Saturday, 5 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात ब्रेक दी चेन अंतर्गत लागू निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय; कोविड संसर्गदर आणि प्राणवायू रुग्णखाटांच्या वापरानुसार जिल्ह्यांचं पाच टप्प्यात वर्गीकरण.

·      म्युकर मायकोसीस - काळी बुरशी आजाराच्या उपचारांचे खासगी रुग्णालयांसाठीचे दर निश्चित.

·      राज्यात काल १ हजार १५२ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात ५२ रुग्णांचा मृत्यू तर ९८४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद.

·      मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पुनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची कायदे तज्ज्ञ समितीची शिफारस.

·      सीबीएसईच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समिती स्थापन.

·      गॅस एजन्सीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला औरंगाबाद इथं अटक.

·      उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश.

आणि

·      आज जागतिक पर्यावरण दिन.

****

राज्यात ब्रेक दी चेन अंतर्गत लागू निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारनं काल जारी केली. कोविड संसर्ग दर आणि प्राणवायू रुग्णखाटांचा वापर, या निकषाच्या आधारे जिल्ह्यांची पाच टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. परवा सात जून पासून राज्यभरात हे नियम लागू होतील.  संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आणि प्राणवायू रुग्णखाटा २५ टक्क्यांपेक्षा कमी वापरात असलेले जिल्हे पहिल्या टप्प्यात येतील. अशा जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु राहतील.

 

संसर्ग दर पाच टक्के आणि प्राणवायू रुग्णखाटांचा वापर २५ ते ४० टक्के दरम्यान असलेले जिल्हे दुसऱ्या टप्प्यात येतील. या जिल्ह्यांमध्ये बांधकाम, कृषी सेवेसह सर्व व्यवहार सुरु होतील. उपाहारगृहं, मॉल्स, सिनेमागृह, जिम, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेनं सुरु होतील.

 

संसर्ग दर पाच ते दहा टक्के आणि प्राणवायू रुग्णखाटांचा वापर ४० टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे तिसऱ्या टप्प्यात येतात. या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवांसह इतर दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवारी आणि रविवारी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

 

संसर्ग दर १० ते २० टक्के आणि प्राणवायू रुग्णखाटांचा वापर ६० टक्क्यांच्या वर असलेले जिल्हे चौथ्या टप्प्यात येतील. या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील, इतर सर्व व्यवहार बंद राहतील. सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम असेल.

 

संसर्ग दर २० टक्क्यांच्या वर आणि प्राणवायू रुग्णखाटांचा वापर ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे पाचव्या टप्प्यात येतील. या जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार आणि रविवार वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.

 

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातल्या हिंगोली, जालना, नांदेड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्हा दुसऱ्या टप्प्यात तर बीड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे.

****

राज्यात म्युकर मायकोसीस - काळी बुरशी आजाराच्या उपचारांचे खासगी रुग्णालयांसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातल्या आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंजूरी दिली. दरनिश्चिती करतांना शहरांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे, हे वर्गीकरण यापूर्वी कोविड उपचारासाठी केलेल्या वर्गीकरणाप्रमाणेच आहे. खासगी रुग्णालयांना निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही अधिसूचना ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील.

****

राज्यात काल १ हजार १५२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५ लाख पाच हजार ५६५ झाली आहे. काल २८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, हजार ७७१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक सात दशांश टक्के झाला आहे. काल २ हजार ८५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५ लाख सात हजार ५८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ९६ हजार ८९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ९८४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५२ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २०, औरंगाबाद १२, बीड दहा, परभणी चार, तर जालना, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले २६५ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १९३, उस्मानाबाद १६०, नांदेड १५०, लातूर ८१, जालना ७७, परभणी ४४, तर हिंगोली जिल्ह्यात काल १४ नवे रुग्ण आढळून आले.

****

नांदेड जिल्ह्यातली एक हजार ५४० गावं कोरोना विषाणू मुक्त झाली आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातल्या अंगणवाडी सेविकेपासून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंतची सर्व यंत्रणा पूर्ण सक्षमतेनं कार्यरत राहिल्यामुळे जिल्ह्याला हे यश साध्य करता आल्याचं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पुनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस, या प्रकरणी स्थापन कायदे तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं काल आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला, त्यात ही शिफारस केल्याचं, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं. ४० हून अधिक कायदेशीर मुद्यांच्या आधारे ही पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, असं समितीनं म्हटलं असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

****

पाणी वापरण्याच्या सवयी बदलून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. ऊर्जा आणि साधनसामुग्री संस्था - टेरी तर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या जागतिक शाश्वत विकास परिषदेत जावडेकर बोलत होते. सिंचनाच्या वेगळ्या पद्धती वापरुन जलस्रोतांचं व्यवस्थापन तसंच घरगुती पाणी वापराचंही अधिक चांगलं नियोजन करण्याची गरज जावडेकर यांनी व्यक्त केली.

****

राज्यात टपाल विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना टपाल खात्यानं रुग्णवाहिका म्हणून परिवर्तित केलं आहे. या वाहनांत वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर तसेच कोल्हापूर इथल्या पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसासाठी ही सुविधा उपलब्ध असेल. 

****

उद्या ६ जूनला राज्यातल्या तब्बल ५१ गडांवर शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातले ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

****

केंद्रीमाध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती १० दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव विपीन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

****

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाही. रेपो दर चार टक्के इतका, तर रिव्हर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ टक्के इतका कायम असल्याचं, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सांगितलं. चालू आर्थिक वर्षात देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न सात पूर्णांक तीन टक्के असेल, मात्र मान्सूनच्या आगमनानंतर आर्थिक उत्पन्नात येत्या काळात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोविडमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केला. त्यानुसार हॉटेल, पर्यटन, वाहन दुरुस्ती, विविध कार्यक्रम आणि परिषदांचं व्यवस्थापन करणारे, सलून तसंच ब्युटी पार्लर चालक, आदींना याचा लाभ मिळणार आहे. या क्षेत्राला कर्ज पुरवठ्यासाठी बँकेनं चालू आर्थिक वर्षाअखेरपर्यंत १५ हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत. या कर्जाचा कालावधी ३ वर्षांपर्यंत असेल आणि त्यावर ४ टक्के दरानं व्याज आकारलं जाईल. मध्यम, लघू, सूक्ष्म उद्योगांना सुलभ अर्थ पुरवठा व्हावा यासाठी सिडबीला आणखी १६ हजार कोटी रुपये भांडवल देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.

****

पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश वीज महावितरण कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामं जवळपास पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सिंघल यांनी नमूद केलं.

****

राज्यात काल अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात एका ओढ्याला आलेल्या पुरात तीन शेतमजूर महिला वाहून गेल्या.

 

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात देळुब बुद्रुक ते देळुब खूर्द या दोन गावांना जोडणारा चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला रस्ता आणि रस्त्यावरचा पूल कालच्या पावसात वाहून गेला.

नव्या मोंढ्यात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आलेली हळद या पावसाच्या पाण्यात भिजली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीनं गोदाम उपलब्ध करून दिली नसल्यामुळे शेतमालाचं नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते प्रल्हाद इंगोले यांनी केला. येत्या हंगामासाठी मशागत करून ठेवलेल्या जमिनीचा सुपीक थर पावसामुळे वाहून गेल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा, हिंगोली, तसंच वसमत तालुक्यात अनेक भागात काल एक ते दीड तास दमदार पाऊस झाला. या पावसामुळे भुईमूग काढणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर नागरिकांची ऊकाड्यातून काही अंशी सुटका झाली. औरंगाबाद शहर परिसरातही काल जोरदार पाऊस झाला.

****

नांदेडच्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोग शाळेस राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड ऑफ कॅलिब्रेशन ॲण्ड टेस्टिंग लॅबोरेटरी या संस्थेची मान्यता मिळाली आहे, अशी मान्यता मिळवणारी ही महाराष्ट्रातली दुसरी तर मराठवाड्यातली पहिलीच पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा आहे. जिल्ह्यात नांदेड, कंधार, मुखेड, गोकुंदा, ऊमरी, हदगाव आणि देगलूर अशा एकूण ७ पाणी तपासणी गुणवत्ता प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

****

गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला औरंगाबाद सायबर पोलिसांनी अटक केली आहे. नितीशकुमार जितेंद्रप्रसाद असं आरोपीचं नाव असून, तो बिहार मधला रहिवासी आहे. त्यानं भारत पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचा अधिकारी असल्याचं भासवत, महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात ५६ लाख ६१ हजार ७०० रुपये लुबाडले आहेत. न्यायालयानं काल त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

****

उस्मानाबाद शहरात बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालविकास विभागाला यश आलं. शहरातल्या शिवनेरी नगर भागात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती विभागाला मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन हा विवाह थांबवला तसंच मुलीच्या पालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर होण्यास सांगितलं आहे.

****

जागतिक पर्यावरण दिन आज साजरा केला जात आहे. यानिमित्तानं औरंगाबाद शहरातल्या गोगाबाबा टेकडीवर देशी प्रजातींची सुमारे सहा हजार २५० रोपे जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर साताऱ्यातील कास पठाराच्या धर्तीवर विविध फुलांच्या रोपांची लागवड करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. महापालिकेच्या वतीनं आज शहरातल्या खाम नदी परिसरात आणि सिडको एन सहा इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

****

भूजल व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड आवश्यक असल्याचं मत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रशांत पौळ यांनी व्यक्त केलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जलसाक्षरतेसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनारमध्ये ते बोलत होते. पाण्याची मागणी लोकसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात पाणी टंचाईची तीव्रता वेगाने वाढत असल्याकडे पौळ यांनी लक्ष वेधलं.

****

कोविड प्रतिबंधात्मक लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय औरंगाबाद महानगरपालिकेनं घेतला आहे. ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितलं. बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यावर महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाकडून नागरिकांनी लस घेतली की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल एक आढावा बैठक घेतली. कोविड संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपायांसह आरोग्ययंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश चव्हाण यांनी या बैठकीत दिले.

****

लातूर जिल्ह्यात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वाट्याचा २८ कोटी १ लाख रुपयांचा निधी लातूर मनपासाठी मंजूर झाला आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात २ हजार ८०१ पात्र लाभार्थ्यांना हक्काचं घरकुल मिळणार आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट आणि माहूर तालूक्यात आधारभूत धान्य खरेदी योजने अंतर्गत मका आणि ज्वारी भरडधान्य खरेदी सुरु करण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार मित्तल आणि अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनिक यांच्याकडे केली.

****

No comments:

Post a Comment