Friday, 18 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** प्रत्येक नागरिकाला कोविड लस मोफत देण्यास सरकार वचनबद्ध - पंतप्रधानांची ग्वाही

** इलेक्ट्रिक वाहनांबाबत सुधारित धोरण मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

** जालना इथं तीन तर औरंगाबाद इथं आज पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू

आणि

** डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनची निदर्शनं

****

देशातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहेच परंतु प्रत्येक नागरिकानं कोविड संबंधीत नियमांचं पालन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड -१९ फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते.

देशात आगामी २१ जूनपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. २६ राज्यांमधल्या १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये आघाडीच्या कामगारांसाठी हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. देशभरातल्या एक लाखांहून अधिक फ्रंटलाईन कामगारांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं या कार्यक्रमाचं उद्दीष्ट असून, या योजनेसाठी एकूण २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

****

कोविड काळात एक वर्षाचा आमदार निधी संबंधित मतदार संघात खर्च करण्याच्या परवानगी बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज बीड इथ आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातल्या कोविड संसर्गाबाबत चिंता व्यक्त करत, स्थानिक पातळीवरील आरोग्य विषयक प्रश्न लवकरच मार्गी लावू असं पवार यांनी सांगितलं. खरीप हंगामापासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

दरम्यान, कोविड परिस्थितीत आरोग्य विभागात काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी या बैठकीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. तीन महिन्याचं वेतन न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप या या कर्मचाऱ्यांनी केला. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वाहन अडवण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला. यात तीन आंदोलक जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी महाविकास आघाडी सरकारने गेल्या दीड वर्षात एक दमडीही दिली नसल्याची टीका माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेसाठी सतत पाठपुरावा करणार असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं, ते म्हणाले....

माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही हात जोडून विनंती केली होती की, पक्ष विरहीत तुम्ही ही योजना करा. तुम्हाला या योजनेला ज्याचं नाव द्यायचं त्याच नाव द्या, पण आमची योजना करा. दोन कोटी लोकांच्या वतीने आम्ही हात जोडून विनंती केली, पण या सरकारच्या ह्रदयाला पान्हा फुटला नाही. या सरकारनं दिड वर्षात दमडी दिली नाही. मराठवाड्यावर अन्याय करु नका, नसता आम्ही रस्त्यावरची आंदोलनाची लढाई लढू. आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाची लढाई लढू. आम्ही विधानसभेमध्ये सरकारला मराठवाडा वॉटरग्रीड करायला भाग पाडू.

****

वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला गती देणं गरजेचं असून यासाठीचे सुधारित धोरण निश्चित करून ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज यासंबंधी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरी आणि ग्रामीण भागात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं नियोजन करावं, या वाहनांना लागणारे चार्जिंग स्टेशन्स आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांचा आराखडा तयार करावा, शासकीय कामकाजात इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर वाढवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

****

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. मंत्र्यांनी या प्रश्नी आंदोलन करून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी अपेक्षित माहितीचं संकलन करावं, असं मुंडे यांनी नमूद केलं. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. या आरक्षणाचा केंद्र सरकारशी काहीही संबंध नाही, राज्य सरकारनं या प्रकरणी तत्काळ पावलं उचलून कार्यवाही करण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली.

****

जळगाव इथल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या कर्जदारांची संख्या आता ५६ झाली आहे. पतसंस्थेची ११९ कोटींची कर्जवसूली संशयास्पद असून त्यामध्ये ठेवी पावत्यांद्वारे तडजोड केल्याचं दिसून आलं आहे. ११९ कोटींपैकी रोखीने ४७ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये जळगाव इथले उद्योजक प्रेम नारायण कोगटा, सुवर्ण व्यवसायिक भागवत भंगाळे, औरंगाबाद इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँक तसंच आदर्श दूध डेअरीचे संस्थापक अंबादास मानकापे, आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे.

****

बीड जिल्ह्यात आज १५६ नवे कोविडग्रस्त आढळले. यामध्ये बीड तालुक्यात ४०, आष्टी २७, केज तसंच पाटोदा तालुक्यात प्रत्येकी १७, गेवराई १२, परळी ११, अंबाजोगाई १०, वडवणी ८, शिरूर ७, धारूर ४, तर माजलगाव तालुक्यात कोविड संसर्ग झालेले नवे तीन रुग्ण आढळले.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार १३२ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ३२ नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ५९८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ५१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ५२१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत आज पाच कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये चार रुग्ण हे औरंगाबादचे आणि एक रुग्ण हिंगोली जिल्ह्यातला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं तीन हजार ३७१ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४५ हजार १३४ झाली असून एक लाख ४० हजार  ५९७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

****

डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमएच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं आज आएमएच्या सभागृहात आंदोलन करुन तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेधाचे फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली. डॉक्टरांवरील हल्ले थांबले पाहिजे, डॉक्टरांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे यासह अन्य मागण्या आयएमए औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ.यशवंत गाडे, डॉ. उज्वला दहिफळे यांच्यासह सहभागी डॉक्टरांनी केल्या. धुळे तसंच नांदेड इथंही संघटनेच्या सदस्य डॉक्टरांनी निदर्शनं करत, डॉक्टरांवरचे हल्ले रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची मागणी केली.

****

लातूर जिल्ह्यात बाभळगाव ग्रामपंचायतीनं कबाले वाटप झालेल्या भूखंडावर या समाजातील लोकांसाठी सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त अशी एक सुंदर वसाहत निर्माण करावी, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात गौड राजगौड समाजातील ४१ लाभार्थ्यांना आज कबाले वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या भूखंडावर ग्रामपंचायतीनं रस्ते, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधेचा पुरवठा करावा, असं सांगतानाच, या वस्तीतील सिमेंट रस्त्यासाठी ग्रामपंचायतीनं सात लाख पन्नास हजार रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती ही देशमुख यांनी यावेळी दिली.

//*********//

 

No comments:

Post a Comment