शासनाकडून त्यांना तुटपुंजं मानधन देण्यात येत असल्यानं, हे सहकार्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आशाताई आणि गटप्रवर्तकांना या अंतर्गत आमदार चौगुले यांच्याकडून प्रत्त्येकी पाचशे रुपये, आणि प्रत्येक ग्रामपंचायतींच्या ग्राम निधीतून पाचशे रुपये प्राप्त होणार आहेत.

****

गडचिरोली जिल्ह्यात काल दोन कट्टर नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केलं. धानोरा तालुक्यात सावरगाव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत मोरचूल जंगलातल्या चकमकीदरम्यान, हे नक्षलवादी मारले गेले, तर काही जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाचे जवान अभियान राबवत असताना, दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी घटनास्थळी मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त केला असून, या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

****

No comments:

Post a Comment