Friday, 30 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2021

Time 7.10AM to 7.20AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्ण संख्येत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्याचे राज्य सरकारचे संकेत.

·      वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय कोट्यात इतर मागासवर्गीयांना २७ टक्के, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, १० टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      २०२१चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर.

·      राज्यात सात हजार २४२ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर ३८२ बाधित.

आणि

·      टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सातव्या क्रमांकावर.

****

राज्यातल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्ण संख्येत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नियमित आढावा बैठक झाल्याचंही, त्यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. त्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा झाली असून, या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध वाढवण्यात येतील, असं त्यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या दोन दिवसांमध्ये शासनादेश निघेल असंही टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, बीड, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, अहमदनगर या ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचं त्याठिकाणी निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत, असं टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून, अखिल भारतीय कोट्यात इतर मागासवर्गीयांना २७ टक्के, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जाहीर केलं. या निर्णयाचा इतर मागासवर्गीयांमधल्या दिड हजार पदवीच्या, आणि दोन हजार पाचशे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बलघटकातल्या पाचशे पन्नास पदवी आणि एक हजार पदव्युत्तर विद्यार्थी, अशा एकूण पाच हजार पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनाही, या निर्णयाचा लाभ होणार आहे.

****

अतिवृष्टीमुळे ज्या व्यावसायिक, दुकानदारांचं आणि नागरिकांचं नुकसान झालं आहे, त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीनं द्यावी, असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. नुकसानग्रस्तांना कागदपत्रांची पूर्तता करून उर्वरित विमा रक्कमही लवकरात लवकर मिळावी, तसंच विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेनं केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असंही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केलं जात असून, त्या पार्श्वभूमीवर विशेषत: कर्करोग उपचारावर सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावं, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यांनी जपानचे मुंबईतले वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरता सहकार्य करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्यात वास्तव्याला असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिली.

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचं नियोजन करून तिथं लवकरात लवकर वर्ग सुरु करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी नुकसानग्रस्त शाळांची माहिती घेतली. ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचं नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणी नव्यानं पाठ्यपुस्तकं पुरवावी, नुकसान झालेल्या शालेय पोषण आहारातल्या तांदूळ आणि धान्य आदी वस्तुंचा पुरवठा पुन्हा करण्यात यावा, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, आणि पुरामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पर्यायी वसतीगृहाच्या व्यवस्थेचं नियोजन करावं, आदी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

****

राज्य शासनाचा २०२१ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी, आशा भोसले त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केलं. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती, देशमुख यांनी यावेळी दिली. राज्य शासन संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून, यासाठी संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांची मदत घेतली जाणार असल्याचंही ते म्हणाले.

****

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांच्या दूरध्वनींचं ध्वनीमुद्रण केलं होतं, तर त्यांनी त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्र्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, नवाब मलिक यांनी विचारला आहे. शुक्लांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये शासकीय परवानगी घेऊन हे ध्वनीमुद्रण करण्यात आल्याचं सांगितलं आहे. दिशाभूल करुन ही परवानगी घेण्यात आली आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. त्यांनी नेत्यांच्या दूरध्वनींचं ध्वनीमुद्रण करण्यासाठी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

****

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून, ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी, आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा इशारा देऊन, साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा आरोप, क्रिकेट सट्टेबाज सोनू जलान यानं केला आहे. त्यानं या संदर्भातली लेखी तक्रार ठाणे नगर पोलिस ठाण्यात केली असून, मित्र केतन तन्ना याच्याकडून देखील, एक कोटी २५ लाख रुपये वसुली केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल असून, ही तिसरी तक्रार करण्यात आली आहे.

****

राज्यात काल सात हजार २४२ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ९० हजार १५६ झाली आहे. काल १९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३२ हजार ३३५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल ११ हजार १२४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ७५ हजार ८८८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ५९ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७८ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३८२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २१२ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७०, लातूर ३५, औरंगाबाद २८, जालना २५, परभणी सहा, नांदेड पाच, तर हिंगोली जिल्ह्यात काल एक नवा रुग्ण आढळला.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने आज पहाटे झालेल्या सामन्यात रशियाच्या सेनिया पेरोवाचा सहा - पाच असा पराभव केला. ॲथलेटिक्स स्पर्धा आजपासून सुरु झाल्या. आज सकाळी झालेल्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सातव्या क्रमांकावर राहीला.

गोल्फ मध्ये अनिर्बान लाहिरीचा सामना सुरु आहे. नेमबाजीत मनु भाकेर आणि राही सरनोबत यांचा २५ मीटर पिस्टल प्रकारातलाही सामना सध्या सुरु असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भाकेर सातव्या तर राही ३२व्या स्थानावर खेळत आहे. 

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीतला सामना जपानच्या यामागुची हिच्याशी होणार आहे. हॉकी मध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना जपानविरुद्ध, तर महिला संघाचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.

मुष्टीयुद्ध मध्ये ६९ किलो वजनी गटात लवलिना बोरोघेनचा उपान्त्यपूर्व फेरीचा सामना, तर ६० किलो वजनी गटात सिमरनजीत कौरचा उप-उपान्त्यपूर्व फेरीचा सामना आज होणार आहे.

दरम्यान, काल या स्पर्धेत महिला मुष्टीयोद्धा मेरी कोम हिला कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना वलेन्सिया व्हिक्टोरियाकडून तीन -दोन असा पराभव पत्करावा लागला.

तिरंदाजीत अतनु दासनं कोरियाच्या जिनह्येक ओह याचा सहा - पाच असा पराभव केला.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुपर हेवीवेट प्रकारात भारताचा सतीश कुमार उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. काल झालेल्या सामन्यात त्याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊन याचा चार - एक असा पराभव केला. सुपर हेवीवेट प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला सतीश कुमार हा पहिला भारतीय मुष्टीयोद्धा आहे. 

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना श्रीलंकेनं सात गडी राखून जिंकत, मालिका दोन - एकनं जिंकली आहे. काल कोलंबो इथं झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी भारतीय संघ अवघ्या ८१ धावाच करु शकला. श्रीलंकेच्या संघानं हे लक्ष्य १५व्या षटकातच पूर्ण केलं.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय घाटीच्या आवारातील संरक्षण भिंत तसचं ड्रेनेज लाईन बांधकामासाठी, आठ कोटी रूपये शासनानं मंजूर केले असल्याचं, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी म्हटलं आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बांधकामासाठी निधीची तरतूद करावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत होतो, अशी माहितीही त्यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

****

कोविड-19च्या साथीत विधवा झालेल्या महिलांसाठी राज्य शासनानं धोरण जाहीर करावं, अशी मागणी करणारं निवेदन, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दहा विविध स्वयंसेवी संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. विधवा महिलांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यात यावा, मालमत्तांमध्ये त्यांच्या नावांची नोंद करावी, त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था करावी, आदी मागण्या यात करण्यात आल्या आहेत.

****

सामाजिक शास्त्रांचं संशोधन हे मुलभूत आणि समाजोपयोगी असावं, असं मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केलं आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या वतीनं ‘सामाजिक शास्त्र संशोधन’ या विषयावर घेतलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात ते काल बोलत होते. संशोधन फक्त पदवी मिळवण्यापर्यंतच मर्यादित न राहता, ते व्यापक आणि समाजासाठी दिशादर्शक असणं गरजेचं असल्याचं कुलगुरु म्हणाले.

****

उस्मानाबाद शहरात भारतीय जनता पक्ष आणि भाजप युवा मोर्चाच्या वतीनं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी निधी सकंलित करण्यात आला. यासाठी काल मदत फेरी काढण्यात आली होती.

बीड जिल्ह्यात परळी शहरातही भाजपच्या वतीनं मदतफेरी काढण्यात आली. या मदतफेरीत पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या.

बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथून जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्त भागातील नागरिकांना संसार उपयोगी साहित्य पाठवण्यात आलं. यामध्ये १४०० क्विंटल अन्नधान्य आणि किराणा तसंच जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी लोहा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे हे उपस्थित होते. गोरठेकर हे २०१९ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भोकर विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

****

औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या महिला तक्रार निवारण केंद्र आणि भरोसा सेलच्या अद्यावत इमारतीचं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या माध्यमातून कौटुंबिक समस्या, वादविवाद सोडवल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. यात पोलीसांसह मानसोपचार तज्ज्ञ, वकील तसंच समाजकल्याण अधिकारी यांच्या सहकार्यानं तक्रारदारांचे अधिक चांगल्या प्रकारे समुपदेशनाचं कार्य होईल, त्यामुळे बरेच कुटुंब तुटण्यापासून वाचतील, असं मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

राज्यात काल कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment