Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०४ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित
राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण
करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६
आणि १ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या
मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले निर्बंध
कायम - राज्य सरकारचं स्पष्टीकरण.
·
राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय.
·
नैऋत्य मोसमी पाऊस केरळात पोहोचला, येत्या दहा जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल
होण्याची शक्यता.
·
शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं
बँकांना आवाहन.
·
राज्यात १५ हजार २२९ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ४९ जणांचा मृत्यू तर
एक हजार ९५ बाधित.
·
आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार.
·
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘ओबीसीं’चं आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी
ठरल्याचा आरोप करत, भारतीय जनता पक्षाचं ठिकठिकाणी आक्रोश आंदोलन.
आणि
·
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची आजीवन काळासाठी वैधता.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात लावण्यात आलेले
संपूर्ण निर्बंध कायम असून ते हटवण्यात आले नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
संसर्ग अजूनही पूर्णपणे संपलेला नसून ग्रामीण भागात काही ठिकाणी तो वाढत आहे. या संसर्गाच्या
विषाणुचं घातक आणि बदलतं रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा
लागेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन
परिषदेच्या काल झालेल्या बैठकीनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी
राज्यातल्या १८ जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवहार पूर्णपणे सुरु होणार असल्याचं सांगितलं
होतं, त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काही वेळातच मुख्यमंत्री
कार्यालयानं पत्रक जारी करुन निर्बंध कायम असल्याचं स्पष्ट केलं. काही निर्बंध शिथिल
करायला सुरुवात केली आहे, निर्बंध शिथिल करण्यासाठी त्या आठवड्यात संसर्गाचे रुग्ण
सापडण्याचा दर आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता हे निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांच्या
आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना अधिसुचित करण्यात
येईल. या निकषांच्या आधारे टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून,
जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेण्यात येत आहे. या आढाव्यानंतर
अंमलबजावणीचा विचार केला जाईल असं शासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा
निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल आपत्ती
व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचं, राज्याचे मदत आणि
पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
डिझॅस्टर मॅनेजमेंटने हा निर्णय घेत असतांना केवळ आमच्या अधिकारात या परीक्षा
रद्द करण्यास आजची परिस्थिती पाहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाला घेऊन आधीच
सुतोवाच केलेलं होतं. परंतू काही लोकांचा परीक्षा रद्द करण्याला विरोध होता. परंतू
आता ती भूमिका माननीय पंतप्रधान यांनी बारावीच्या परीक्षेसंदर्भात मांडली. हा निर्णय
राज्य सरकारने आणि एसडीएम ने घेतलेला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा
निर्णय घेतलेला आहे.
दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका
मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे. परीक्षा घ्यायची किंवा नाही, परीक्षेसाठी
परिस्थिती अनुकूल आहे किंवा नाही, हे सरकारचे धोरणात्मक निर्णय असतात. न्यायालयाच्या
आदेशानं परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षांर्थींचं नुकसान झालं तर जबाबदारी कोण घेणार
असा सवाल मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी विचारला.
****
नैऋत्य मोसमी पाऊस केरळच्या दक्षिण भागात काल दाखल झाला. भारतीय हवामानशास्त्र
विभागानं ही माहिती दिली असून, येत्या दहा तारखेपर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची
शक्यता वर्तवली आहे. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं केरळमध्ये दोन दिवस उशिरा आगमन झालं
आहे. देशात सरासरी पर्जन्यमान साधारण राहील असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय
मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. गेली दोन वर्ष देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.
****
राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय
पेरणी करू नये, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर
पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते, त्यामुळे ८० ते १०० मिली मीटर पाऊस झाल्यावर
पुरेशा खोलीपर्यंत ओलावा जातो आणि खंड पडला तरी पीक तग धरू शकतं, असं विभागानं म्हटलं
आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह
पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दोन ते तीन दिवसात जालना, परभणी, हिंगोलीमध्ये मुसळधार
पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्यामुळे, बँकांनी
शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यस्तरीय बँकर्स समितीची
बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत राज्याच्या २०२१-२२ साठीच्या चार लाख ६०
हजार ८८१ कोटी रुपयांच्या पतआराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे
उद्दिष्ट एक लाख १८ हजार ७२० कोटी रुपये असून, यामध्ये पिक कर्जासाठीचं उद्दिष्ट ६०
हजार ८६० कोटी रुपये इतकं आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभरितीनं आणि वेळेत कर्जाची उपलब्धता केलीच पाहिजे,
असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. नागपूर, नंदूरबार, धुळे, नाशिक, उस्मानाबाद,
बुलढाणा, बीड या जिल्ह्यांच्या सहकारी बँका अडचणीत आहेत, त्यांना नाबार्डनं पुन्हा
वित्तपुरवठा करावा, कारण या बँकांना वित्तपुरवठा न झाल्यास, त्या जिल्ह्यातले शेतकरी
कर्ज पुरवठ्यापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहतील, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यात काल १५ हजार २२९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख ९१ हजार ४१३ झाली आहे. काल ३०७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९७ हजार ३९४
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला आहे. काल २५ हजार ६१७ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७३ शतांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात दोन लाख चार हजार ९७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल एक हजार ९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४९
जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २२, औरंगाबाद नऊ,
बीड सात, परभणी चार, उस्मानाबाद तीन, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी
दोन रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले ३२२ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १८६,
उस्मानाबाद १७९, नांदेड १३२, लातूर १२३, जालना ८८, परभणी ५०, तर हिंगोली जिल्ह्यात
काल १५ नवे रुग्ण आढळून आले.
****
म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांसंबंधी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात म्यूकरमाकोसिसचे
रुग्ण वाढत असून, मराठवाड्यात मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याची बाब केंद्र शासनाच्याही
निदर्शनास आणून द्यावी, अशी सूचनाही खंडपीठानं केली आहे.
****
राज्य सरकारनं काल मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती जाहीर केली. यामुळे
आता मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला शिफारस करण्याच्या प्रक्रियेला
वेग येणार आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या आयोगाची मुदत संपुष्टात आल्यानंतर
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची नियुक्ती करण्यात
आली होती. नव्या सदस्यांमध्ये प्राचार्य बबनराव तायवाडे, चंद्रलाल मेश्राम, बालाजी
किल्लारीकर, संजीव सोनावणे, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलिमा सराप, डॉ. गोविंद काळे, प्राचार्य
लक्ष्मण हाके आणि अलका राठोड यांचा समावेश आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान,
विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. मात्र बारा जुलैपासून म्हणजेच प्रतिपदेपासून
पौर्णिमेपर्यंत, भाविकांना ‘ऑन लाईन’ पध्दतीनं श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन चोविस
तास घेता येणार असल्याचं, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं.
यासंदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मानाचे वारकरी, दिंडेकरी
आणि मानाचे महाराज अशा १९५ मंडळींना दर्शन घेण्यास परवानगी राहील. पंढरपुरातील फडकरी
आणि येणाऱ्या दिंड्यांना नगरप्रदक्षिणा करण्याची, तसंच पांडुरंगाच्या रथालासुद्धा विठ्ठल
मंदिराला प्रदक्षिणा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं जाणार आहे. गव्हर्नर
शक्तीकांत दास हे सकाळी दहा वाजता हे पतधोरण जाहीर करतील. परवा - बुधवारपासून बँकेच्या
पतधोरण आढावा समितीची या संदर्भातली बैठक सुरू आहे.
****
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इतर मागास प्रवर्ग- ‘ओबीसीं’चं आरक्षण टिकवण्यात
राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, भारतीय जनता पक्षातर्फे काल ठिकठिकाणी आक्रोश
आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन
न केल्यामुळे हा अन्याय झाल्याचा आरोपही या निमित्त करण्यात आला. औरंगाबादमध्ये क्रांती
चौक इथं आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनाच्या निषेधाचे फलक झळकावत, आंदोलनकर्त्यांनी
यावेळी घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे क्रांतीचौकात काही काळ वाहतूक खोळंबली होती.
परभणी इथं भालचंद्र गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष
नितीन काळे यांनी आंदोलकांचं नेतृत्त्व केलं.
****
राज्यात इतर मागास प्रवर्ग ‘ओबीसीं’च्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या आरक्षणासाठी,
आता सर्वांनी एकत्र येत एक चळवळ सूरू करण्याची गरज असल्याचं, मंत्री छगन भुजबळ यांनी
म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्तते अभावी स्थगित
केलं, मात्र आता यावरून कोणीही राजकारण न करता, सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण गरजेच
असल्याचंही ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष इतर मागास प्रवर्गासाठी आंदोलन करत असून त्याचं
स्वागत केलं पाहिजे, कारण आता या आरक्षणाच्या मुद्द्यात केंद्राची देखील मदत लागणार
असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राची वैधता आजीवन काळासाठी वाढवल्याची
घोषणा, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. त्यामुळे एकदा
ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवाराला पुन्हा पात्रता परीक्षा द्यावी लागणार नाही.
या प्रमाणपत्राची वैधता यापूर्वी सात वर्षांसाठी होती. हा निर्णय २०११ पासून पूर्वलक्ष्यी
प्रभावानं लागू होणार असल्याचं निशंक यांनी सांगितलं. या निर्णयाच्या अनुषंगानं जुनी
प्रमाणपत्रं नव्यानं जारी करणं, आवश्यक तिथं नवी प्रमाणपत्रं जारी करणं इत्यादी कारवाई
संबंधित राज्य सरकारांनी करावी, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.
****
विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर, काल हिंगोली जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्ह्यातली
परिस्थिती, ‘म्युकरमायकोसिस’ची रुग्णसंख्या, लसीकरण व्यवस्था, लससाठा, ‘पीएम केअर’
निधीतून करण्यात आलेली प्राणवायू व्यवस्था याची माहिती घेत त्यांनी उपचार केद्रांना
भेट देऊन पाहणी केली.
****
दिवंगत केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी
निमित्त, त्यांचं छायाचित्र असलेल्या एका टपाल पाकिटाचं लोकार्पण, भाजपचे राष्ट्रीय
अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे काल करण्यात आलं.
बीड जिल्ह्यातल्या गोपीनाथ गड इथं झालेल्या अभिवादन कार्यक्रमात, खासदार प्रीतम मुंडे,
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना अभिवादन केलं. गोपीनाथ मुंडे यांनी वंचित, पिडीत,
मागासलेल्यांसाठी केलेल्या कार्याचा वसा आपण तसाच पुढे चालू ठेवणार असून, याची सुरुवात
इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणापासून करणार असल्याचं, पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरच्या बस वाहतुकीला परवानगी द्यावी अशी
मागणी, परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना केली आहे.
याबाबत येत्या दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ, असं जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट
केलं.
****
पंतप्रधान कल्याण निधीतून औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयांना प्राप्त झालेल्या
ऑक्सिजन यंत्रांची काल दिल्लीहून आलेल्या दोन डॉक्टरांनी पाहणी केली. केंद्र सरकारनं
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रानंतर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार हे
पथक तपासणीसाठी दाखल झालं आहे.
****
औरंगाबाद शहरात ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम राबवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं
घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जास्त वेळ थांबावं लागू नये यासाठी
त्यांना कारमधून न उतरता लस दिली जाणार आहे. येत्या सोमवारपासून प्रोझोन मॉलच्या पार्किंगमध्ये
ही मोहिम राबवली जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment