Friday, 4 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०४ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं. पतधोरण समितीने असा दृष्टिकोन स्वीकारला की विकासाची गती पुन्हा वाढवण्यासाठी आणि वृद्धीदर कायम राखण्यासाठी सर्व बाजूंनी धोरणात्मक पाठिंब्याची गरज आहे, हा विचार करुनच प्रमुख धोरणात्मक दर तेच कायम ठेवण्यात आले आणि समावेशक भूमिकाही पुढे कायम ठेवण्याचे निश्चित करण्यात आल्याचं दास यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात लावण्यात आलेले संपूर्ण निर्बंध हटवण्यात आले नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. संसर्ग अजूनही पूर्णपणे संपलेला नसून ग्रामीण भागात काही ठिकाणी तो वाढत आहे. या संसर्गाच्या विषाणुचं घातक आणि बदलतं रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आलं आहे.

****

राज्यात कृषी प्रक्रिया आणि मालाची विक्री, मूल्यसाखळीचं बळकटीकरण यासाठी विविध योजनांची सांगड घालण्यासाठी, कृषि प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचं, कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादन निहाय मानकं निश्चित करावी, असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

****

कांद्याचे भाव वाढल्यास देशातल्या नागरिकांना योग्य भावात कांदा उपलब्ध व्हावा या उद्देशानं, केंद्र सरकारकडून कांदा स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेडमार्फत गेल्या पाच-सहा वर्षांपासून, कांदा खरेदी केली जात आहे. मात्र नाफेडनं नेमलेल्या कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेनं, काल लासलगाव बाजार समितीत नाफेड करता कांदा खरेदीची बोली लावल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावच बंद पाडले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

****

परभणी शहरात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लघंन करणाऱ्या आणि विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरूद्ध, कारवाई करण्यासंबधी महापालिका उपायुक्त प्रदीप जगताप यांनी काल आदेश दिले आहेत. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment