Monday, 7 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात पाच पातळ्यांनुसार निर्धारित निकषांच्या आधारेच निर्बंध शिथिलीकरण, सरसकट शिथिलता नाही- मुख्यमंत्री.

·      औरंगाबाद शहर, जालना, नांदेड आणि लातूर जिल्हा पहिल्या टप्प्यात, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि हिंगोली तिसऱ्या टप्प्यात.

·      राज्यात १ हजार ५५७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ३५ जणांचा मृत्यू तर ७४२ बाधित.

·      बीडमध्ये मराठा मोर्चा काढल्याप्रकरणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह दोन हजार ७०३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

·      शिवस्वराज्य दिन राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा; मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी, येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढण्याची खासदार संभाजी राजे यांची घोषणा.

आणि

·      नैऋत्य मोसमी पावसाची सक्रीयता वाढली, राज्याच्या अनेक भागात पाऊस.

****

राज्यात ब्रेक दि चेनमध्ये कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आजपासून पाच टप्प्यात शिथील होणाऱ्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, ते काल बोलत होते. पाच पातळ्यांनुसार निर्धारित निकषांच्या आधारे स्थानिक प्रशासनानं, निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे, संसर्ग किती वाढेल याविषयी शंका असतील, तर कुठल्याही दबावाला बळी न पडता व्यवहारांवर निर्बंध घालावेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

उद्योजक तसंच चित्रपट उद्योगातल्या प्रतिनिधींशीही मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला. पुन्हा निर्बंध नको असतील तर कोरोना प्रतिबंधक खबरदारीच्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन, मुख्यमंत्र्यांनी केलं.

****

कोविड निर्बंध शिथील करण्याबाबत नव्या निकषांनुसार औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहर पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात अंतर्भाव झालेला आहे. औरंगाबाद शहराचा संसर्ग दर सध्या दोन पूर्णांक २४ शतांश टक्के असून, प्राणवायू रुग्णखाटांचा वापर २२ पूर्णांक १९ शतांश टक्के आहे. उर्वरित जिल्ह्याचा संसर्ग दर पाच पूर्णांक ४६ शतांश टक्के, तर प्राणवायू रुग्णखाटांचा वापर २० पूर्णांक ३४ शतांश टक्के आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सायंकाळी पाच वाजेनंतर संचारबंदी असेल, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं दररोज सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत तर उर्वरित सर्व व्यवसाय मात्र फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. औरंगाबाद शहरात मात्र अत्यावश्यक सेवा, चित्रपटगृहं, उपाहारगृहं, केश कर्तनालयं, आदी व्यवसायांसह स्नेहसंमेलनं, सभा, क्रीडांगणं, सामाजिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांनाही कोविड नियमावलीचं पालन करून परवानगी देण्यात आली आहे. शासकीय तसंच खासगी कार्यालयांना शंभर टक्के उपस्थितीत कामकाज करता येणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घेणं बंधनकारक असल्याचं जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना सात दिवसांची मुदत दिली जाईल, त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

जालना, नांदेड, लातूर हे जिल्हे पहिल्या टप्प्यात येत असल्यानं जिल्ह्यातल्या सर्व आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं, दुकानं, उपाहारगृहं, शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, उद्याने, तसंच क्रीडा मैदानं, सर्वांसाठी खुली करण्यात येणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी १०० तर अंत्यविधीसाठी ५० व्यक्तींची मर्यादा निश्चित आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

नांदेड जिल्ह्यात कोविड बाधितांचं प्रमाण, शासनासह नागरिकांनी घेतलेली काळजी यामुळे सद्यस्थिती नियंत्रणात असून कोविड उपचारात ऑक्सिजन खाटांवरील रुग्ण प्रमाणही कमी आहे.

****

परभणी, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या श्रेणीत होत असल्यानं याठिकाणी दुकानं संध्याकाळी चार वाजेपर्यंत खुली राहू शकतील. सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली असून सवलत मिळालेली खासगी कार्यालयं चार वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल मात्र बंदच राहतील. विवाहाला ५० तर अंत्यविधीला केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

****

हिंगोली जिल्हा निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्यात येत असल्यानं, सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी, तर सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत, तर अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानांना, उद्या ८ जूनपासून एक दिवस आड सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. उपाहारगृहं ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील, तर दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत फक्त पार्सल सुविधेला परवानगी आहे.

****

राज्य सरकारनं पहिल्या चार श्रेणीतल्या जिल्ह्यांत प्रवास करण्यासाठी ई-पासची अट काढून टाकली आहे. त्यामुळे आजपासून राज्यभरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या पुन्हा धावणार आहेत. बसगाड्यांमधल्या पूर्ण आसन क्षमतेनुसार फक्त बसून प्रवास करायच्या अटीवर प्रवासी वाहतूक करायला परवानगी आहे.

****

१२ ते १८ वयोगटावर कोविड लसीच्या परिणामांबाबत नागपुरात परीक्षणाला कालपासून प्रारंभ झाला. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या चाचणीसाठी १२ ते १८ वयोगटातल्या निवड केलेल्या ५० मुलांना काल लसीची पहिली मात्रा देण्यात आली. २८ दिवसानंतर लसीची दुसरी मात्रा देण्यात येईल, यानंतर या लसीच्या परिणामांचा, तसंच अँटिबॉडी प्रतिपिंड निर्मितीचा पुढच्या २०८ दिवसांमध्ये अभ्यास केला जाईल. या संशोधनाचे नागपुरातले मुख्य संयोजक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले –

झिरो डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसानंतर किंवा त्याच्यानंतर दोन दिवस जास्त चालतात. २८ ते ३० दिवसाच्या अंतराने दुसरा डोस देणार आणि त्यानंतर मग कोविड ॲन्टीबॉडीज ज्या आपल्याला कुठल्याही व्हॅक्सीन दिल्यानंतर डेव्हलप होतात, त्या डेव्हलप होण्यासाठी परत आम्ही तीनदा मुलांना बोलावणार आहे. असा हा कोर्स पूर्ण २०८ दिवसांचा म्हणजे अंदाजे सात ते आठ महिन्यांचा कोर्स आहे.

****

राज्यात काल १ हजार ५५७ नवे कोविड रुग्ण आढळले. राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या आता  ५८ लाख ३१ हजार ७८१ झाली आहे. काल २३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १३० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार ४३३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५५ लाख ४३ हजार २६७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ८ हजार २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ७४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या १५, औरंगाबाद ११, बीड पाच, जालना दोन, तर परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले १८१ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद १३९, नांदेड १०७, उस्मानाबाद १०६, लातूर १०४, जालना ५२, परभणी ४१, तर हिंगोली जिल्ह्यात काल १२ नवे रुग्ण आढळून आले.

****

कोविड पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करुन मोर्चा काढल्याप्रकरणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह दोन हजार ७०३ जणांविरुद्ध बीड इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनानं सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, या मागणीसाठी त्यांनी पाच तारखेला बीड शहरात मोर्चा काढला होता.

****

मराठवाड्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्ग - ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रदीप सोळुंके यांनी केली आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. या मागणीसाठी शिवराज्याभिषेक दिनापासून संघर्ष समितीने लढा सुरु केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८ वा राज्याभिषेक सोहळा - शिवस्वराज्य दिन काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा परंपरागत पध्दतीनं, मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यावेळी बोलताना, शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची सूचना केली. दरम्यान, आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी, येत्या १६ जून रोजी पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा, संभाजी राजे यांनी केली. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असून, सामान्य मराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून हा पहिला मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदवले यांच्या हस्ते, शिवशक राजदंडाचं प्रतीक म्हणून गुढी उभारण्यात आली. यावेळी चंद्रशेखर ठाकूर आणि सरिता डाकूरकर यांच्या संचानं शिवगीतं तसंच पोवाडे सादर केले.

 

नांदेड इथं जिल्हा परिषद प्रांगणात अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते, शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या. नांदेड इथं पंचायत समिती कार्यालयातही शिवस्वराज्य दिन साजरा झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

 

जालना इथं जिल्हा परिषद प्रांगणात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत, स्वराज्य गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

 

परभणी इथं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अध्यक्ष निर्मला विटेकर यांच्या हस्ते स्वराज्य गुढीचं पूजन करण्यात आलं.

 

हिंगोली इथं जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केलं.

 

उस्मानाबाद इथं जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं. तुळजापूर इथं छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. उमरगा इथं कोविड केंद्रात छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली, तसंच स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आलं.

 

लातूर इथं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे यांच्या हस्ते शिवशक राजदंड - स्वराज्य गुढी उभारुन पूजन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या उदगीर इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारण्यात आली.

 

बीड इथं जिल्हा परिषद प्रांगणात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थांना त्यांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या.

****

नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राच्या मध्य भागासह अन्यत्र अधिक सक्रीय झाला असून, त्यानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापून टाकला आहे. राज्याच्या अनेक भागात काल पाऊस झाला.

औरंगाबाद शहरात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यातल्या उपळी शिवारात पांडुरंग सुलताने या २५ वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. जालना इथंही काल सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. बीड जिल्ह्यात केज, धारुर, गेवराई, माजलगाव आणि बीड तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाला. परभणी शहरातही काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. सोनपेठ तालुक्यातल्या दौनापूर तांडा इथं वीज कोसळून नामदेव राठोड या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

दरम्यान, आज औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

देवगिरी विश्व संवाद केंद्राचे ‘देवर्षी नारद पुरस्कार’, काल सायंकाळी ऑनलाईन सोहळ्यात प्रदान करण्यात आले, राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी बोलताना भेसळरहित बातम्या देणं, हे पत्रकारांचं कर्तव्य असल्याचं मत, व्यक्त केलं.  प्रिंट मीडिया श्रेणीत जालन्याचे संजय प्रभाकर देशमुख, इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत शहाद्याचे जगदीश जयस्वाल, न्यूज पोर्टल श्रेणीत जळगावचे शेखर पाटील तसंच सोशल मीडिया मुक्त लेखनासाठी, भुसावळचे निलेश वाणी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांग आणि बेघरांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आजपासून शहरातल्या नऊ केंद्रांवर हे लसीकरण होणार असून, ही मोहिम शनिवार पर्यंत चालणार आहे.

****

औरंगाबादच्या मराठवाडा विकास परिषद आणि नांदेडच्या पिपल्स कॉलेजतर्फे कालपासून ‘कोरोना काळातील मराठवाड्याच्या विकासाची स्थिती’, या विषयावर दोन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्र-वेबीनारला सुरुवात झाली. माजी खासदार - ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे हस्ते, वेबिनारचं उदघाटन झालं.

****

No comments:

Post a Comment