Sunday, 13 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** कोविडवरील उपचाराशी निगडीत वैद्यकीय उपकरणं आणि औषधींना वस्तू आणि सेवा करात सवलत

** औरंगाबादच्या एकात्मिक सर्वागिंण विकासाकरता रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्नशील - मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत

** विद्यार्थ्यांचं नुकसान हो नये म्हणून १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

** राज्यात १ हजार ६९७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २३ जणांचा मृत्यू तर ५३१ बाधित

णि

** मुंबई आणि कोकणात १५ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा; नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पा 

****

कोविडवरील उपचाराशी निगडीत वैद्यकीय उपकरणं आणि औषधं यांना वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमधून सवलत देण्याबाबत मंत्रिगटानं केलेल्या अनेक शिफारसी काल जीएसटी परीषदेच्या ४४व्या बैठकीत मान्य करण्यात आल्या. अॅम्फोटेरीसीन बी आणि टोसिलीझुमॅब या औषधांना जीएसटीमधून पूर्ण सवलत देण्यात आली आहे. तर रेमडेसीवीर वरील कर १२ टक्क्यांवरून टक्के करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना दिली. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्रालयानं शिफारस केलेल्या हेपारीन आणि अन्य काही औषधांवरील करही पाच टक्के करण्यात आला असून, वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन निर्मिती उपकरणं आणि वैद्यकीय उपकरणांवरील करही १२ टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोविड चाचणी किट्स, ऑक्सीमीटर्स, सॅनिटायझर्सयांच्यावरील जीएसटीही पाच टक्के करण्यात आला असून, अम्ब्युलन्सवरील कर २८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय विद्युत दाहीन्यांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. सप्टेंबरपर्यंत ही सवलत लागू राहणार असल्याचंही अर्थमंत्र्यांनी या वेळी सांगितलं. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती, आठ दिवसात मंत्रीगटानं आपला अहवाल सादर केला.

****

औरंगाबादमधील ऑरिक सिटी ही उद्योगाप्रमाणेच वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन आणि व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वागिंण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणली जाईल. यासाठी रस्ते आणि हवाई वाहतुकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्न करीत आहे, असं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी आणि दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र विकासाचा कांत यांनी काल शेंद्र्याच्या ऑरिक सिटीत सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ऑरिक सिटीत सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगांची भर पडणार आहे. नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल तसंच चिकलठाणा विमानतळाचं विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची वाहतूक सुरु होईल. यामुळे उद्योगांबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल. परिणामी औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास मदत होईल. या विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असं त्यांनी  सांगितलं.

****

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेवर येत्या २१ जूनपर्यंत निर्णय अपेक्षित असून या निकालानंतरच आपली भूमिका स्पष्ट करु असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. परभणीत ते काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यातील मागासवर्गीयांना एकजूट करण्यासाठी आपण दौरा करत आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारनं केलेल्या अक्षम्य चुकांमुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान हो नये यासाठी १५ जून पासून शाळा सुरु करण्याचं परिपत्रक शासनानं काढलं असून मंगळवार पासून शाळा सुरु होणार आहेत. मात्र शाळा नेमक्या कशा पद्धतीने सुरु कराव्यात ऑनलाईन वर्ग घ्यावेत की पहिल्या गटात असलेल्या भागात शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात, नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत स्पष्टता नसल्यामुळे मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. 

****

राज्यात कोविड रुग्णसंख्येत घट झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, अहमदनगर, जळगाव, वाशिम सह इतर १३ जिल्ह्यांत उद्या सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार असून जनजीवन सुरळीत सुरू होईल. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.

****

राज्यात काल १ हजार ६९७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० झाली आहे. काल ३६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख आठ हजार ३३३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. काल १ हजार ९१० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ५५ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ५३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५, उस्मानाबाद पाच, बीड तीन, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

काल बीड जिल्ह्यात १८० नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद ११७, औरंगाबाद ९५, लातूर ६५, जालना २६, नांदेड १५, परभणी २१ आणि हिंगोली जिल्ह्यात काल १२ नवे रुग्ण आढळून आले.

****

सौदी अरेबियानं यंदाही ज यात्रा आपल्या नागरिकांपुरतीच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही ज यात्रेला येण्याची सौदी अरेबिया बाहेरील व्यक्तींना परवानगी नव्हती. यंदाही १८ ते ६० या वयोगटातील ६० हजार सौदी नागरिकच ज यात्रेत सहभागी होऊ शकतील. त्याकरता लसीकरण करून घेण्याची अटही असल्याचं सौदी अरेबियाच्या अधिकृत वृत्त संस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. जगभरातील कोविड स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदी अरेबियाचे आरोग्यमंत्री तौफिक अल रबिया यांनी सांगितलं.

****

मुंबई आणि कोकण भागात १५ तारखेपर्यंत अतीवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.  मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला असून लोकांनी अती आवश्यकता असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये असं आवाहन हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसालीकर यांनी केलं आहे.

दरम्यान, काल मुंबईत जोरदार पाऊस झाला तर रत्नागिरीमध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्यावार्ताहरानं कळवलं आहे..

मुंबई महानगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपत्कालीन स्थितीत नागरिकांना सहाय्य करण्यासाठी  बेस्ट, अग्नीशमन दल आणि  विद्युत विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातल्या ३३ वॉर्डांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष करून मिठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नागरिकांच्या आपत्कालीन सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा वेळेआधीच राज्यात दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यातल्या २८ जिल्ह्यात अतिपावसाची तर ५ जिल्ह्यांत सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जळगाव, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हे मात्र अजून कोरडेच आहेत.

****

दरम्यान, मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार पास झाला. यामुळे बहुतांश भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. बीड जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काल सायंकाळी जिल्ह्यात बीडसह अंबाजोगाई, केज, वडवणी या तालुक्यांत जोरदार पाउस झाला. सुमारे दिड तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते तर काही भागातली वाहतूक ठप्प झाली होती. वडवणी इथं झालेल्या पावसामुळं कवडगाव, देवडी, खळवट, निमगाव परिसरात नदीला पूर आला. यामुळे देवडी गावचा संपर्क तुटल्यामुळे नागरिक अडकून पडले. पावसामुळे जिल्ह्यातल्या खरीप पेरणीला वेग येणार आहे मात्र जोरदार पास झाला असला तरी तो सर्वदूर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी १००मिलीमीटर पास झाल्याशिवाय पेरणीची गडबड करु नये अस आवाहन बीड जिल्हा परिषदेनं केलं आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या उदगीर, गुडसूर, निलंगा, औराद शहाजनी, शिरुर अनंतपाळ, साकोळ इथं काल धुव्वाधार पास झाला. या पावसामुळे जिल्ह्यातला शेतकरी आनंदला आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या मुक्रमाबाद परिसरात काल सायंकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली. मृग नक्षत्रात दुसऱ्यांदा आलेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

उस्मानाबाद शहरात काल रात्री झालेल्या पावसानंतर काही काळ विश्रांती घेत आज सकाळपासून पावसानं पुन्हा दमदार सुरुवात केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड - सोयगाव मतदार मतदारसंघातील पोलीसांना राहण्यासाठी निवासस्थान आणि पोलीस चौकी उपलब्ध करुन देण्यात येईल, एक पथदर्शी प्रकल्प म्हणून हा प्रयोग विचाराधीन आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास राज्यभर हा प्रकल्प  राबवणार असल्याची घोषणा महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. सिल्लोड इथं सत्तार यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं तसंच महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या महिला विश्रांती कक्षाचं काल लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. सोयगाव, फर्दापूर आणि अजिंठा इथल्या पोलिस ठाण्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रस्ताव सादर केल्यास तिन्ही पोलीस ठाण्याला लवकरच नवीन इमारतीसाठी मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

जालना जिल्ह्यातल्या उटवद आणि तीर्थपुरी इथल्या महापारेषणच्या १३२ किलोवॅ  उपकेंद्राचं भूमिपूजन काल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झालं. उटवद उपकेंद्रामुळे परिसरातील ९० गावांना तर तीर्थपुरी परिसरातील ४४ गावांना सुरळीत आणि योग्य दाबानं वीजपुरवठा होईल, असं डॉ. राऊत यांनी सांगितलं. ग्राहकांना सुरळीत आणि दर्जेदार वीजपुरवठा करण्यास महावितरण कटिबद्ध आहे. त्यासाठी ग्राहकांनीही वीजबिल भरून सहकार्य करावं, असं आवाहन राऊत यांनी यावेळी केलं. आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल यांची यावेळी उपस्थिती होती.

****

पालघर जिल्ह्यात जवळपास ४३ गावं अशी आहेत की जिथं कोरोना विषाणू संसर्गाचा शिरकावचं होऊ शकला नाही. यामध्ये विक्रमगड तालुक्यातल्या कोंडगावचाही समावेश आहे. जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत एकही कोविडचा रुग्ण आढळलेला नाही. याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांनी माहिती दिली. ते म्हणाले..

 

कोंडगाव म्हणून आमचं एक गाव आहे. या कोंडगावमध्ये आतापर्यंत दोन्ही लाटेमध्ये सु्द्धा एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि तिथले लोकप्रतिनिधी या सर्वांचाच मोलाचा वाटा होता. गावामधले जे पाडे जे होते. त्या पाड्यांवर मास अँटीजेन चाचणी करुन घेतली. गावामध्ये फेरीवाल्यांना बंदी घातली. त्यानंतर आरोग्य खात्यामार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि इतर हे सगळे कन्टीन्यूअस चालू होते. दुसरं म्हणजे ग्रामपंचायत लेव्हलला जी लग्न होती त्यांनी तिथे स्ट्रीकली पंचवीसचा जो नॉर्म आहे. तो फॉलो केला. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आजतागायत या गावामध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही.

****

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात नांदेड जिल्ह्यातील दोन हजार ८१९ परवानाधारक रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात, सानुग्रह अनुदान जमा करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं रिक्षा चालकांना पंधराशे रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर केलं होतं. त्यानुसार हे अनुदान जमा करण्यात आल्याचं प्रादेशिक परीवहन कार्यालयातून सांगण्यात आलं.  

***

नांदेड शहरास पाणी पुरवठा करणारा डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प काल सकाळी ९ टक्के क्षमतेनं भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कसबे तडवळे गावच्या मनीषा वाघमारे यांच्या रुग्णसेवेची दखल थेट डेटॉल कंपनीने घेतली आहे. घरची परिस्थिती साधारण असूनही वाघमारे यांनी कोविड काळात, ३० किलो मीटर दररोज  प्रवास करत १०० ते १५० जणांना घरगुती जेवणाचे डबे पुरविले. त्यांच्या या कामाची दखल घेत डेटॉल या जंतुनाशक औषधाच्या बाटलीवर मनिषा वाघमारे यांचं छायाचित्र लावण्यात आलं आहे.

//****************//

 

 

 

 

No comments:

Post a Comment