Thursday, 17 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पालाश आणि स्फूरद खतांवरील पोषण आधारित अनुदान वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. डीएपी खतांवरील सध्या देण्यात येत असलेलं ७०० रुपये अनुदान वाढवून १२०० करण्यात आलं असून, याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं.

****

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीमिनित्त त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. जिजाऊ माँ साहेब यांच्या त्याग, शौर्य आणि अमोघ मुत्सद्देगिरी यांच्या प्रेरणेतून स्वराज्य साकारलं गेलं, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन केलं आहे.

****

मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्वाचा दुवा असल्याचं असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज्यातल्या मानद वन्यजीव रक्षकांशी त्यांनी काल दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मानव वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठीच्या उपाययोजना शासनास सुचवाव्यात, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं.

****

भारतात खाद्यतेलाच्या किंमती कमी होत आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरानंतर आता खाद्यतेलांच्या किंमती खाली येत आहेत. मुंबईतल्या किंमतींनुसार काही खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये सुमारे २० टक्के घट झाली आहे.

****

जालना जिल्ह्यात अंबड आणि भोकरदन तालुक्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पारध इथल्या रायघोळ नदीला मोठा पूर आला होता. अवघराव सावंगी इथं नदी ओलांडत असताना सय्यद शाहेद आणि सलीम सय्यद हे दोन चुलतभाऊ पुराच्या पाण्यात वाहून गेले. सलीम सय्यद यास ग्रामस्थांनी वाचवलं, मात्र, दुसरा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.

****

परभणी जिल्ह्यात यावर्षी २० लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीनं किमान एक हजार झाडं लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. लावलेल्या सर्व झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारीही घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

****

No comments:

Post a Comment