Wednesday, 16 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      नांदेड, हैदराबाद आणि बंगळुरुसह देशातल्या विविध भागात पत्रकार, नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या लष्कर ए तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा.

·      कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणी आणि विशिष्ठ वेळ घेणं बंधनकारक नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण.

·      महा आवास अभियानाअंतर्गत राज्यभरातल्या ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांचा गृहप्रवेश.

·      राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक.

·      राज्यात नऊ हजार ३५० नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ३८ जणांचा मृत्यू तर ५१२ बाधित.

·      नांदेड इथं श्री गुरुगोविंदसिंगजी महाराज यांच्या नावानं मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या प्रस्तावाला गुरुद्वारा सचखंड बोर्डाची मान्यता.

आणि

·      कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मूक आंदोलन.

****

नांदेड, हैदराबाद आणि बंगळुरुसह देशातल्या विविध भागात पत्रकार, नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या लष्कर ए तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए विशेष न्यायालयानं दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं याप्रकरणी २०१२ साली नांदेड इथून पाच जणांना अटक केली होती, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं होतं. मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मील आणि मोहम्मद सदिक यांना शिक्षा सुनावण्यात आली असून, मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अकरम हा नोकरीच्या निमित्ताचे सौदी अरेबियाला गेला असता, तो लष्कर ए तय्यबाच्या संपर्कात आला. त्याठिकाणी हा कट रचण्यात आल्याचं एनआयएनं न्यायालयात सांगितलं.

****

कोविड-19 प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणी आणि विशिष्ठ वेळ घेणं बंधनकारक नसल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटल आहे. १८ वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन वेळेवर नोंदणी करून लगेचच लस घेता येईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. १०७५ या मदत क्रमांकावर देखील नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या एकूण २८ कोटी ३६ लाख लाभार्थ्यांपैकी १६ कोटी ४६ लाख लाभार्थ्यांना ऐनवेळी नोंदणी करुन लस घेतली. पूर्वनोंदणी केलेल्या आणि वेळेवर नोंदणी केलेल्या जवळपास १९ कोटी ८४ लाख नागरिकांना कोविड-१९ ची लस देण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.

****

ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात आलेल्या महा आवास अभियानाअंतर्गत राज्यभरातल्या एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांनी काल गृहप्रवेश केला. या लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चाव्यांचं वितरण करण्यात आलं. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या. एकूण आठ लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ देऊन ग्रामविकास विभागानं कौतुकास्पद कामगिरी केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलतांना काढले. दरम्यान, अभियानाअंतर्गत उर्वरित ४ लाख ६८ हजार घरकुलांची बांधकामं येत्या महिनाभरात पूर्ण होणार आहेत.

****

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते काल भंडारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मागेल त्या जिल्ह्याला ताबडतोब वैद्यकीय महाविद्यालय मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाविद्यालयांच्या शुल्का संदर्भात लवकरच तोड़गा काढत पालक आणि संस्था याच्यात सुवर्ण मध्य काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले –

माझ्याकडे जी विद्यार्थ्यांची मागणी आहे ती अशी आहे की दोन दोन वर्षं कॉलेजेस बंद आहेत. तिथं ग्रंथालयं चालू नाहीत तरी ग्रंथालयाची फी लावली जाते. आम्ही तिथे जात नाही, मेंटेनन्स फी लावली जाते. जिमला आम्ही दोन वर्षामधे गेलो नाही तरी जिमखाना फी लावली जाते. लाईटचा वापर आमच्यासाठी झाला नाही तरी इलेक्ट्रीसिटी बिल त्यामधे इन्क्लुड केली जातं. तर यामधे आम्हाला समजून घ्यावं असं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांची वस्तूस्थिती बरोबर आहे. एफ आर ए नावाची जी कमिटी आहे त्याला हे स्वायत्त अधिकार आहेत जी माझ्या अंडर काम करते. परंतू त्याचे अध्यक्ष जे आहेत ते हायकोर्टचे माजी न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे पण त्याचं व्हेरिफिकेशन जे हायकोर्टाकडून यायचं आहे, ते येत्या चार-पाच दिवसांमधे येईल. ती कमिटी फॉर्म होईल, पहिली बैठक माझ्याबरोबर त्यांची होईल. आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना जे अपेक्षित आहे त्यातून सुवर्णमध्य काढला जाईल.

****

शुल्काअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन वर्ग किंवा शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. त्या काल मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. सध्याची ऑनलाईन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचं मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वंकष पद्धतीनं केलं जाईल, असं गायकवाड यांनी सांगितलं.

****

आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला असून, यंदाच्या आषाढी वारीसाठी मानाच्या १० पालख्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. एकादशी दिवशी शहरातील १९५ महाराज मंडळींना देवाचे मुख दर्शन मिळणार आहे. देहू आणि आळंदी इथल्या प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० तर उर्वरित आठ सोहळ्यांसाठी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी इथं पोहोचल्यानंतर, तिथून पंढरपूरकडे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं, या आदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात काल नऊ हजार ३५० नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख २४ हजार ७७३ झाली आहे. काल ३८८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १४ हजार १५४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. काल १५ हजार १७६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ६९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३८ हजार ३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ५१२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि लातूर जिल्ह्यातल्या १४, औरंगाबाद सात, उस्मानाबाद सहा, बीड पाच, परभणी चार, तर जालना जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १५७ रुग्ण आढळले. औरंगाबाद १२०, उस्मानाबाद १०५, लातूर ३९, परभणी ३४, जालना ३०, नांदेड २३ तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळले.

****

सौदी अरेबियानं कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी परदेशी भाविकांना हज यात्रेसाठी परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे भारतीय केंद्रीय हज समितीनं यावर्षी या तीर्थ यात्रेसाठी आलेले सर्व अर्ज रद्द केले आहेत. सौदी अरेबियानं केवळ देशातील नागरिकांनाच मर्यादित संख्येनं हज यात्रेत सहभागी होण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

****

नांदेड इथं श्री गुरुगोविंदसिंगजी महाराज यांच्या नावानं मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या प्रस्तावाला गुरुद्वारा सचखंड बोर्डानं मान्यता दिली आहे. बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मनहास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नांदेडमध्ये सर्व सोयीयुक्त रुग्णालय नसल्यानं नांदेडहून गंभीर आजारी रुग्ण मुंबई, औरंगाबाद, हैदराबादला जातात, त्यांना आर्थिक भार सोसावा लागतो, त्यामुळे जिल्ह्यासाठी अद्ययावर रुग्णालयाची गरज असल्याचं, मनहास म्हणाले.

****

वेरुळ अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं आजपासून सुरु होणार आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून ही स्थळं सुरु करण्यात येणार आहेत. यात वेरुळ अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणीचा समावेश आहे.

****

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात काल पाऊस झाला. बीड जिल्ह्यात किल्ले धारुरु परिसरात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. लातूर आणि उस्मानाबाद मध्येही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरातही काल संध्याकाळी काही काळ मुसळधार पाऊस झाला.

****

प्रलंबित मागण्यांकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांनी कालपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली. मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या फिती लावून काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. परभणी इथं आयटक प्रणित आरोग्य विभाग तसंच आशा आणि गटप्रवर्तक संघटनेनं निदर्शनं केली. आपल्या विविध मागण्याचं एक निवेदन या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.

****

कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर शांततेत आणि कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आंदोलन करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी समाजाला केलं आहे. कोल्हापूरमध्ये शाहू समाधीस्थळावरुन संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले –

सगळेच आमदार असतील, सर्व खासदार असतील त्यांना आपण बोलावलं आहे, निमंत्रित केलेलं आहे, मला पूर्ण विश्वास आहे की सर्वजण येतील. पण आपणसुध्दा त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण आापल्या शब्दाखातर ते इथं येणार आहेत. त्यांना कुणीही उलटेसुलटे प्रश्न करू नयेत. कुणीही बोलायचं नाही. माझ्यासकट आपण सर्वांनी मौन राखायचं. म्हणून असं आपण मूक आंदोलन घेतलेलं आहे. त्यांना बोलू द्या. त्यांना उलटं छान मनमोकळेपणानं बोलू द्या. दहा मिनिटं बोलू देत पंधरा मिनिटं बोलू देत, वीस मिनिटं बोलू देत तो त्यांचाय.

****

औरंगाबाद महापालिकेनं नव्याने लावलेल्या आस्थापना कराला जिल्हा व्यापारी महासंघानं विरोध केला आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या शिष्टमंडळानं काल महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेवून त्यांना याबाबतचं निवेदन दिलं. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाच्या आदेशानुसार बरेच दिवस बाजारपेठा बंद होत्या. यामुळे व्यापारी बांधवांचे फार मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे पालिकेच्या या नविन आस्थापना कराला विरोध असल्याचं म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं आणि व्यापारी गाळ्याचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलतांना चव्हाण यांनी ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचं स्मरण करत त्यांच्याप्रमाणेच भोकरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

****

परभणी शहरातल्या पूरग्रस्त भागात महापालिकेनं उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची जेवणाची, आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश सहायक आयुक्तांना दिले आहेत. पूरग्रस्त परिसर स्वच्छ करावा आणि परिसरात जंतुनाशक फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नाल्यालगतच्या धोकादायक इमारतींमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासही सांगण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्यासही पवार यांनी सांगितलं आहे.

****

येत्या काही वर्षात बांबू लागवडीतून आणि त्याच्या विविध व्यावसायिक उत्पादनातून नांदेड जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असं मत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. जिल्ह्यात बांबू लागवडीला चालना मिळावी या उद्देशानं बांबू आणि रेशीम लागवड कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्यांनी दूरद्रुष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेऊन शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर या भागात असलेली वनसंपदा लक्षात घेऊन भोकर इथं बांबू विकास प्रकल्प साकारत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

****

बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं कोविड-१९ लसीकरण मोहिमेस गती मिळण्यासाठी, ग्राम पंचायती, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य संजीवनी पुरस्कार योजना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केली.  या योजनेतंर्गत कोवीड-१९ लसीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक, तसंच दहा ते ३० लाख इतका विकास निधी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून दिला जाणार आहे. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेकडून आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसींचा १०० टक्के वापर झाला आहे. यापुढेही वयोवृद्ध, व्याधीग्रस्त आणि दिव्यांगाना ही लस प्राधान्यानं देण्याबरोबरच नियमाप्रमाणे इतरांनाही दिली जावी असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. काल कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाच्या अनुषंगानं जिल्हा कृती दलाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातले ऊस तोड कामगार आणि अन्य स्थलांतरितांसाठीही लसीकरण सत्राचं आयोजन करण्याचे निर्देश दिवेगावकर यांनी यावेळी दिले.

****

No comments:

Post a Comment