Saturday, 5 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र कोविड नियम पाळून साजरा;  माझी वसुंधरा अभियानात हिंगोली नगर पालिकेचा राज्यात पहिला क्रमांक

** आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचा बीड इथं मोर्चा; औरंगाबाद जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना अटक

** औरंगाबाद इथं महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन

आणि

** देवगिरी विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर; उद्या सायंकाळी ऑनलाईन वितरण

****

जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र कोविड नियम पाळून साजरा करण्यात आला. या निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आले.

 

गेल्या दशकात ज्या देशांमध्ये वनक्षेत्र वाढलं आहे अशा जगातल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलत होते.गेल्या सहा वर्षात वन आणि वृक्ष क्षेत्र १५ हजार वर्ग किलोमीटरनं वाढलं असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

 

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभागी झालेल्या २२२ नगर पालिकांमधून हिंगोली नगर पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. आज या पुरस्काराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आलं. या अभियानात पृथ्वी, जल, वायू यापैकी एका घटकावर काम करून शहराचा चेहरा बदलण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. हिंगोली पालिकेने पृथ्वी या घटकामध्ये शहरात गेल्या वर्षभरात ५ हजार झाडं लावून त्यांचं संगोपन केलं तर देशी वाणाच्या १५ हजार वृक्षांची रोपवाटिका तयार केली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे

****

औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातल्या गोगाबाबा टेकडी हरितकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिलेल्या पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा संदेशाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. टेकडीवर ६ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद महानगर पालिकेच्यावतीनं आज शहरात खाम नदीपात्रालगत तसंच विविध उद्यानांमधून दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.

****

औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठाच्या वतीने 'पर्यावरण : समस्या आणि उपाय' विषयावर ऑनलाईन व्याख्यान घेण्यात आलं. शाश्वत विकास अभ्यासक, प्राध्यापक एच. एम. देसरडा यांनी या व्याख्यानात, निसर्गाला उपभोग्य वस्तू समजू नये अन्यथा अवघ्या विश्वाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असं मत व्यक्त केलं.

****

हिंगोली इथं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने वृक्ष लागवड करुन वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

परभणी इथं उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला. मानवत, गंगाखेड तसंच इतर तालुक्यातही वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

जालना इथं शहरातल्या हुतात्मा चौकात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

****

कोविड महामारीमुळे ज्या परदेशी नागरिकांचा भारतीय व्हिसा किंवा भारतातील निवासासाठीचा पूर्वनिश्चित कालावधी ३० जून २०२१ नंतर संपत असेल तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे परिचालन सुरु झाल्याच्या दिवसानंतर आणखी ३० दिवसांसाठी तो वैध आहे असे मानण्यात येईल. कोविडमुळे, व्यावसायिक विमानांची सामान्य परिचालन सेवा उपलब्ध नसल्याकारणाने मार्च २०२० पूर्वी वैध भारतीय व्हिसावर भारतात आलेले अनेक परदेशी नागरिक भारतात अडकून पडले आहेत. अशा परदेशी नागरिकांना टाळेबंदीच्या काळात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला.

****

मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीनं आज बीड इथं आरक्षण मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते, कोविड विषयीचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेऊन क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण मोर्चा आणि रायगड इथं शिव राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्याना औरंगाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी आज अटक करण्यात आली. पैठण औद्योगिक परिसर आणि बिडकीन पोलीस ठाण्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि स्वाभिमानी छावा मराठा संघटनेच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. औरंगाबादहून बीडला जात असतांना काही कार्यकर्त्यांना पाचोड पोलीसांनी ताब्यात घेतलं.

****

नंदुरबार  इथले  भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठीं निशा पावरा यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तपासणी पथकाने वाळू वाहतुक करणारा ट्रक दोन तास अडवला, त्यावेळी चौधरी यांच्याशी वाद झाला. दरम्यान, गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळु ट्रक अडवून पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कोणालाही मारहाण केली नसून संबंधीत महिला तलाठी या पाय अडकून खाली पडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

****

कोविड काळात काम न मिळाल्यामुळे लोककलावंतांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणार असल्याचं,गायक आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. वयोवृद्ध कलाकारांना सध्या सरकारकडून मिळत असलेलं दीड हजार रुपये मानधन पाच हजार रुपये करावं यासाठी महामंडळ पाठपुरावा करत असून गेल्या आठवड्यात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची यासंदर्भात भेट घेऊन मागणी केली असल्याचं महामंडळाचे संस्थापक डॉ.प्रशांत होर्शिळ यांनी सांगितलं.

****

देवगिरी विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रिंट मीडिया श्रेणीत जालन्याचे संजय प्रभाकर देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत शहाद्याचे जगदीश एकनाथ जयस्वाल, न्यूज पोर्टल श्रेणीत जळगावचे शेखर पाटील तसंच सोशल मीडिया मुक्त लेखनासाठी भुसावळचे निलेश सुभाष वाणी यांना गौरवण्यात येणार आहे. उद्या रविवारी सायंकाळी ऑनलाईन सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या यु-ट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद इथं आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत आठ कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या दोन तर  अहमदनगर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात आज सकाळी २६ नवे कोविडग्रस्त उपचारासाठी दाखल झाले, तर १५ रुग्ण संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार २७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २८ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ५०८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या २२९  रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५८ हजार ७६३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ७१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज २४३ नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ३९ रुग्ण, बीड तालुक्यात त्या खालोखाल ३८, पाटोदा ३४, केज तसंच माजलगाव प्रत्येकी २९, धारूर २०, अंबाजोगाई १६, गेवराई १४, शिरूर तसंच वडवणी प्रत्येकी १० तर परळी तालुक्यात आज नवे ४ रुग्ण आढळले.

****

धुळ्याचे  सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल आणि रानमळा गावचे सरपंच प्रवीण पवार यांनी स्वतःच्या मालकीची जमीन, कोरोना विषाणू संसर्गामुळे बळी गेलेल्या रुग्णांचे  अंत्यविधी करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. अशा रुग्णांचे अंत्यविधी नागरी वस्तीतल्या स्मशानभूमीत करण्याला लोक विरोध करतात मात्र असतांनाही अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत या दोघांनी जिल्हा प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्यासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे.

****

 

No comments:

Post a Comment