Sunday, 20 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची सूचना

** राज्यात ३० ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ

** राज्यात आठ हजार ९९२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू तर ४८३ बाधित

** सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

** मुलांच्या अध्यापनामध्ये पालकांच्या सहभागासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

** पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार

आणि

** सत्तेसाठी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत लाचार नाही - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं केली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अत्यंत महत्त्‍वाच्या पंचसूत्रीय रणनीतीची अंमलबजावणी करावी. संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी लसीकरण करणे गरजेचं असल्यानं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी लसीकरणाची गती वाढवावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही गृहमंत्रालयानं दिल्या आहेत. ल्ला करणाऱ्यांविरुद्ध संस्थात्मक गुन्हा दाखल करुन तात्काळ कारवाई करावी असं राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

****

दहा वर्षांखालच्या मुलांना कोविड १९चा फारसा धोका नसल्याचं पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणूजन्य रोग संस्थेच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या वृत्तविभागाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमधल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा या विषाणूला वेगळ्या प्रकारे हाताळत असल्याचं त्यांनी या मुलाखतीत नमूद केलं. कोविड१९ लसीकरणानंतर काही जणांमध्ये दिसत असलेले आजार, हे लसीकरणानंतर रोगप्रतिकारक क्षमतेला मिळालेल्या चालनेमुळे होत असल्याचंही प्रिया अब्राहम यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमधे ३० ते ४४ वयोगटातल्या नागरिकांचं कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण कालपासून पुन्हा सुरु झालं. यासाठी पात्र नागरिकांना कोविन पोर्टलवर किंवा लसीकरण केंद्रांवर नोंदणी करावी लागणार असल्याचं राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. याआधी लसीच्या तुटवड्यामुळे सरकारी रुग्णालयांमधलं १८ ते ४४ या वयोगटातलं लसीकरण राज्य सरकारला थांबवावं लागलं होतं. दरम्यान ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं लसीकरण याआधीप्रमाणेच सुरु राहणार असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यात आत्तापर्यंत सुमारे २ कोटी ७० लाखांहून अधिक नागरिकांना कोविड१९ प्रतिबंधक लस दिली गेली आहे.

****

राज्यात काल आठ हजार ९९२ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ६३ हजार ४२० झाली आहे. काल २५७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १ हजार ३५६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९ शतांश टक्के झाला आहे. काल १० हजार ३७३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५ लाख १० हजार ३६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ४८३ कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली तर १९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबादच्या ८, लातूर ५, परभणी ३, जालना २ आणि बीड जिल्ह्यातल्या एकाचा समावेश आहे. नांदेड, उस्मानाबाद आणि  हिंगोलीत काल एकही मृत्यू झाला नाही. काल बीड इथं १७३, औरंगाबाद ११४, उस्मानाबाद ९३, नांदेड ५३, जालना ३८, लातूर २८, नांदेड २४, परभणी १२ तर हिंगोलीत केवळ ३ रुग्णांची नोंद झाली. सध्या हिंगोलीत फक्त ४७ सक्रीय रुग्ण असून सलग तिसऱ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

****

पुण्यातल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास- सारथी या संस्थेला स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल ही घोषणा केली. काल पुण्यात या विषयी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण आणि विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसंच उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी देण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा समाजाचं शिष्टमंडळ तसंच सारथी संस्थेच्या संचालकांची उपस्थिती होती.

****

कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यात पुरामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात काल बंगळूरूमध्ये बैठक झाली. दोन्ही राज्यांच्या जलसंपदा विभागांमध्ये उत्तम समन्वय असल्याचं पाटील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यासंदर्भात माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. 

 एकंदरीत येणारा अलमट्टी धरणाचा येवा आणि पुढे जाणारा येवा आणि महाराष्ट्रात पडणारा पाऊस यासर्वांवर डायनॅमीकली आपण जर कंट्रोल ठेवला. तर मग कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती लेव्हल ठेवायची हे खासकरुन अलमट्टी येथील याच्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल.अशी चर्चा झाली. मला खात्री आहे की, आलेल्या पावसाळ्यात आणि पुढं देखील या पद्धतीत अधिक सुधारणा होत जाईल.यावर्षीच्या पावसाळ्याची संभाव्य पुराची, येईलच असं नाही पण जर आलाच पूर तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समन्वय चांगल्या पद्धतीनं साधण्यासाठी आजची बैठक उपयोगी ठरेल असा मला विश्वास आहे.

****

सध्या घरातून सुरु असलेल्या शिक्षण पद्धतीच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या अध्यापनामध्ये पालकांच्या सहभागासंदर्भात शिक्षण मंत्रालयानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सुरक्षित, सहभागी आणि सकारात्मक शिक्षणाचं वातावरण घरात तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. घर हीच मुलांची शाळा असून पालकच मुलांचे पहिले अध्यापक आहेत असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटलं आहे. साथ रोगामुळे सध्याच्या नवीन वातावरणात मुलांच्या विकास आणि शिक्षण प्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्यांविषयीची माहिती, गृहपाठ आणि इतर अभ्यासक्रमांची माहिती पालकांना उपलब्ध करुन दिली पाहिजे, असं शाळांना सूचित करण्यात आल्याचं पोखरियाल यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. कोविड-१९ मुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२१च्या मुख्य कार्यक्रमाचं दूरदर्शनवरून थेट प्रसारण केले जाणार आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या सकाळी साडे सहा वाजता या प्रसारणाला सुरुवात करणार आहेत. योगासनानंतर सकाळी सात वाजल्यापासून पावणे आठ वाजेपर्यंत पंतप्रधान संबोधित करणार आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव लाखो लोक आपल्या घरातूनच योगासनं करून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

****

जागतिक योग दिना निमित्त उद्या भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन-२०२१चे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा शिक्का वापरला जाणार आहे. देशातील ८१० मुख्य टपाल कार्यालयात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. टपाल पाठवताना त्यावर चिकटवलेले तिकिट पुन्हा वापरात येऊ नये यासाठी टपाल खात्याकडून रद्दीकरण शिक्का मारला जातो.

या उपक्रमांतर्गत नांदेडच्या मुख्य टपाल घरांमध्ये नोंदणी केलेल्या आणि वितरणासाठी आलेल्या टपालांवर ही विशेष रद्दीकरण मोहर छापण्यात येणार आहे, अशी माहिती नांदेड विभागाच्या डाकघर अधिक्षकांनी दिली आहे.

****

सत्तेसाठी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही आणि विनाकारण कोणाची पालखी वाहणार नाही तर स्वाभिमानानं आणि स्वत:च्या पायावर खंबीरपणे पुढची वाटचाल करेल असं शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ऑनलाईन संवाद साधतांना बोलत होते. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी नसावं, न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होतोय आणि अन्यायाविरुद्ध वार करायचाय, पण बळच नाहीये अशी अवस्था होते. स्वबळाची ताकद बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिली असं ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं. सत्तेसाठी राजकारणाचं विद्रुपीकरण केलं जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त  केली.

****

नांदेड इथ महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल  महागाई विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं केंद्र सरकार विरूध्द तीव्र निदर्शन केली. परभणी जिल्ह्यातही जिंतूर इथं कॉंग्रेसच्यावतीनं शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव इथं एक एकर जागेमध्ये तीन हजार वृक्ष लागवडीची मोहीम कालपासून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. आनंदवन घनवन योजनेतून एकाच जागी विविध प्रकारचे तीन हजार वृक्ष लागवड करून मियावाकी मिशन २०२१ बळकट करण्यासाठीची ही मोहीम आहे.

जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा इथं काल वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आला. विविध २४० वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक निर्देशात सुधारणा करण्यात आली असून आज सकाळी ६ वाजेपासून निर्बंध शिथील करण्यात आल्याचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केले आहेत. मात्र जिल्ह्यातली धार्मिक स्थळं पुर्णत: बंद राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, लग्न सोहळे  यांना ५० आसन क्षमतेच्या टक्के उपस्थितीत तर अंत्यविधी १०० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संक्रमण वाढलं तर निर्बंध अधिक कडक करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

लातूर शहरात आजपासून ३० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीच्या आजारातून बरे झाल्यानंतर बहुसंख्य रुग्णांना अनेक प्रकारच्या शारिरीक व्याधींना सामोरं जावं लागतं. अशा पोस्ट कोविड रुग्णांना मोफत आयुर्वेदिक उपचार देणारे धुळ्यातले वैद्य जितेश पाठक यांनी आकाशवाणीला सांगितलं...

कोविड समस्यमुळे रुग्ण अधिकच त्रासावलेला असतो. त्यात त्याचे व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान यामुळे बाधित झालेले असते. यामुळे उपचार, मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आर्युवेद व्यासपीठ व आर्युवेद संघ धुळे यांच्यासंयुक्त विद्यमाने पोस्ट कोविड आर्युवेदिक क्लिनिक सुरु झाले आहे. या क्लिनिकद्वारे आर्युवेद तज्ञांचे मार्गदर्शन व नि:शुल्क उपचार केले जातात. हे क्लिनिक ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीनं चालवले जाते.      $6CBFA372-C3EE-43F4-8F9E-EC082

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे मंगल कार्यालयांना टप्याटप्यानं कार्यक्रमासाठी परवानगी मिळवून देण्यात येईल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. लातूर  जिल्ह्यातील मंगल कार्यालयं पूर्ववत सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी मंगल कार्यालय संघटनेच्या शिष्टमंडळानं काल लातूर इथं देशमुख यांची भेट घेऊन  केली, त्यावेळी ते बोलत होते. व्यावसायिकांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून मार्गदर्शक सूचनांचं पालन करीत निर्णय घेतला जाईल, असं ते यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातलं तुळजापूर इथलं श्री तुळजाभवानी मंदिर उघडावं अशी मागणी शहरातल्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर इथल्या व्यापाऱ्यांची आर्थिक उलाढाल ही ९० टक्के मंदिर आणि  भाविक भक्तांवरच अवलंबून आहे, त्यामुळे व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात आहेत असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

लातूर - जहिराबाद महामार्गाचं औराद शहाजनीपर्यंतचं ६५ किलोमीटरचं काम पूर्ण होत आलं आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा तातडीनं वृक्षारोपन करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. औराद ते निटूर दरम्यान करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील अनेक रोपे सध्या दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावं आणि वृक्षाची निगा आणि संगोपन करावं असे आदी निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

//**************//

 

 

 

No comments:

Post a Comment