Friday, 18 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड1-19 महामारीचा सामना करताना देशातली वैद्यकीय पायाभूत सुविधा विकसित झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड-19 फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात आज पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. या साथीच्या रोगाने सरकार, विज्ञान, समाज, संस्था आणि व्यक्तींना त्यांची क्षमता वाढवण्यास मदत केली आहे. देशात अद्यापही वैद्यकीय सुविधांचं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोविड महामारीच्या काळात गावागावात जाऊन काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. २६ राज्यांमधल्या १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये फ्रंटलाइन कामगारांसाठी हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. देशभरातल्या एक लाखांहून अधिक फ्रंटलाईन कामगारांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं या कार्यक्रमाचं उद्दीष्ट असून, या योजनेसाठी एकूण २७६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

****

मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. मराठवाडा विकास आंदोलन आणि उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादला व्हावे यासाठी झालेल्या लढ्यात त्यांचा मोठा वाटा होता. मराठवाडा जनता विकास परिषद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था आणि इतर अनेक संस्थांच्या कामात ते अखेरपर्यंत सक्रिय होते. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी त्यांनी लढा दिला.

****

राज्यातली भूजल पातळी वाढवण्यासाठी जल पुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ बनली पाहिजे असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबईत अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल साक्षरता अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपलं गाव पाणीदार बनवावं असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं.

दरम्यान, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, असे निर्देशही पाटील यांनी काल दिले.

****

अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे येणाऱ्या पूराचं समन्वयानं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या शनिवारी बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचं नियोजन, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेचं नुकसान टाळावं आणि पूर नियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयानं चांगलं व्हावं यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत असून शेजारच्या राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

****

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसह होल्डिंग कपंनी या चारही कंपन्यांसह महाऊर्जानं भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा तसचं उमेदवारांना तीनही कंपन्यांच्या भरतीप्रक्रियेत सहभागी होता यावं यासाठी परीक्षेच्या तारखा त्यानुसार निश्चित कराव्या असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. यासंदर्भातील आढावा बैठक काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. ऊर्जा कंपन्यांमधल्या अनुकंपावरील तत्त्वावरील नेमणुका, नवीन पदांची भरती तसंच पदोन्नतीबाबत आढावा घेण्यात आला.

****

परवानाधारक रिक्षा चालकांनी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याचं आवाहन नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं केलं आहे. कोविड प्रतिबंधक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून राज्य शासनानं परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयाचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान मिळण्यासाठी परवानाधारक रिक्षा चालकांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. नसल्यास त्यांनी ते संलग्न करावे, त्याचबरोबर आधारकार्डमध्ये दुरुस्ती असल्यास ती करुन घ्यावी, असं आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालयानं केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथल्या सहकारी संस्थेतला सहाय्यक निबंधक रवींद्र सावंत याला २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. विविध कार्यकारी सहकारी संस्थेविरुद्ध दाखल तक्रारींचं निरसन करण्यासाठी आणि सुनावणीमध्ये अनुकूल निकाल देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा अंतिम सामना आजपासून इग्लंडमधल्या साऊदम्प्टन इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

Post a Comment