Friday, 14 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.05.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता वितरीत करणार आहेत. काही वेळात दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे सुरु होणाऱ्या या कार्यक्रमात, पंतप्रधान काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हा आठवा हप्ता नऊ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, यासाठी १९ हजार कोटी रुपये निधीचं वितरण करण्यात येणार आहे.

****

ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांचं उत्तम आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना करत असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

साडेतीन मुहुर्तापैकी एक अक्षयतृतीया आज साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा अक्षय तृतीयाचा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, समृध्दी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

देशात गेल्या तीन दिवसात नवीन बाधित रुग्णांची संख्या आणि संक्रमणाचं प्रमाण स्थिर होत असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. देशातलं रुग्ण वाढीचं प्रमाण २१ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यावरून, २१ पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर आलं असून, १८७ जिल्ह्यांमधे रुग्ण संख्येत घट होत आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणासंबंधीच्या याचिकेवरील निकालावेळी राज्यघटनेतल्या एकशे दोनाव्या दुरुस्तीचा जो अर्थ न्यायालयानं लावला, त्याला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयानं एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली.

****

कमी प्रवासी संख्येमुळे दक्षिण मध्य रेल्वेनं दोन रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या आहे. यामध्ये आजपासून गंगानगर- नांदेड - गंगानगर, आणि १७ मे पासून मुंबई - अदिलाबाद-मुंबई या गाड्यांचा समावेश आहे.

****

राज्यात येत्या १७ तारखेपर्यंत मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment