Saturday, 15 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.05.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत देशातली कोविड परिस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. कॅबिनेट सचिव, आरोग्य मंत्रालयाचे सचिव या बैठकीत सहभागी झाले होते.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत, या बद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मंडळानं हा खुलासा केला आहे. याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याविषयी विद्यार्थी आणि पालकांना अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल, असं मंडळानं कळवलं आहे.

दरम्यान, सीबीएसईची इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वस्तुनिष्ठ पद्धतीच्या तत्त्वानुसार जाहीर करण्याची विनंती, या याचिकेत करण्यात आली आहे.

****

सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवे उपाय शोधत, देशभरातल्या विविध राज्यांमधे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्याचा दिलासा देणारा भारतीय रेल्वेचा प्रवास सुरुच आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेनं, सुमारे सात हजार ९०० मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू, जवळपास ५०० टँकर्सच्या सहाय्यानं, देशातल्या विविध राज्यांमध्ये पोहचवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून, दररोज सुमारे ८०० मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा, देशभरात पुरवठा केला जात आहे.

****

भारतानं काल लसीकरण मोहिमेत १८ कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार केला. देशभरत आतापर्यंत एकूण, १८ कोटी चार लाख ५७ हजार ५७९ मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात, ११ लाख तीन हजार ६२५ जणांना लस देण्यात आली. यापैकी तीन लाख २५ हजारांहून अधिक जण, हे १८ ते ४४ या वयोगटातले होते. या वयोगटातल्या ४२ लाख ५५ हजारांहून अधिक जणांना, आतापर्यंत लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या मांजरा, रेणा आणि तावरजा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांना, नियामक मंडळाच्या आगामी बैठकीत मंजुरी देण्यात येईल, आणि या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल, असं आश्वासन, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या कामासंदर्भात, काल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. सातत्यानं पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या लातूर जिल्ह्यासाठी, पाटबंधारे प्रकल्पांची कामं मार्गी लावण्याबरोबरच, पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं असल्याचं, ते म्हणाले. लासरा बराज मधलं अतिरिक्त पाणी रायगव्हाण प्रकल्पात वळवण्याच्या योजनेचा नव्यानं अभ्यास करून, याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाटील यांनी दिले. लातूर जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल, पालकमंत्री अमित देशमुख यांनी, जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

****

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातले कडक निर्बंध एक जूनपर्यंत वाढवले असल्यानं, आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दोन जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन, फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षा २४ जून पासून नियोजित होत्या. सदर परीक्षा या आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणं आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा, आणि तसा प्रस्ताव शासनास सादर करावा, असं देशमुख यांनी सांगितलं.

****

अरबी समुद्रावर तौकती नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावानं पाऊस पडेल, मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनार्यापासून दूर जाणार असल्यानं, पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील.

दरम्यान, चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला, किनार्यालगतच्या भागात सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

****

अरबी समुद्रातल्या वादळी स्थितीमुळे मोसमी वाऱ्याची गतीही वाढण्याची शक्यता असून, मान्सून एक जून या आपल्या निर्धारित तारखेच्या एक दिवस आधीच ३१ मे रोजी केरळ मध्ये दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदमान निकोबार बेटांवर तर मान्सूनचं आगमन २१ मे रोजीच अपेक्षित आहे.

****

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समितीनं एकदिवसीय सामने आणि टी ट्वेंटी सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. १६ जून ते १५ जुलै या कालावधीत हा दौरा होणार आहे. 

****

No comments:

Post a Comment