Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०९ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं
श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात
आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक
माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा
०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
आरक्षणाची ५० टक्क्यांची
मर्यादा शिथिल करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी.
·
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र
मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द.
·
मोफत लसीकरणासाठी ७४ कोटी मात्रांची खरेदी करण्याचे आदेश जारी.
·
राज्यात १० हजार ८९१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात
३९ जणांचा या संसर्गानं मृत्यू तर
६३८ बाधित.
·
बीड जिल्ह्यात हरभरा
खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी १८ जून पर्यंत मुदतवाढ.
आणि
·
नैऋत्य मोसमी पाऊस ११ ते १३ जूनच्या आसपास मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र
व्यापण्याची शक्यता.
****
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी केंद्र
सरकारनं घटनादुरुस्ती करावी अशी
मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक
चव्हाण यांनी काल दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली, त्यानंतर
पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारनं मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षणासंदर्भात न्याय मागण्या विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले. मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधलं आरक्षण, राज्यांना देय असलेली वस्तू आणि सेवा कर - जीएसटीची भरपाई, विधान परिषदेतल्या १२ सदस्यांची नियुक्ती, मेट्रो
कारशेड, पीक विमा योजना, मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा, अशा अनेक मुद्यांवर पंतप्रधानांसमवेत
सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय इतरही अनेक विषयांबाबत
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना निवेदनं सादर केली. केंद्र सरकारनं लस
पुरवठ्याबाबत घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. यामुळे लस पुरवठ्यातल्या त्रुटी
दूर होऊन देशातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण व्हायला मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर
पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षाही, त्यांनी
व्यक्त केली.
या संयुक्त भेटीशिवाय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी सुमारे अर्धा तास खासगीत
संवाद साधला.
दरम्यान, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि
पंतप्रधान यांच्या या भेटीचं स्वागत केलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारध्ये या निमित्तानं संवाद सुरू झाल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी
बोलतांना दिली.
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे राजे भोसले यांनी मात्र
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या भेटीवर टीका
केली आहे. ते काल सातारा इथं बोलत होते. मराठा आरक्षण हा
विषय पंतप्रधानांनी ऐकून घेतला, मात्र काही आश्वासन दिलं
नसून, ही भेट फक्त राजकीय तडजोडीसाठी झाली असल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या भेटी
आधी या मुद्यावर अधिवेशन बोलावणं आणि चर्चा होणं गरजेचं होतं,
असंही उदयनराजे यांनी नमूद केलं.
मराठा
आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही या भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळालं नसल्याबद्दल
खंत व्यक्त केली. पंतप्रधानांची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो असा गैरसमज राज्य
सरकारने करून घेऊ नये, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले –
या बैठकीकडे मी आणि समाज एकाच
अँगलने बघत होतो की, मराठा आरक्षण ही जबाबदारी नेमकं राज्य सरकारची की ही जबाबदारी
नेमकं केंद्र सरकारची हे या ठिकाणी सिद्ध झालेलं नाही. मी तर म्हणेल आश्वासन पण आज
मिळालेलं नाहीये. त्यामुळे कृपया करुन राज्य सरकारनं हा गैरसमज करु नये की आज त्यांची
भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो. आम्हाला जोपर्यंत आमच्या पदरामध्ये आरक्षण व आरक्षणाच्या
पर्यायी व्यवस्था मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
****
अमरावतीच्या
अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द करत,
त्यांना दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे. जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे
माजी खासदार आनंद अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी काल
झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं, खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द
करुन, जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
****
केंद्र
सरकारनं मोफत
लसीकरणासाठी ७४ कोटी मात्रांची खरेदी
करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये
कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई, या तीन प्रकारच्या कोविड लसींच्या मात्रांचा
समावेश असल्याची माहिती, नीति आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी,
काल पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये कोविशिल्ड लसीच्या २५ कोटी मात्रा, कोवॅक्सिन लसीच्या
१९ कोटी मात्रा, तर बायोलॉजिकल ई लसीच्या, ३० कोटी मात्रांचा समावेश आहे. संबंधित उत्पादकांकडून
या लसींचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार असून, डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यानं
सर्व मात्रा मिळणार असल्याचं, पॉल यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
जनतेसाठी एकरकमी धनादेश देऊन कोविड लस खरेदी करण्याची तयारी असलेल्या महाविकास आघाडी
सरकारनं, या वाचलेल्या सात हजार
कोटी रुपये निधीतून, गोरगरीबांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी, केंद्रीय
मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली आहे. याबाबत काल जाहीर केलेल्या एका प्रसिद्धी
पत्रकात दानवे यांनी, टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांसह, शेतकरी, बारा
बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक या सर्वांकरता पॅकेज जाहीर
करण्याची मागणी, राज्य सरकारकडे केली आहे. देशातल्या लसीकरण मोहिमेची सूत्रं केंद्र
सरकारने हाती घेतल्यामुळे, राज्यातला लसीकरणाचा गोंधळ संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
****
राज्यात काल १० हजार ८९१ नवे कोविड
रुग्ण आढळले. राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या आता ५८ लाख ५२ हजार ८९१ झाली आहे.
काल २९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख एक हजार १७२ झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक ७३ शतांश टक्के झाला आहे. काल १६ हजार ५७७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात
आतापर्यंत ५५ लाख ८० हजार ९२५ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९५ पूर्णांक ३५ शतांश टक्के झाला
आहे. सध्या राज्यभरात एक लाख ६७ हजार ९२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ६३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३९ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या
१५, औरंगाबाद नऊ, बीड सात, जालना सहा, तर नांदेड जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा
समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १४५ नवे रुग्ण आढळले. बीड १३२, उस्मानाबाद १२४, नांदेड ११६, लातूर
५१, जालना ३७, परभणी २५, तर हिंगोली जिल्ह्यात काल आठ नवे रुग्ण आढळून आले.
****
वीज
ग्राहकांना योग्य दाबाचा आणि अखंडित वीज
पुरवठा देण्यासाठी, येत्या पाच वर्षात
राज्यात विविध ठिकाणी, १० हजार ७०७ किलोमीटर एवढ्या लांबीच्या
अतिउच्चदाब वाहिन्यांचे नवीन जाळे निर्माण करणार असल्याचं, उर्जामंत्री नितीन
राऊत यांनी सांगितलं आहे. काल मंत्रालयात वीज
महापारेषण कंपनीनं सादर केलेल्या पंचवार्षिक
योजनेचा आढावा घेतांना, ते बोलत होते. २०२४-२५ पर्यंत राज्यात एकूण ८७ अतिउच्चदाब वीज उपकेंद्रं उभारण्यात येणार असून, यामुळे ३० हजार एमव्हीए एवढी
क्षमतावाढ होणार आहे. यासाठी १० हजार ८२३ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असून, राज्यात पारेषणचं जाळं अधिक सक्षम
होणार असल्याचं, राऊत यांनी सांगितलं. मेळघाट सारख्या दुर्गम
भागातही योग्य दाबाचा वीज पुरवठा व्हावा, आणि दुर्गम भागातलं एकही गाव, पाडा अंधारात राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही, त्यांनी
महावितरण तसंच महापारेषण प्रशासनाला दिले आहेत.
****
कोविडमुळे आई वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक
गमावलेल्या बालकांना, त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच
शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ मिळवून द्या, अशा सूचना औरंगाबादचे
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा कृती दलाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. एक पालक गमावलेल्या ३२६, आणि दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांना शासनाच्या
नियमानुसार असणाऱ्या सर्व योजनांचा, तसंच २६५ विधवा महिलांना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांपैकी तीन बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येणार आहे, तर १० बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करून, दरमहा
अकराशे रूपये प्रतिमाह योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभ
देण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करावी, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी आधारभूत केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी
१८ जून पर्यंत पणन महासंघानं मुदतवाढ दिली असल्याचं, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचं
नुकसान होऊ नये यासाठी काही शेतकऱ्यांनी आमदार संजय दौंड
यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या, या तक्रारीवरून आमदार
दौंड यांनी पालकमंत्री मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नोंदणीला मुदत वाढ देण्यात आल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
कोविडच्या
संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पूर्व तयारीच्या अनुषंगाने, परभणी जिल्हा
रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी तसंच अधिपरिचारिकांसाठी, पहिल्या टप्प्यातलं प्रशिक्षण
शिबीर घेण्यात येत आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १४ जूनपर्यंत
चालणाऱ्या या शिबीरात, पाच वैद्यकीय अधिकारी, एक परिसेविका आणि दहा अधिपरिचारिकांना
प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार इतर अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस ११ ते १३ जूनच्या आसपास मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता
आहे. केरळातून वेगवान प्रवास करत अवघ्या तीनच दिवसांत मोसमी पावसाने सहा जून रोजी पुणे,
उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मात्र
मोसमी पावसानं पुढे मार्गक्रमण केलेलं नाही. राज्याचा जवळपास ३५ टक्के भाग मोसमी पावसानं
व्यापला असला तरीही, मुंबईसह नाशिक, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यात औरंगाबाद, जालना,
बीड, परभणी, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही.
दरम्यान, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज
वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज
हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
कर्तव्यावर गैरहजर असलेल्या बीड जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर
शरद राऊत यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ
माले यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर डॉ. राऊत हजर नसल्याचं त्यांच्या
निदर्शनास आलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
दोन लाख रुपयांची लाच घेणं आणि मारहाण प्रकरणी जालन्याचे उपविभागीय पोलिस
अधिकारी सुधीर खिरडकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयात
काल त्यांच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाले.
****
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि
माजी सनदी अधिकारी राम खांडेकर यांचं काल नागपूर इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. खांडेकर यांनी
राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणूनही काम केलं होतं.
****
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने काल नांदेड
तालुक्यातल्या तुप्पा इथं
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पेरणीपूर्व जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचं उद्घाटन
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्हा कृषी
अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी, सोयाबीन
बियाण्याची उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया
प्रात्यक्षिक, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांची मात्रा,
दहा टक्के रासायनिक खतांची बचत करणं, आणि
बीबीएफ तंत्रज्ञानावर सोयाबीन लागवडीचं प्रात्यक्षिक घेऊन
शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीकविम्याची
हक्काची रक्कम संबंधीत रिलायन्स कंपनी आणि राज्य सरकारनं पेरणीपूर्व तातडीनं
वितरीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण
जिल्हा शाखेच्या वतीने काल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या
कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या
नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या कार्यालयासमोर ठाण मांडून
पीकविम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी काळे
झेंडे आणि फलकही आणले होते.
दरम्यान, मानवत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना
तत्काळ आणि सरसकट पीक कर्ज देण्यात यावं अशी मागणी शिवसेना मदत केंद्राच्या वतीने
तहसीलदार डी.डी.फुफाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीसाठी
काल एक निवेदन तहसीलदार फुफाटे यांना सादर
करण्यात आलं.
****
औरंगाबाद
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय व्हावा, असं सकल्प करु
या, असं शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या औरंगाबाद
शाखेच्या ३६व्या वर्धापन दिनानिमित्त काल झालेल्या ऑनलाईन मेळाव्यात देसाई बोलत होते.
शिवसेनेच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याची या मेळाव्यात
माहिती देण्यात आली.
****
नांदेड
जिल्ह्यातील लोहा, माहूर आणि भोकर तालुक्यातील मातूळ महसुल मंडळातील शेतकऱ्यांना सन
२०२० - २०२१ या खरिप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळालेली
नाही, याबाबत तपासणी करण्यासाठी, जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी एक नऊ सदसीय समिती
स्थापन केली आहे. ही समिती पिक कापणी प्रयोग, उंबरठा उत्पन्न यांची तपासणी करून अहवाल
सादर करेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळवून देता येईल.
****
No comments:
Post a Comment