Wednesday, 9 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबईत एक दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालं असून, आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं असून, वाहतूक कोंडी झाली आहे, मध्य रेल्वेची वाहतुकही विस्कळीत झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा, दांडेगाव, जवळा पांचाळ, नांदापूर, वसमत तालुक्यातल्या कौठा परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातही अर्धापूर, हदगाव, माहूर, मुदखेड, मुखेड, लोहा, बिलोली या तालुक्यात चांगला पाऊस झाला.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने कोकणातल्या सर्व जिल्ह्यात ११ जून पासून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातही उद्या आणि परवा काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

****

देशात काल नव्या ९२ हजार ५९६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार २१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ९० लाख ८९ हजार ६९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ५३ हजार ५२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक लाख ६२ हजार ६६४ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ७५ लाख चार हजार १२६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १२ लाख ३१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबतीत लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याचं काम सातत्यानं सरकारकडून केलं जात आहे. नीती आयोग आणि लसीकरण गटाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल अशाच काही शंकांचं निरसन केलं. ज्या लोकांना काही विशिष्ट गोष्टींचा त्रास म्हणजेच अॅलर्जी आहे त्यांनी लस घ्यावी की नाही याबद्दल बोलताना पॉल यांनी, ज्यांना तीव्र स्वरूपाच्या अॅलर्जीचा त्रास आहे त्यांनी योग्य वैद्यकीय सल्ल्यानंतरच लस घ्यावी, असं सांगितलं आहे. ज्यांना हा त्रास सौम्य स्वरूपाचा होतो त्यांनी मात्र कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जूनला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे आपले विचार व्यक्त करतील. नमो ऍप, माय गव्ह या संकेतस्थळावर, १९२२ किंवा १८०० - ११ - ७८०० या नि:शुल्क क्रमांकावर नागरिकांना आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. 

****

कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला लवकरात लवकर निवृत्त वेतन देण्याचे निर्देश राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिले आहेत. अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची प्रक्रिया संबधित विभागांनी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणे करून या सदस्याच्या परिवाराचं निवृत्ती वेतन एक महिन्यात सुरू होईल, असं ते म्हणाले.

****

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करता प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून सुरु झाली आहे. सात जुलै पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

****

कोविड प्रादुर्भावामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात मे २०२१ मध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून चालू वर्षात ६३ हजार ५५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असं मलिक यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या चार शाळांमधल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ‘असुदे फाउंडेशन’ या मुंबईतल्या स्वयंसेवी संस्थेने, ऑनलाइन शिक्षण कसं द्यावं, याबद्दल गेले वर्षभर मार्गदर्शन केलं. मुलांमध्ये कोविंड संदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी घरोघरी भेट देऊन मास्क, साबण, सॅनिटायझर आदी साहित्याचं वाटप संस्थेतर्फे करण्यात येत आहे. मनपाच्या माध्यमिक शाळेतल्या २७४ विद्यार्थ्यांच्या कुटुंबापर्यंत ही संस्था पोहोचली आहे.

****

खरीप हंगामासाठी इंदूरहून सांगलीकडे आणलं जात असलेले बियाणे खराब झाले असून, दुसरे बियाणे मिळावे, अशी मागणी कृषी विभागानं महाबीजकडे केली आहे. संबंधित शेतकरी बियाण्यांपासून वंचित राहिले असून, त्यांना शासनांच्या सवलतींचा फायदा मिळणार नाही, असं सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र गृहनिर्माणविकास महामंडळ- म्हाडाच्या सदनिकांसाठी उद्या १० जूनला दुपारी एक वाजता औरंगाबाद म्हाडा कार्यालयाच्या वतीनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सोडत काढण्यात येणार आहे. विविध उत्पन्न गटांतल्या एकूण ८६४ सदनिकांसाठी एकूण हजार २२६ अर्ज प्राप्त झाले आहेत.

****

No comments:

Post a Comment