Friday, 11 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      जलजीवन अभियानार्तंगत राज्याच्या अनुदानात जवळपास सव्वा पाच हजार कोटी रूपयांची केंद्र सरकारकडून वाढ.

·      पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंतचं शून्य टक्के व्याज दरानं कर्ज.

·      लोकसभा - विधानसभा निवडणूक यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढवणार - शरद पवार.

·      कोरोना विषाणू बाधित १८ वर्षांखालील मुलांना रेमडेसिविर इंजेक्शन न देण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना.

·      राज्यात १ हजार २०७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ४३ जणांचा मृत्यू तर ६८२ बाधित.

आणि

·      बीड तसंच जालना जिल्ह्यात पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू.

****

केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या जलजीवन अभियानाच्या अनुदानात जवळपास सव्वा पाच हजार कोटी रूपयांनी वाढ केली आहे. गेल्यावर्षी हे अनुदान एक हजार ८२९ कोटी रुपये होतं, ते यावर्षी सात हजार ६४ कोटी रुपये करण्यात आलं आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिं शेखावत यांनी, या वाढीला मंजूरी देताना, २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहचवण्यात, राज्यांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आतापर्यंत राज्यातल्या एकूण १४२ लाख घरांपैकी ९१ लाख ३० हजार घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत रांना नळजोडणी देण्याच्या कामाला सुरुवात करावी, जेणेकरुन २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करता येईल,सं पत्र केद्रीय मंत्री शेखावत यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. राज्यानं कामाच्या अंमलबजावणीचा वेग वाढवावा असंही त्यांनी पत्रात सूचित केलं आहे.

****

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, शून्य टक्के दरानं व्याज आकारणी केली जाणार आहे. एक लाख ते तीन लाख रुपयांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास, सध्याच्या एक टक्के व्याज दरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय, काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली तीन टक्के, आणि केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत, या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्यानं, शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दरानं उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, शहरांमध्ये प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांचं संरक्षण करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पन्नास वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांचं या अंतर्गत संरक्षण आणि संवर्धन केलं जाणार आहे.

राज्यातल्या सर्व दुय्यम न्यायालय, आणि मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयात, जिल्हा सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील नेमण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा, आणि परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प राबवण्यालाही, यावेळी मान्यता देण्यात आली. नाशिक इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदर्श आयटीआयकरायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. परिचर्या परिषदेवर नियुक्त प्रशासकांना पूर्वलक्षी प्रभावानं मुदतवाढ देण्यासाठी परिचारिका अधिनियम १९६६ मध्ये सुधारणेलाही, मंत्रीमंडळानं मान्यता दिली.

****

लोकसभा विधानसभा निवडणूक यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढवेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबई काल इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारला लोकांनी स्वीकारलं असल्याचं त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, धुळे इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनीही, महा विकास आघाडी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवेल, असं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे स्वबळावर काँग्रेस लढणार असल्याचं म्हणत असल्याच्या संदर्भात बोलतांना राऊत यांनी, स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्यासाठी स्वतंत्र असल्याचं सांगितलं. 

****

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज परिसरात १६ जून रोजी मूक आंदोलन करणार असल्याची घोषणा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केली आहे. मंत्री, खासदार आणि आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार, याची ठोस भूमिका त्यावेळी जाहीर करावी, असं खासदार संभाजीराजे यांनी काल कोल्हापूर इथं सांगितलं.

****

हज यात्रे संदर्भात भारत सरकार सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयानुसार कार्यवाही करेल, आणि सौदी अरेबिया सरकार जो निर्णय घेईल, त्याला भारताचा पाठिंबा राहील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत हज हाऊस इथं आयोजित बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या वर्षी कोविड-१९ महामारीमुळे सौदी अरेबिया सरकारनं त्याच देशात राहणाऱ्या विविध देशांच्या नागरिकांपुरतेच ‘मर्यादित हज’चं आयोजन करण्याची घोषणा केली होती.

****

राज्यात कालपासून सुरू झालेल्या दृष्टी दिन सप्ताहात ‘म्युकरमायकोसीसया आजाराबाबत जनजागृती करण्याचं आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळल्याचं ते म्हणाले. या कालावधीत सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्र शल्य चिकित्सक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना, डोळ्यांची निगा कशी राखावी याचं मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचं, टोपे यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू बाधित १८ वर्षांखालील मुलांना रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. करोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांच्या उपचारासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही, सहा ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत, असं या आदेशात म्हटलं आहे. लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या बालकांना स्टिरॉईड धोकादायक ठरु शकतात, तसंच अत्यंत गरज असेल तरच कोरोना बाधित लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी सांगण्यात यावं, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

राज्यात काल १ हजार २०७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५८ लाख हजार ८७ झाली आहे. काल ३९३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख तीन हजार ७४८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ४४९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५ लाख आठ हजार ७५३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ६० हजार ६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ६८२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४३ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या १४, औरंगाबाद १२, बीड सात, जालना चार, उस्मानाबाद तीन, परभणी दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १६८ रुग्ण आढळले. औरंगाबाद १३८, नांदेड १२७, उस्मानाबाद १०९, लातूर ५९, जालना २९, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी २६ नवे रुग्ण आढळून आले.

****

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आजपासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते शेंद्रा इथल्या औद्योगिक पायाभूत सुविधांचा आढावा घेणार असून, ते या दौऱ्यामध्ये काही कारखान्यांनाही भेटी देणार असल्याचं, सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

मान्सूननं आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, उत्तरेकडे कूच केली आहे.

दरम्यान, काल नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातल्या काही भागांत पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा, अर्धापूर आणि मुखेड तालुक्यांत काल मुसळधार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात जिंतूर, पूर्णा, मानवत, गंगाखेड या तालुक्यांत काल जोरदार पाऊस झाला. 

दरम्यान, मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

बीड आणि जालना जिल्ह्यात पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या दैठण इथल्या एका शेततळ्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. सुनिल पंडित यांचा मुलगा राज पंडित आणि भाचा पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडत होते. सुनिल पंडित यांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यानं, तिघांचा बुडून मृत्यू झाला.  

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या कुसळी इथं सात ते ११ वयोगटातल्या तीन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अक्षय वैद्य, दीपाली वैद्य, आणि मनोज वैद्य, अशी मृतांची नावं आहेत. तिघेही शेतात शेळ्या चारत असताना या भागात नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्यानं भरलेल्या छोट्याशा तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं ग्रासम्थांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण – ‘म्हाडा’ आगामी काळातही, औरंगाबादमधल्या विविध नियोजित योजना गतिमानतेनं पूर्ण करेल, असा विश्वास उद्योग मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. मंडळाच्या औरंगाबाद, हिंगोलीतल्या सदनिकांच्या विविध योजनेंतर्गत ८६४ सदनिकांच्या ‘ऑनलाईन’ सोडत कार्यक्रमात देसाई काल बोलत होते. ते म्हणाले –

चिकलठाणामधे जागा जी आहे ही सुध्दा आमच्या उद्योग विभागाने एम आय डी सी ने त्याठिकाणी उपलब्ध करून दिली आणि त्याठिकाणी ४२५ सदनिकांची योजना होणार आहे. त्याचबरोबर ऑरिक सिटी जी आज एक जागतिक दर्जाची औद्योगिक नगरी झालेली आहे आणि तिथेसुध्दा आराखडा तयार होतोय. याच्याच बरोबरीने वाळूजजवळचे तिसगाव १३.२८ हेक्टर जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हाडाने मागणी केलेली आहे. आणि त्यामुळे तिसगावमधे या शहराच्या जवळच आणखी काही घरं, सदनिका उपलब्ध होऊ शकतील.

 

म्हाडा आणि खासगी विकासकांच्या सहयोगानं संयुक्त भागीदारी प्रकल्पाद्वारे परवडणाऱ्या दरातल्या गृहनिर्मितीवर भर देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी नमुद केलं. ते म्हणाले –

८६४ घरांसाठी आठ हजार २२६ अर्ज प्राप्त झाले होते. म्हणजे १:१० चा रेशो पडतो. एका घराला १०. म्हाडावरती महाराष्ट्रातल्या लोकांचा असलेला विश्वास हाच याच्यात दर्शवला जातोय. आम्ही अशी विनंत करणार आहोत की सरकानेही म्हाडाला अधिकच्या जागा औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या शहरांमधे उपलब्ध करून द्याव्यात.

****

अमावस्या आणि त्यातच ग्रहण असताना कधीही कांदा लिलाव न करणाऱ्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत, काल प्रथमच अंधश्रद्धा मोडून कांद्याचा लिलाव करण्यात आला. राज्यात सर्व बाजार समित्या अमावस्येला सुरू असताना, नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावची बाजार समिती मात्र, अमावस्येला बंद असायची. पंच्याहत्तर वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा खंडीत करण्याचा निर्णय लासलगाव व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, काल सकाळच्या सत्रात कांद्याला कमीत कमी ७५२ रुपये, आणि अधिकाधिक तेवीसशे रुपये, तर सरासरी अठराशे एक रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला.

****

औरंगाबादमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या पैठणगेट स्थित मुख्य शाखेत कार्यरत वसुली प्रतिनिधी सुरेश भालेराव, आणि अन्य एका सरकारी नोकराला, लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं या आरोपींविरुद्ध काल गुन्हा नोंदवला आहे. पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचं कर्ज मंजूर करुन, त्याचं वितरण करण्यासाठी आरोपींनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. यातल्या तक्रारदाराकडून तीस हजार रुपये तसंच पन्नास हजार रुपयाचे धनादेश मागून, ते स्वीकारताना ही अटक करण्यात आली. आरोपीच्या ठिकाणांवर या प्रकरणी झडती घेण्यात आली असून, तिथं आक्षेपार्ह दस्तावेज आढळला आहे. या प्रकरणी बँक अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.

****

औरंगाबादमध्ये खाजगी शिकवण्या घेणाऱ्यांच्या संघटनेतर्फे क्रांती चौक इथं, काल मानवी साखळी तयार करुन निदर्शनं करण्यात आली. येत्या चौदा तारखेपासून खाजगी शिकवण्या सुरू करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खाजगी शिकवण्या घेणाऱ्यांचा लघुउद्योजकांमध्ये समावेश करावा, गेल्या दोन वर्षांचा कर माफ करावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन, आंदोलकांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. शहरातल्या सर्व बाजारपेठा सुरु असताना शिकवणी वर्ग बंद का असा प्रश्न यावेळी संघटनेचे अध्यक्ष पी.एम. वाघ, कार्याध्यक्ष प्रशांत बनसोडे यांनी उपस्थित केला.

****

नांदेड इथल्या शुभंकरोती प्रतिष्ठान आणि देसाई प्रतिष्ठानतर्फे वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना अन्नधान्य आणि आवश्यक किराणा सामानाचं काल वाटप करण्यात आलं. संसर्ग प्रादुर्भावामुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ही मदत करण्यात आली. शुभंकरोती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण चिदरावार आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

****

No comments:

Post a Comment