Thursday, 1 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.07.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 July 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

एक राष्ट्र म्हणून सहा वर्षांच्या कालावधीत भारतानं डिजिटल इंडियासह नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणला असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला आज सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी, ‘डिजिटल इंडिया’च्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सर्वात मोठ्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणारं कोविन ॲप, हे देशाच्या तांत्रिक कौशल्याचं उत्तम उदाहरण असून, अनेक देशांनी या ॲपमध्ये रुची दर्शवली असल्याचं ते म्हणाले. मेहनत आणि पैशांची बचत, कमी वेळेत अधिक काम तसंच किमान शासन, कमाल प्रशासन म्हणजे डिजिटल इंडिया असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. डिजिटल इंडिया मोहिमेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षात झालेल्या कामांची, राबवलेल्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला.

हिंगोली इथले प्रल्हाद बोरघड यांनी पंतप्रधानांना, ई-नाम प्रणालीमुळे झालेल्या लाभांबाबत यावेळी माहिती दिली. ई-नामच्या माध्यमातून पिकाला किंमतही चांगली मिळते, या ऑनलाइन माध्यमामुळे टाळेबंदी काळातही माल विकण्यात अडचण आली नाही, असं बोरघड यांनी सांगितलं.

****

शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार असून, कोणतीही शाळा किंवा शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेऊ शकत नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नाकारणं, निकाल रोखणं, परीक्षा देण्यापासून वंचित ठेवणं आणि शाळेतून काढून टाकणं बेकायदेशीर असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा सर्व बाबींवर लक्ष ठेवावं आणि अशा शाळा आणि शिक्षण संस्थांची नोंदणी रद्द करावी, असे निर्देश गायकवाड यांनी दिले आहेत.

****

कोविड प्रतिबंधक लसीमुळे नपुंसकत्व येत नसल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात माध्यमांतून विविध स्वरुपाच्या बातम्या प्रसारित होत आहेत, त्याचं खंडन मंत्रालयानं केलं आहे. या वृत्ताला कुठलाही वैज्ञानिक आधार नसून, पूर्ण परीक्षणाअंती संपूर्ण सुरक्षितता लक्षात घेऊनच कोविड लसींच्या वापराला मंजुरी मिळाली असल्याचंही, कोविड-19 कृती दलाचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी स्पष्ट केलं.

****

कोविडचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्ट कंपनीनं राज्य शासनाला ३० आयसीयू व्हेंटिलेटर्सची मदत दिली असून, ती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल स्वीकारली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक रजनीश कुमार उपस्थित होते.

****

राज्य सरकारनं अग्निशमन सेवा शुल्क आकारणी रद्द करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुळातच मालमत्ता करामध्ये अग्निशमन सेवा कर समाविष्ट असल्यानं एकाच वेळी अनेक वेळा कर आकारणी योग्य नसल्याचं मत, विधी समिती आणि स्थायी समितीनं वर्ष २०१२ मधे नोंदवलं होतं, असं जगताप यांनी पत्रात म्हटलं आहे. 

****

ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी एकरकमी देणंच योग्य असल्याचं, माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बोलत होते. एफआरपीची रक्कम तीन हप्त्यात द्यावी असा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यावर राज्याला शिफारस करायची आहे, मात्र आपण असा निर्णय होऊ देणार नाही, वेळ पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा, शेट्टी यांनी दिला.

****

वाढती बेरोजगारी, महागाई आणि जनतेची उपासमार या विरोधात, भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसंच देशभरातल्या सर्व डाव्या पक्षांनी, १६ ते ३० जून दरम्यान देशभर पंधरा दिवस आंदोलन केलं, या आंदोलनाचा काल समारोप झाला. आंदोलक पक्ष संघटनांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन, पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीनंही काल प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या सहस्त्रकुंड इथल्या शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नामदेव कौलवाड याला, दीड हजार रुपये लाच घेताना, काल रंगेहात पकडण्यात आलं. कंत्राटी मजुराचे चार महिन्याचे पगार देयक काढून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

अमृतसर-हुजूर साहिब नांदेड-अमृतसर ही अकोला मार्गे विशेष रेल्वे गाडी येत्या पाच जुलैपासून अमृतसर इथून सुरु होणार आहे. ही गाडी सोमवारी दुपारी अडीच वाजता अमृतसरहून सुटेल आणि जालंधर, लुधियाना, दिल्ली, झांसी, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे नांदेड इथं मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवारी सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी नांदेडहून सुटेल आणि गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अमृतसर इथं पोहोचेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment