Monday, 14 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळण्याची सुविधा परिवहन विभागानं सुरु केली असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेची सुरुवात झाली. यासाठी परिवहन विभागाकडून ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाईन उपक्रमामुळे अधिकाऱ्यांवरचा ताण कमी होणार असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्यातल्या आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय, विधवा, कोरोनामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसह आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना यंदाच्या खरीप हंगामात मोफत बियाणे वाटप करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं विविध गावातल्या आर्थिक दुर्बल घटकांना भुसे यांच्या हस्ते बियाणांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या मोफत बियाणांसाठी बियाणे विकणाऱ्या कंपन्यांनी सामाजिक दायीत्व निधीतून मोफत बियाणे उपलब्ध करून दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना बियाण्यांचं वाटप करण्यात येत असून, खरीप हंगामात कृषी विभागानं सोयाबीन, मूग, बाजरी, मका या पिकांच्या बियाण्यांचं प्रत्यक्ष वाटपाचं नियोजन केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे तसंच खतांचा तुटवडा भासणार नाही, असंही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

****

देशात काल नव्या ७० हजार ४२१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजार ९२१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ९५ लाख दहा हजार ४१० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ७४ हजार ३०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक लाख १९ हजार ५०१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या नऊ लाख ७३ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

गेल्या महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. अशा परिस्थितीतही या वादळाला तोंड देत नागरीकांची मदत करण्याचं कार्य रायगडमधल्या युवकांनी केलं. माणगाव तालुक्यातल्या डोंगराली गावच्या युवकांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल - एनडीआरएफच्या धर्तीवर टास्क फोर्स तयार करुन ग्रामस्थांची मदत केली.

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं काल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. कोविड महामारीच्या संकट काळात सामाजिक कामातून गेवराईत माणुसकी जपण्यात आली, एवढचं नाहीतर रूग्णाच्या सेवेसाठी कोविड रूग्णालय काढून त्यांची देखभालही करण्यात आल्याचं पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाले. यावेळी आशा वर्कर, डॉक्टर, परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला, तसंच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वस्तीगृहाचा निर्णय घेतल्याबद्दल मुंडे यांचा देखील ऊसतोड मुकादमाच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला.

****

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्यात कार पडल्यानं पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री हा अपघात झाला. मृतांमधले दोन जण लोणार तालुक्यातले रहिवासी होते, तर अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. चौघेही शिक्षक असून, ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झालं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असून जिल्ह्यातल्या कंधार, लोहा, अर्धापूर या तालुक्यांत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणी सुरू केली आहे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सोयाबीनंचं वाढीव उत्पादन देणारं ‘वरंबा सरी’ तंत्रज्ञान या भागात उपयोगात आणलं जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ८० ते शंभर मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वदूर पाऊस होत असून, हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा आज पहाटे पासून सूरू झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असून, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने लसीकरण मोहिम अधिक गतीमान करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या मोहिमेत आतापर्यंत लसीच्या २५ कोटी ४८ लाख ४९ हजार ३०१ मात्रा देण्यात आल्या. काल देशभरात १४ लाख ९९ हजारांहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.  

****

No comments:

Post a Comment