Sunday, 6 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा - शिवस्वराज्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा

** मराठा आरक्षणासाठी १६ जूनला पहिला मोर्चा - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

** नांदेड जिल्ह्यात उद्यापासून ‘स्तर एक’नुसार निर्बंध शिथील; परभणीत बाजारपेठांना चार वाजेपर्यंत व्यवहारांना उद्यापासून परवानगी

आणि

** १२ ते १८ वयोगटावर कोविड लसीच्या परिणामांबाबत नागपुरात परीक्षणाला प्रारंभ

****

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा - शिवस्वराज्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेच्या मनातलं, लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं, रयत आणि मातृभूमीच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं नमूद करत शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेत रयतेचं राज्य-हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं.

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर राज्‍याभिषेक सोहळा परंपरागत पध्दतीनं, मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी बोलताना, शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची सूचना केली. दरम्यान, आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असून सामान्य मराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून हा पहिला मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मिना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले यांच्या हस्ते शिवशक राजदंडाचं प्रतीक म्हणून गुढी उभारण्यात आली. यावेळी चंद्रशेखर ठाकूर आणि सरिता डाकूरकर यांच्या संचानं शिवगीतं तसंच पोवाडे सादर केले. पैठण इथं गागाभट्ट चौकात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला

****

नांदेड इथं शिवस्वराज्य दिनाचा मुख्य समारंभ आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात साजरा झाला. नांदेड इथं जिल्हा परिषद प्रांगणात नांदेड जिल्हा परिषदे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या. नांदेड इथं पंचायत समिती कार्यालयातही शिवस्वराज्य दिन साजरा झाला.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

जालना इथं जिल्हा परिषद प्रांगणात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

****

परभणी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

****

हिंगोली इथं जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केलं.

****

उस्मानाबाद इथं जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं.

बीड इथं जिल्हा परिषद प्रांगणात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांना त्यांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या.

****

देवगिरी विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार आज सायंकाळी ऑनलाईन सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. यंदाचे पुरस्कार काल जाहीर झाले. प्रिंट मीडिया श्रेणीत जालन्याचे संजय प्रभाकर देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत शहाद्याचे जगदीश एकनाथ जयस्वाल, न्यूज पोर्टल श्रेणीत जळगावचे शेखर पाटील तसंच सोशल मीडिया मुक्त लेखनासाठी भुसावळचे निलेश सुभाष वाणी यांना गौरवण्यात येणार आहे. देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या यू-ट्यूब चॅनलवर आज संध्याकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव्याच्या राज्य शासनानं केलेल्या स्तरनिहाय वर्गवारीअंतर्गत उद्यापासून ‘स्तर एक’नुसार निर्बंध शिथील करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉक्टर  विपीन इटनकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोविड बाधितांचं प्रमाण,शासनासह नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे सद्यस्थिती नियंत्रणात असून कोविड उपचारात ऑक्सिजन खाटांवरील रुग्ण प्रमाणही कमी आहे. याबाबतची आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यात ‘स्तर एक’नुसार निर्बंध शिथील होत आहेत.

****

परभणी इथं जिल्हा प्रशासनानं उद्या सात जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांना सायंकाळी चार वाजेपर्यंत व्यवहारास आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत संचाराला मुभा दिली आहे. यावेळेनंतर संचारबंदी लागू असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे  शनिवार- रविवार या दोन दिवस अत्यावश्यक सेवांचा अपवाद  वगळता  बाजारपेठ पूर्णतः बंद राहील असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

****

१२ ते १८ वयोगटावर कोविड लसीच्या परिणामांबाबत नागपुरात परीक्षणाला आजपासून प्रारंभ झाला. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीसाठी १२ ते १८ वयोगटातल्या निवड केलेल्या ५० मुलांना आज लसीची पहिली मात्रा देण्यात आली. २८ दिवसानंतर लसीची दुसरी मात्रा देण्यात येईल, यानंतर या लसीच्या परिणामांचा तसेच अँटिबॉडी प्रतिपिंड निर्मितीचा पुढच्या २०८ दिवसांमध्ये अभ्यास केला जाईल. या संशोधनाचे नागपुरातले मुख्य संयोजक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले....

झिरो डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसानंतर किंवा त्याच्यानंतर दोन दिवस जास्त चालतात. २८ ते ३० दिवसाच्या अंतराने दुसरा डोस देणार आणि त्यानंतर मग कोविड ॲन्टीबॉडीज ज्या आपल्याला कुठल्याही व्हॅक्सीन दिल्यानंतर डेव्हलप होतात, त्या डेव्हलप होण्यासाठी परत आम्ही तीनदा मुलांना बोलावणार आहे. असा हा कोर्स पूर्ण २०८ दिवसाचा म्हणजे अंदाजे सात ते आठ महिन्यांचा कोर्स आहे.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत बारा कोविडग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये लातूर, चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयात आज सकाळी २१ नवे रुग्ण दाखल झाले, तर २३ रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना सुटी देण्यात आली.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार २९ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ५२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार ५६० झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ८४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५८ हजार ८४७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे १८१ रुग्ण आढळले. यापैकी आष्टी तालुक्यात ३८ रुग्ण, बीड ३०, केज २९, गेवराई तसंच वडवणी तालुक्यात प्रत्येकी १६, माजलगाव १२, अंबाजोगाई ११, धारूर तसंच शिरुर प्रत्येकी १०, पाटोदा ८ तर परळी तालुक्यात आज कोविड संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला आहे.

****

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्याची घाई करू नये असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केलं आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचं काम पूर्ण केलं आहे. मात्र, किमान ८० ते १०० मिलीमीटर हंगामी पाऊस पडल्यानंतरच शेताला वापसा मिळेल, त्यानंतरच खरीप हंगामातील पेरणीचा निर्णय घ्यावा असं सूचित करण्यात आलं आहे. तसंच पेरणीपूर्वी रायझोबियम, अझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जीवाणूसंवर्धक औषधींची बीज प्रक्रिया करून आपल्या रासायनिक खतावरील खर्च कमी करावा असं आवाहनही करण्यात आलं आहे.

//*********//

 

 

No comments:

Post a Comment