Thursday, 10 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणू संसर्गाचे एक लाखापेक्षा कमी रुग्ण

** देशातलं प्रत्येक रुग्णालय प्राणवायूच्या सुविधेनं स्वयंपूर्ण करणार- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये नऊ तर जालन्यात चार रुग्णांचा मृत्यू

आणि

** राज्यात आजपासून दृष्टी दिन सप्ताह

****

देशात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या ९४ हजार ५२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून सलग तिसऱ्या दिवशी एक लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात रूग्ण संख्येत सातत्यानं घट होत आहे. सध्या अकरा लाख ६७ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या संसर्गावर उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या सलग अठ्ठाविसाव्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. संसर्गातून बरे होण्याचा देशातला दर ९४ पूर्णांक ७७ शतांश टक्के झाला आहे. 

****

देशातलं प्रत्येक रुग्णालय प्राणवायूच्या सुविधेनं स्वयंपूर्ण करण्याचा मानस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर इथं पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानमध्ये कार्यान्वित झालेल्या स्वयंपूर्ण अशा देशातल्या पहिल्या प्राणवायू प्रकल्पाचं `ऑनलाईन` लोकार्पण करताना जावडेकर बोलत होते. रुग्णालयातल्या खाटांच्या संख्येनुसार प्राणवायू प्रकल्पाची सक्ती करण्याचा नियम सरकार लवकरच करणार असल्याचं सुतोवाचही त्यांनी यावेळी केलं. संकटाच्या या काळातही एक हजार टन प्राणवायूची उपलब्धता केली. यासाठी देशातल्या स्टिल उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी मोठी मदत केली असुन `पीएम केअर` निधीतूनही आता प्राणवायू प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासूनच देशात आघाडीवर असून राज्यानं त्यातलं सातत्य कायम राखलं आहे. राज्यात आजपर्यंत २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे. लसीकरणामध्ये महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं आहे.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज नऊ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाख ४४ हजार २३५ झाली असून एक लाख ३८ हजार ८४२ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४८ झाली आहे. दरम्यान, आज एकोणतीस नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ७०४ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या एकोणसत्तर रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील ५९ हजार एकशे १९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या चारशे एकोणऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मालाड मालवणी इथं इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसंच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं तसंच जखमी रहिवाशांची कांदिवली इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. काल रात्री अकरा वाजता झालेल्या या दुर्घटनेत आठ मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

                                  ****

राज्यात दरवर्षी १० जून म्हणजेच आजच्या दिवशी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त आजपासून ते १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. याकाळात कोरोनाच्या संसर्गानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसीस या आजाराबाबत जनजागृती करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. या कालावधीत सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्र शल्य चिकित्सक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना डोळ्यांची निगा कशी राखावी याचं मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

****

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्वीकारलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमुळे आता राज्याच्या भवितव्याची चिंता वाटत नाही, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्याचं आव्हान आपल्यासमोर असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस अशा लोकशाहीविरोधी विचार, शक्तींविरोधात ठामपणे उभी राहील, असंही अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्ष वर्धापन दिनानिमित्त आज ध्वजारोहण करण्यात आलं.

****

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत असून सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी `ऑनलाईन` पद्धतीनं अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी `ऑनलाईन` अर्ज सादर करावेत, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी पंधराशे रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत असल्याचं परब यांनी म्हटलं आहे.  

****

अमावस्या आणि त्यातच ग्रहण असताना कधीही कांदा लिलाव न करणाऱ्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत आज प्रथमच अंधश्रध्दा मोडुन कांद्याचा लिलाव करण्यात आला. राज्यात सर्व बाजार समित्या अमावस्येला सुरू असताना नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावची बाजार समिती मात्र अमावस्येला बंद असायची. पंच्याहत्तर वर्षांपासुन सुरू असलेली ही परंपरा खंडीत करण्याचा निर्णय लासलगाव व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, आज सकाळच्या सत्रात कांद्याला कमीत कमी ७५२ रुपये आणि अधिकाधिक तेवीसशे रुपये तर सरासरी अठराशे एक रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला.

****

नांदेड इथल्या शुभंकरोती प्रतिष्ठान आणि देसाई प्रतिष्ठानतर्फे वृत्तपत्र वाटप करणाऱ्या  मुलांना अन्नधान्य आणि आवश्यक किराणा सामानाचं आज वाटप करण्यात आलं. संसर्ग प्रादुर्भावामुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ही मदत करण्यात आली. शुभंकरोती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण चिदरावर आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यावेळी प्रमुख उपस्थित होते.

****

औरंगाबादमध्ये खाजगी शिकवण्या घेणाऱ्यांच्या संघटनेतर्फे क्रांती चौक इथं मानवी साखळी तयार करुन निदर्शनं करण्यात आली. येत्या चौदा तारखेपासून खाजगी शिकवण्या सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खाजगी शिकवण्या घेणाऱ्यांचा लघुउद्योजकांमध्ये समावेश करावा, गेल्या दोन वर्षांचा कर माफ करावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन आंदोलकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शहरातल्या सर्व बाजारपेठा सुरु असताना शिकवणी वर्ग बंद का असा प्रश्न यावेळी संघटनेचे अध्यक्ष पी.एम. वाघ, कार्याध्यक्ष प्रशांत बनसोडे यांनी या निमित्त उपस्थित केला आहे.

****

No comments:

Post a Comment