Tuesday, 15 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मुलांना शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. केवळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावण्यात आलं आहे.

****

आषाढी वारीच्या नियोजनाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून, त्यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या १० पालख्यांना एसटी बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. एकादशी दिवशी शहरातील १९५ महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. देहू आणि आळंदी इथल्या प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० तर उर्वरित आठ सोहळ्यांसाठी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगांना देण्यात येणारं अनुदान कायम असून, या अनुदानाचा फायदा सर्वच उद्योगांना मिळावा, यासाठी विचारविनिमयांती सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपूर इथं विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशनच्या बैठकीत काल ते बोलत होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या १२०० कोटी रुपयांच्या वार्षिक अनुदानाचा लाभ, सर्व लहान-मोठ्या उद्योगांना मिळावा यासाठी या धोरणाचा फेरविचार करण्यात येत असून, त्याबाबत ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी उद्योजकांशी काल चर्चा केली.

****

देशात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. काल नव्या ६० हजार ४७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ७२६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ९५ लाख ७० हजार ८८१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ७७ हजार ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक लाख १७ हजार ५२५ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ८२ लाख ८० हजार ४२७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या नऊ लाख १३ हजार २७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या २५ कोटी ९० लाख ४४ हजार ७२ मात्रा देण्यात आल्या आहेत.  

****

कोविड संसर्गाच्या काळात जगभरात सर्वत्र एकमेकांना मदत करण्यात पुढाकार घेण्यात आल्याचं जागतिक मदत निर्देशांक २०२१ या अहवालात म्हटलं आहे. चॅरिटीज एड फाउंडेशननें हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशभरात इतरांना मदत करणाऱ्या देशांच्या यादीत भारतानं पहिल्या २० देशांमध्ये स्थान मिळवलं आहे.

****

केंद्र सरकारनं २०२१-२२ या चालू रब्बी विपणन हंगामांत आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे ४२५ लाख ७७ हजार मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. यापूर्वी २०२०-२१ मध्ये ३८९ लाख ९२ हजार मेट्रिक टन एवढ्या गव्हाची खरेदी झाली होती. चालू हंगामांत किमान आधारभूत किंमतीनुसार झालेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत ४७ लाख ५३ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना ८४ हजार कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या औरंगाबाद - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिंगोलीसाठी ऑक्सिजन घेऊन येत असलेला टँकर अचानक पलटी झाल्यानं यातून ऑक्सिजन गळती झाली होती. काल सायंकाळी ही घटना घडली. दोन तासांच्या दुरुस्ती नंतर हे टँकर हिंगोलीकडे रवाना करण्यात आलं. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

****

नांदेड जिल्ह्यात काल रात्री सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या १६ पैकी १५ तालुक्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली. यात भोकर, लोहा, किनवट, धर्माबाद तालूक्यासह बिलोली, माहूर, अर्धापूर, नायगाव, हदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. कंधार तालुक्याचा अपवाद वगळता अन्य तालूक्यात हलक्या स्वरूपात काल रात्री पाऊस झाला. मागील चार दिवसांपासून दररोज होत असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात पेरणीच्या कामा गती आली असून, आतापर्यंत १५ ते २० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

****

धुळे शहरात काल तब्बल १३६ दिवसांनंतर कोरोनाचा एकही बाधित रुग्ण आढळला नाही, तसंच एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पहिली लाट ओसरली होती, मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती.

****

नाशिक शहरात पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांना सुरुवात झाली आहे. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ६५ तर चिकुनगुनियाचे ३६ रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या हिवताप विभागाच्या वतीने विविध भागात डास निर्मूलन फवारणी तसंच अन्य उपाय योजना सुरू करण्यात आल्या असल्याचं, नाशिक महापालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्रंबके यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment