Wednesday, 23 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि अन्य माध्यमांवर होणारा अपप्रचार आणि गैरसमज दूर करण्यासाठी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, लसीकरणाबाबतच्या अपप्रचाराला उत्तर म्हणून विशेष मोहीम सुरु केली आहे. प्रजननक्षम वयोगटातील लोकांमधे कोविड-19 लसीकरणामुळे वंध्यत्व येत असल्याच्या चिंता व्यक्त करणाऱ्या बातम्या, काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नसल्याचं, आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पुरुष किंवा महिलांमधे वंध्यत्व येतं असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसून, या लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. तसंच सर्व स्तनदा मातांनादेखील ही लस सुरक्षित आहे. लसीकरणाआधी किंवा नंतर स्तनपान थांबवण्याची गरज नसल्याचं, राष्ट्रीय तज्ज्ञ गटानं म्हटलं आहे.

****

राज्य कामगार विमा योजनेचा सभासद असलेल्या कामगाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास, वारसांना निवृत्तीवेतन देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे. २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती, योजनेच्या पुणे विभागाचे प्रभारी उपनिदेशक हेमंतकुमार पांडे यांनी दिली. मृत्यू पावलेला कामगार कोरोना निदान झालेल्या दिवसाआधी तीन महिने राज्य कामगार विमा योजनेमध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक असून, ज्या दिवशी कामगाराचा कोरोना अहवाल सकारात्मक त्या दिवशी तो नोकरीत असणं आणि त्याच दिवसापासून मागील एक वर्ष अगोदर ७० दिवसांचं अंशदान भरलेलं असणं आवश्यक आहे.

****

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या वतीनं २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल येत्या २८ जून रोजी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. मंडळानं काल जारी केलेल्या पत्रकांत ही माहिती देण्यात आली.  

****

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने इतर मागासवर्गीय - ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवलं असून, या विरोधात येत्या २६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी काल भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

****

निर्गुंतवणूक प्रक्रियेअंतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन मोठ्या सरकारी बँकांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत केंद्र सरकार सुरुवातीला सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन बँकांमधील आपला ५१ टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे.

****

आयकर न भरणाऱ्यांसाठीचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय प्राप्तीकर विभागानं घेतला आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांकडून एक जुलैपासून अधिक टीडीएस आणि टीसीएस वसूल केला जाऊ शकतो. अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आयकर विभागाने एक नवी व्यवस्था तयार केली आहे, ज्यानुसार एक जुलैपासून त्यांना अधिक कर भरावा लागणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने देखील याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे.

****

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत, राज्यातल्या अल्पसंख्याक समाजातल्या महिला बचतगटांना, व्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. या योजनेद्वारे अल्पसंख्याक महिलांमधल्या उद्योजकतेला चालना देऊन, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, असं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना कर्ज दिलं जाणार आहे. त्यासाठी संबंधीत बचतगटांनी अर्ज करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान तसंच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, या संस्थांच्या मदतीनं ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर तालुक्यातल्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेत अनेक गोरगरीबांना घरकुल लाभापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. अशा लोकांना लाभ मिळावा यासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात यावं, अशी मागणी हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. त्यांनी काल मंत्रालयात मुश्रीफ यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन दिलं.

****

इंग्लंडमध्ये साऊथ हँप्टन इथं सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असून, आज सहावा आणि शेवटचा दिवस आहे. काल पाचव्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद ६४ धावा झाल्या. भारताकडे ३२ धावांची आघाडी असली, तरी न्यूझीलंडचा दूसरा डाव अजून खेळला जायचा आहे.

****

No comments:

Post a Comment