Wednesday, 16 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं असून, राज्य सरकारच्या वतीनं मंत्री सतेज पाटील आणि नवाब मलिक, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धैर्यशील माने, प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. शांततेत आणि कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आंदोलन करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी समाजाला केलं आहे.

****

ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला, त्या कुटुंबाला सामाजिक वनीकरण विभागामार्फत कन्या वन समृध्दी योजने अंतर्गत, एक जुलै रोजी १० रोपांचं वाटप करण्यात येणार आहे. पाच रोपे सागाची, दोन आंबा तर फणस, जांभूळ आणि चिंचेचं प्रत्येकी एक रोपं दिलं जाईल.

****

निकृष्ट दर्जाचं बियाणं, खतं बाजारात येऊ नयेत, यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांचा निकाल निर्धारीत कालावधीत देऊन, शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं, असं आवाहन, कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. राज्यातल्या गुणनियंत्रण प्रयोगशाळांच्या कामाचा आढावा कृषीमंत्र्यांनी काल एका बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

****

कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना रायगड इथून अटक केली. कर्नाळा बँकेकेडून बनावट कर्ज प्रकरण आणि आणि गैरव्यवहारातून गेल्या काही वर्षात ५२९ कोटीचा घोटाळा झाल्याचं तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी गुंतवणुकदारांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दीर्घकाळ आंदोलन केलं होतं. पाटील यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील ९७२ ऑनलाइन शाळा कालपासून सुरु झाल्या. यामध्ये महानगरपालिकेच्या ७२ आणि खाजगी ९०० शाळांचा समावेश आहे. मनपा शाळेतल्या सर्व शिक्षकांनी कालपासून आपल्या शाळेच्या परिसरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment