Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08
June 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित
राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण
करून घ्यावं.कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि
१०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
**
केंद्राकडे प्रलंबित प्रश्नांवर पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील - पंतप्रधानांसोबतच्या
बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अपेक्षा
** अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र
रद्द; २ लाख रुपये दंड
** औरंगाबाद इथं आज पाच
कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात नवे १३२ रुग्ण
आणि
** महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - एमटीडीसीची विश्रामगृहं पर्यटकांसाठी पुन्हा खुली
****
केंद्राकडे
प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची नवी दिल्ली इथं त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, उपमुख्यमंत्री
अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे या भेटीवेळी उपस्थित होते.
या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार
परिषदेत बोलताना, मराठा आरक्षण, मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील
आरक्षण, राज्यांना देय असलेली वस्तू आणि सेवा कर - जीएसटीची भरपाई
अशा अनेक मुद्यांवर पंतप्रधानांसमवेत
सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. याशिवाय इतरही अनेक विषयांबाबत मुख्यमंत्र्यांनी
पंतप्रधानांना निवेदनं सादर केली. या संयुक्त भेटीशिवाय मुख्यमंत्र्यांनी
स्वतंत्रपणे पंतप्रधानांशी सुमारे अर्धा तास खासगीत संवाद साधला.
दरम्यान, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि
पंतप्रधान यांच्या या भेटीचं स्वागत केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या निमित्तानं संवाद सुरू झाल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी
बोलतांना दिली.
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे राजे भोसले यांनी मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या
भेटीवर टीका केली आहे. ते आज सातारा इथं बोलत होते. मराठा
आरक्षण हा विषय पंतप्रधानांनी ऐकून घेतला. मात्र, काही आश्वासन दिलं नसून, आजची भेट ही फक्त राजकीय
तडजोडीसाठी झाली असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या भेटी आधी या मुद्यावर अधिवेशन बोलावणं आणि चर्चा होणं गरजेचं होतं, असंही उदयनराजे यांनी
नमूद केलं.
मराठा
आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही या भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळालं नसल्याबद्दल
खंत व्यक्त केली. पंतप्रधानांची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्यसरकारने
करून घेऊ नये, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
या
बैठकीकडे मी आणि समाज एकाच अँगलने बघत होतो की, मराठा आरक्षण ही जबाबदारी नेमकं राज्य
सरकारची की ही जबाबदारी नेमकं केंद्र सरकारची हे या ठिकाणी सिद्ध झालेलं नाही. मी तर
म्हणेल आश्वासन पण आज मिळालेलं नाहीये. त्यामुळे कृपया करुन राज्य सरकारनं हा गैरसमज
करु नये की आज त्यांची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो. आम्हाला जोपर्यंत आमच्या पदरामध्ये
आरक्षण व आरक्षणाच्या पर्यायी व्यवस्था मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
****
राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे.
या योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
मंत्रालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. सुक्ष्म, लघु, मध्यम
वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचं
पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री देसाई यांनी
व्यक्त केला.
****
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने
रद्द करत, त्यांना २ लाख रुपये दंड ठोठावला आहे. जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र
रद्द करुन बनावट जात प्रमाणपत्र ६ आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले
आहेत.
****
उपराष्ट्रपती
आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेवर निवडून आलेल्या २
तसंच २ मनोनित सदस्यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ दिली. केरळमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाचे नेते व्ही सिवदासन, आणि पत्रकार जॉन ब्रिटास तसंच मनोनित सदस्य स्वपन दासगुप्ता
आणि ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. कोविड
संकट लक्षात घेवून सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे नियम-निर्देश पाळून नवनियुक्त सदस्यांची
आसन व्यवस्था करण्यात आली होती.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २७ जूनला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे आपले विचार
व्यक्त करतील. नमो ऍप, माय गव्ह या संकेतस्थळावर, १९२२ किंवा १८०० - ११ - ७८०० या नि:शुल्क
क्रमांकावर नागरिकांना आपले विचार आणि सूचना पाठवता येतील.
****
शैक्षणिक
संस्था आकारत असलेल्या शुल्क नियमनासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई,
पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद अशा पाच विभागीय शुल्क नियामक समित्या स्थापन केल्या
आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद असतानाही अनेक शाळांनी शुल्कवाढ केल्याच्या
तक्रारी शिक्षणमंत्र्यांकडे येत होत्या, या शुल्कवाढीविरोधात पालकांना या समित्यांकडे
दाद मागता येईल.
****
राज्यातल्या
जनतेसाठी एकरकमी धनादेश देऊन कोविड लस खरेदी करण्याची तयारी असलेल्या महाविकास आघाडी
सरकारने, या वाचलेल्या सात हजार कोटी रुपये निधीतून, गोरगरीबांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी केंद्रीय
मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली आहे. याबाबत आज जाहीर केलेल्या एका प्रसिद्धी
पत्रकात दानवे यांनी, टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांसह, शेतकरी, बारा
बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक यासर्वांकरता पॅकेज जाहीर
करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रं केंद्र सरकारने
हाती घेतल्यामुळे राज्यातला लसीकरणाचा गोंधळ संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पाच कोविड बाधितांचा आज शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत उपचारादरम्यान
मृत्यू झाला. जिल्ह्यात कोविड संसर्गानं आतापर्यंत तीन हजार २८९ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४३ हजार ९४६ झाली असून एक
लाख ३८ हजार ४१६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
****
बीड जिल्ह्यात आज १३२ नवे कोविडग्रस्त आढळले. यामध्ये आष्टी तालुक्यात २८, अंबाजोगाई
तसंच केज तालुक्यात प्रत्येकी २३, बीड १४, शिरुर ११, माजलगाव १०, पाटोदा नऊ, धारूर
५, गेवराई तसंच वडवणी तालुक्यात प्रत्येकी ४, तर परळी तालुक्यात आज एक कोविडग्रस्त
रुग्ण आढळला.
****
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पूर्व तयारीच्या अनुषंगाने
परभणी जिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी तसंच अधिपरिचारिकांसाठी पहिल्या टप्प्यातलं
प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १४
जूनपर्यंत चालणाऱ्या या शिबीरात पाच वैद्यकीय अधिकारी, एक परिसेविका आणि दहा अधिपरिचारिकांना
प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार इतर अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
****
कोविड प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - एमटीडीसीची विश्रामगृहं पर्यटकांसाठी पुन्हा खुली
करण्यात आली आहे. यासाठीचं ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आलं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येत्या काळात सवलती देण्यात येणार
असल्याची माहितीही एमटीडीसीच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे
यांनी दिली आहे. राज्यात एमटीडीसीची एकूण ३३ विश्रामगृहं
आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची हक्काची रक्कम संबंधीत
रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकारनं पेरणीपूर्व तातडीनं वितरीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा शाखेच्यावतीनं आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर
निदर्शनं करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या कार्यालयासमोर ठाण मांडून
पीकविम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी काळे
झेंडे आणि फलकही आणले होते.
दरम्यान, मानवत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तत्काळ आणि सरसकट पीककर्ज देण्यात यावं अशी मागणी शिवसेना मदत केंद्राच्यावतीने तहसीलदार
डी.डी.फुफाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज
एका निवेदन तहसीलदार फुफाटे यांना सादर करण्यात आलं.
****
भंडारा जिल्ह्यात वीज पडून ३ जणांचा मृत्यू तर २ जण गंभीर
जखमी झाले. मोहाडी तालुक्यातील खमारी
गावात घडली आहे.
****
राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचं आयोजन
करण्यात आलं आहे. याअंतर्गत वनविभागातर्फे नागरिकांना सवलतीच्या दरात रोपं पुरवण्यात
येणार आहेत. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यापुढेही अखंडपणे चालू राहावा म्हणून, सवलतीच्या
दरात रोपं पुरवली जाणार आहेत.
//**************//
No comments:
Post a Comment