Sunday, 22 August 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २२ ऑगस्ट २०२१ सकाळी ११.०० वाजता

                                                              आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी आज साजऱ्या होत असलेल्या रक्षाबंधन सणासाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातल्या जनतेला रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नारळी पौर्णिमा साजरी करताना सर्वांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पवार यांनी केलं आहे. दरम्यान आज साजऱ्या होत असलेल्या संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही जनतेला या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

देशात काल ३४ हजार ४५७ नवीन कोविडबाधितांची नोंद झाली. तर ३६ हजार ३४७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. कोविड-19 मुळे ३७५ रुग्णांच्या मृत्युची नोंद या कालावधीत झाली. राज्यात काल कोविड - 19 चे पाच हजार ९१४ रुग्ण बरे झाले तर चार हजार ५७५ नवे बाधित आढळले. दरम्यान, देशात आतापर्यंत ५८ कोटीहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीकरण झालं आहे. काल ४३ लाख ९२ हजार लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. मराठवाड्यात काल २२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या पुण्यातल्या घोरपडी इथल्या ''आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट'' मधल्या ''अॅथलेटिक्स स्टेडियम''ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचं नाव देण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या हे नामकरण केलं जाणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्रानं या संस्थेत भालाफेकीचं प्राथमिक प्रशिक्षण घेतलं होतं.

****

सोन्याच्या दागिन्यांवर शुद्धतेसाठी करण्यात येणारे हॉलमार्किंग चुकीचं आणि असंविधानिक असून याच्या निषेधार्थ राज्यातल्या सराफी बाजारपेठेत येत्या सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली

****

पंजाबमध्ये सुरु असलेल्या किसान आंदोलनामुळे अमृतसरहून आज सुटणारी अमृतसर -नांदेड सचखंड गाडी रद्द झाली आहे. त्यामुळे उद्या नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड जलदगती रेल्वेगाडी रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं.

//**********************//

 

 

No comments:

Post a Comment