Thursday, 29 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या पुरुष हॉकी संघानं अर्जेंटिनाचा तीन - एक असा पराभव केला.

बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१ - १५, २१ - १३ असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

तिरंदाजीतही अतनु दासनं उप-उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या जिनह्येक ओह याचा सहा - पाच असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर पिस्टल पात्रता फेरीत मनु भाकेर पाचव्या स्थानावर, तर राही सरनोबत १८व्या स्थानावर राहिली. या फेरीचा दुसरा भाग उद्या होणार आहे.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुपर हेवीवेट प्रकारात भारताचा सतीश कुमारही उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आज झालेल्या सामन्यात त्याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊन याचा चार - एक असा पराभव केला.

****

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध उपक्रमांचा प्रारंभ होणार आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान धोरणकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

****

देशात कोरोना विषाणूचा फैलाव अजून पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेले निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं काल राज्यातल्या आठ शहरांमध्ये १२ ठिकाणी छापे घातले. यात एन्काउंटर स्पेशालिस्ट सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मुंबई, पुणे, आणि पोलिस उपायुक्त राजु भुजबळ यांच्या अहमदनगर इथल्या मालमत्तांवरही धाडी टाकण्यात आल्या.

****

राज्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप आमदारांनी एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली.

****

No comments:

Post a Comment