Thursday, 3 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०३ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जागतिक सायकल दिवस आज पाळण्यात येत आहे. प्रवासाच्या या सर्वात सोप्या आणि आरोग्यदायी माध्यमाचा उपयोग करुन, पर्यावरणाचं वायू प्रदूषणापासून संरक्षण करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. शहरातले रस्ते सायकल अनुकूल बनवण्याची गरज, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली.

****

लष्कर आणि पोलिस भरतीसह विविध प्रकारच्या भरतीसाठी चालवण्यात येणारं बोगस रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. पुण्यातून हे रॅकेट चालवलं जात होतं. इच्छुक उमेदवारांकडून चार ते पाच लाख रुपये घेऊन त्यांना भरतीचं खोटं आश्वासन दाखवलं जात होतं.

****

राज्यातली टाळेबंदी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तात्काळ घ्याव्यात, अशी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचं, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या काँग्रेस भवनचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, हे ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही, पटोले यांनी केला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बेंबळी गावासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. काल या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. 

दरम्यान, बेंबळी इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जेष्ठ नेते माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू शेतकऱ्यांना ५० पोते खताचं वाटप करण्यात आलं.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं चार कोटी नऊ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

****

इतर मागास प्रवर्ग - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्याच्या मागणीसाठी, भारतीय जनता पक्ष आज राज्यभर आक्रोश आंदोलन करणार आहे. भाजपचे आमदार अतुल सावे यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

****

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट संघ आणि कर्णधार मिताली राज हीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ आज पहाटे इंग्लंडला रवाना झाला. दोन महिने चालणाऱ्या या दौऱ्यात पुरुष संघ पाच कसोटी सामने खेळणार आहे.

****

No comments:

Post a Comment