Monday, 7 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठभ बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

आशा आणि अंगणवाडी सेविका स्वत:कडे, कुटुंबाकडे लक्ष न देता राज्याची सेवा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज बालकांमधल्या कोविड संसर्गासंदर्भात आशा आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड संसर्गाच्या काळात आतापर्यंत आशा आणि अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कार्याचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या कृती दलातले तज्ज्ञ डॉक्टर्स आशा सेविकांना मार्गदर्शन करत आहेत.

****

पेट्रोलच्या दर वाढीमुळे कॉंग्रेसतर्फे आज राज्यातल्या २८८ विधानसभा क्षेत्रातील एक हजार पेट्रोल पंपांसमोर सेल्फी काढत आंदोलन करण्यात येत आहे.

धुळे इथं श्रीराम पेट्रोल पंपावर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी करुन केंद्र सरकाचा निषेध केला.

सोलापूर मध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

****

कोरोनासंबंधी धोरण ठरवताना राज्य सरकार इतर पक्षाच्या नेत्यांशी संवाद का साधत नाही, अशी विचारणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. इंधन दरवाढीवर केंद्र सरकारकडे बोट दाखवणं चुकीचं असून, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करायला पाहिजे, असं ते म्हणाले.

****

आयकर विभागानं आजपासून आपले नवीन पोर्टल www.incometax.gov.in सुरु केलं आहे. करदात्यांना सुलभता आणि आधुनिक, वेगवान सेवेचा अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशानं, हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. करदात्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन कर भरणा प्रणाली १८ जून रोजी म्हणजेच आगाऊ कर हप्ता भरण्याच्या तारखेनंतर सुरू करण्यात येणार असून, या नवीन संकेतस्थळावर करदात्यांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. लवकरच मोबाइल ॲप देखील जारी करण्यात येणार असल्याचंही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं कळवलं आहे.

****

देशात काल नव्या एक लाख ६३६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ४२७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ८९ लाख नऊ हजार ९७५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ४९ हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक लाख ७४ हजार ३९९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ७१ लाख ५९ हजार १८० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १४ लाख एक हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २०१९-२० या वर्षाकरता शालेय शिक्षणातील कामगिरी श्रेणी निर्देशांक प्रकाशित करण्यास शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी मान्यता दिली आहे. या निर्देशांकामुळे राज्यांना शालेय शिक्षणातील त्रुटी शोधून त्यावर प्राधान्याने उपाय करण्यात मदत होते.

****

केंद्र सरकारनं एक एप्रिल २०२३ पासून पेट्रोलमधल्या इथेनॉलचं प्रमाण दहा टक्क्यांवरून २० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातल्या ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचं मत, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. देशात पाच कोटी तर महाराष्ट्रातील ४० लाख शेतकरी ऊस उत्पादन करतात. या निर्णयामुळे इथेनॉल उद्योगाची वाढ होऊन रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

****

औरंगाबाद इथं काल विक्रीसाठी आणलेला तब्बल पावणेदोन लाख रुपये किमतीचा ३७ किलो गांजा ताब्यात घेत, पोलिसांनी दोघांना अटक केली. आंध्र प्रदेशातल्या दाराकोंडा इथून गांजा घेऊन आलेली चारचाकी, पोलिसांनी काल संध्याकाळी साडेपाच वजता शहरातल्या बीड वळणरस्त्यावर ताब्यात घेतली. संबंधीत प्रकरणात आरोपी असलेले चौघे जण शहरानजिक चिकलठाणा इथले रहिवासी आहेत, दोघा जणांना पकडण्यात आलं असून, अन्य दोघे फरार झाले आहेत.

****

परभणी शहरात महानगरपालिका आणि पोलीसांनी संयुक्त कारवाई करत टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चार दुकानांवर कारवाई करत १२ हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसंच विनामास्क फिरणाऱ्या २३ जणांकडून चार हजार ६०० रुपयांचा दंड वसुल केला आहे.

****

ऑलिम्पिक स्पर्धांना टोकियोमध्ये २३ जुलै रोजी सुरवात होत आहे. स्पर्धा होणारच असं स्पष्ट झाल्यानंतर सर्व खेळाडू कसून तयारीला लागले आहेत. भारताचे ५६ पुरुष आणि ४४ महिला, असे शंभर खेळाडू आतापर्यंत एकंदर १४ क्रीडा प्रकारांसाठी पात्र ठरले आहेत.

****

जागतिक करंडक फुटबॉल स्पर्धा २०२२ साठी पात्र ठरण्यासाठी भारताची लढत आज बांगलादेश बरोबर होणार आहे. या सामन्यांसाठी पात्र ठरण्याकरता भारताला हा सामना आणि यानंतरचा अफगाणिस्तान सोबत होणारा सामनाही जिंकावा लागणार आहे. तरच भारताची फिफा जागतिक करंडक फुटबॉल स्पर्धा २०२२ साठी, आणि एशिअन करंडक २०२३ साठी वर्णी लागू शकते.

****

No comments:

Post a Comment