Friday, 4 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** मराठा आरक्षण प्रकरणी स्थापन कायदेतज्ज्ञ समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सूपूर्द

** म्युकर मायकोसीसवरील उपचारांचे खासगी रुग्णालयांसाठीचे दर निश्चित  

** पावसाळ्या वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

** सांगलीत एका ओढ्याच्या पुरात तीन शेतमजूर महिला वाहून गेल्या; मराठवाड्यातही जोरदार पाऊस; शेतकऱ्यांची तारांबळ

आणि

** नांदेडच्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेस राष्ट्रीय पातळीवरील संस्थेची मान्यता

****

मराठा आरक्षण प्रकरणी स्थापन कायदे तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आज राज्य सरकारकडे सूपूर्द केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. या समितीनं दिलेला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते.

****

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात राज्यशासन गोंधळाचं वातावरण निर्माण करून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केला. राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना खूप विलंबाने झाली, हा आयोग वेळेत निर्माण न झाल्यानं, इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याचं ते म्हणाले. राज्य शासनात धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांऐवजी दुसरेच मंत्री धोरणात्मक विषयावर बोलतात, अशी टीका फडणवीस यांनी केली. प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचे हे प्रयत्न असून, मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.

****

राज्यात म्युकर मायकोसीस - काळी बुरशी आजाराच्या उपचारांचे खासगी रुग्णालयांसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातल्या आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आलं असून, खासगी रुग्णालयांना निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील.

****

केंद्र सरकारच्या आदर्श भाडेकरू कायद्याच्या आराखड्याचा शिवसेनेनं निषेध केला आहे. आज मुंबई बोरिवली तसंच वरळीमध्ये शिवसेनेनं या प्रस्तावित आदर्श भाडेकरू कायद्याच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

****

पाणी वापरण्याच्या सवयी बदलून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. ऊर्जा आणि साधनसामुग्री संस्था - टेरी तर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या जागतिक शाश्वत विकास परिषदेत जावडेकर बोलत होते. विविध कारणांनी वापरण्यायोग्य पाण्याचं प्रमाण कमी होत आहे. उपलब्ध पाण्यापैकी ८५ टक्के पाणी शेतीसाठी वापरलं जातं. सिंचनाच्या वेगळ्या पद्धती वापरुन जलस्रोतांचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे, तसंच घरगुती पाणी वापराचंही अधिक चांगलं नियोजन केलं पाहिजे असं जावडेकर यांनी नमूद केलं.

****

राज्यात टपाल विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. माल वाहतूक करणारी वाहनांना टपाल खात्यानं रुग्णवाहिका म्हणून परिवर्तित केलं आहे. या वाहनांत वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर तसेच कोल्हापूर इथल्या पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसासाठी ही सुविधा उपलब्ध असेल. 

****

येत्या ६ जूनला राज्यातल्या तब्बल ५१ गडांवर शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातले ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

****

पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश वीज महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामं जवळपास पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सिंघल यांनी नमूद केलं.

****

राज्यात आज अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात एका ओढ्याला आलेल्या पुरात तीन शेतमजूर महिला वाहून गेल्या, तर इतर चौघींना वाचवण्यात यश आलं. एकमेकींच्या आधाराने ओढा ओलांडत असतांना, तिघींचा हात सुटला, आणि त्या प्रवाहात वाहून गेल्या, पोलिस या तीन जणींचा तपास करत आहेत.

****

नांदेड शहरात आज सकाळी दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाला, नव्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आलेली हळद या पावसाच्या पाण्यात भिजली. त्यामुळं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीनं गोदाम उपलब्ध करून दिली नसल्यामुळं शेतमालाचं नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी केला आहे.

अर्धापूर तालुक्यात देळुब बुद्रुक ते देळुब खूर्द या दोन गावांना जोडणारा चार महिन्यापूर्वी बांधण्यात आलेला रस्ता आणि रस्त्यावरचा पूल या पावसात वाहून गेल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यात भुईमूग काढणीची कामं या पावसानं खोळंबली असून, काढून झालेल्या शेंगा पावसात भिजल्या आहेत. येत्या हंगामासाठी मशागत करून ठेवलेल्या जमिनीचा सुपीक थर पावसामुळे वाहून गेल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा, हिंगोली, तसंच वसमत तालुक्यात अनेक भागात एक ते दीड तास दमदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईमूग काढणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर नागरिकांची ऊकाड्यातून काही अंशी सुटका झाली.औरंगाबाद शहर परिसरातही आज दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज १३ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर इथल्या चार आणि हिंगोली तसंच जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, घाटीत आज १८ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले आणि १५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात आज नवे २६५ कोविडग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक ५७ रुग्ण बीड तालुक्यात आढळले, त्या खालोखाल केज तालुक्यात ३३ रुग्ण, आष्टी तसंच गेवराई तालुक्यात प्रत्येकी ३१, शिरूर २९, माजलगाव १९, वडवणी १६, धारूर तसंच पाटोदा तालुक्यात प्रत्येकी १५, अंबाजोगाई १४, तर परळी तालुक्यात आज नवे ५ कोविडग्रस्त आढळले.

****

नांदेडच्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेस राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ कॅलिब्रेशन ॲण्ड टेस्टिंग लॅबोरेटरी या संस्थेची मान्यता मिळाली आहे, अशी मान्यता मिळवणारी ही महाराष्ट्रातली दुसरी तर मराठवाड्यातली पहिलीच पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहे. या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचे संचालक डॉ मल्लीनाथ कलशेटी यांचं अभिनंदन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा पातळीवरील नांदेड इथं एक तर कंधार, मुखेड, गोकुंदा, ऊमरी, हदगाव आणि देगलूर अशा एकूण ७ पाणी तपासणी गुणवत्ता प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या प्रयोग शाळांमधून महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, ग्राम पंचायती स्तरावर पिण्याच्या पाण्याची तपासणी करून शुद्धता अथवा विविध आजाराविषयी सावधगिरीची सूचना केली जाते.

****

औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेच्या सहकार्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींनी प्रशासन किंवा अधिकाऱ्यांशी संघर्ष न करता समन्वय साधून योग्य रीतीनं काम करण्याची गरज, आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा आणि शासकीय नियमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, हे कृत्य निंदनीय असल्याचं आमदार दानवे यांनी म्हटलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाख रुपये योगदान देण्यात आलं. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे या रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला. विद्यापीठानं आज पर्यंत ८१ लाख रुपये निधी मुख्यमंत्री सहायता निधीत दिला असल्याचं जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.

****

अहमदनगर इथल्या साई सूर्य नेत्रसेवा संस्थेचे संचालक तसंच नेत्रशल्यचिकित्सक डॉ. प्रकाश कांकरिया यांना फोर्बस् या संस्थेतर्फे इल्युमिनेटींग द वर्ल्ड हा आंतर राष्ट्रीय सन्मान जाहीर झाला आहे. डॉ. कांकरिया यांनी दृष्टीदानाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला असून, या निमित्ताने डॉ कांकरिया यांचं सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

//**********//

 

No comments:

Post a Comment