▼

Friday, 20 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** राज्यातल्या मनोरुग्णालयांसाठी दीड हजार कोटी रुपये निधी मंजूर

** समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी

आणि

** मराठा बांधवांच्या संयमाची परीक्षा पाहू नका - खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा इशारा

****

कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने आज दोनशे सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचं आज नागपूर इथं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. सद्भावना जीवनरथाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात पोहोचून लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार असल्याचं थोरात यांनी यावेळी सांगितलं. या दोनशे वाहनांपैकी नागपूर विभागासाठी १२८ तर अमरावती विभागासाठी ७२ वाहनं कार्यरत राहणार आहेत.

****

राज्यातल्या मनोरुग्णालयांसाठी दीड हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला  टोपे यांनी आज भेट देऊन, मनोरुग्णालयातील रुग्णांची व्यवस्था, उपलब्ध मनुष्यबळ तसेच सोयीसुविधांची पाहणी केली. काही मनोरुग्णांशी देखील त्यांनी यावेळी संवाद साधला. मनोरुग्णालयासारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणी संवेदनशीलपणे काम करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. या मनोरुग्णालयातील रिक्तपदांवर तातडीनं नेमणुका करण्यात याव्या तसंच आरोग्य विभागाच्या भूखंडांवरील अतिक्रमणं तातडीनं काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या. मनोरुग्णालयातील रुग्णांची प्रवेश प्रक्रिया सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी सुधारित नियमावली प्रमाणे "वॉलन्ट्री बोर्ड" तसंच जिल्हानिहाय "रिव्ह्यूह बोर्ड" तातडीनं स्थापन करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

शिक्षण क्षेत्रातला अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीनं राज्य सरकारला स्मरण पत्र देणार असल्याचं, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सांगितलं आहे. शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी ही माहिती दिली. शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात बोडखे यांनी आमदार गाणार आणि शिक्षक परिषदेच्या राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आज चर्चा केली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून शिक्षक दिनी हे स्मरण पत्र देण्यात येणार असल्याचं आमदार गाणार यांनी सांगितलं. राज्यातले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची बीडीएस प्रणाली बंद केली आहे. अपुरे वेतन, शाळांना मिळणारे अनुदान, भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव, यासारख्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचं बाबासाहेब बोडखे यांनी सांगितलं.

****

देशात आजपासून २५ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भाषातज्ज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्कृत भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं.

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. हा दिवस देशभरात “सद्भावना दिवस”म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगानं आजपासून ते ५ सप्टेंबर या कालावधीत “सामाजिक ऐक्य पंधरवडा” पाळला जाणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज मातोश्री निवासस्थानी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपस्थितांना 'सद्भावना' दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली गेट इथल्या राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातही राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली.

****

बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारी मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा भीषण अपघात होऊन १३ मजुरांचा मृत्यू झाला तर ३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांसह लोखंडी गज आणि सिमेंटची पोती तढेगाव इथल्या कॅम्पवर घेऊन जाणाहे हे वाहन समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नांत रस्त्याच्या खाली उतरून पलटल्यानं वाहनातले मजूर लोखंडी गजांखाली दबले गेले. अपघातग्रस्त सर्व मजूर मध्यप्रदेश इथले असून अपघातातील जखमींवर जालना इथं उपचार सुरू आहेत, तर सर्व मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत.

****

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली जिल्ह्यात झरे परिसरात पोलिसांना हुलकावणी देत, बैलगाडी शर्यत घेतली. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत होऊ द्यायची नाही, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने या परिसरात संचारबंदी लागू केली होती, ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती, मात्र तरीही झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडी पठारावर बैलगाडी शर्यत घेण्यात आली.

दरम्यान, पडळकर यांनी राजकीय स्टंटबाजीसाठी शर्यत घेतल्याची टीका मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला आहे. सावंत यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही शेतकऱ्यांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयात बैलगाडी शर्यतीसंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात या शर्यतीमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो, असं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

****

सकल मराठा समाज शांत आणि संयमाने आपला अधिकार मागत असून त्याच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे, नांदेड इथं आज सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूक आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्णायक भूमिका घ्यावी असं आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावेळी केलं. राज्यातला मराठा समाज हा शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागास असल्याचं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणं कठीण असल्याचं भोसले यावेळी म्हणाले. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आंदोलनाच्या वेळी अनुपस्थितीबाबत त्यांनी जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीबरोबरच इतर मागण्याही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मांडल्या. या मूक आंदोलनाला इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

****

नवनियुक्त केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा आज औरंगाबादमध्ये दाखल झाली. जिल्ह्यातील गोलटगाव फाटा इथं या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. शहर आणि जिल्ह्यातल्या विविध भागात मार्गक्रमण करत या यात्रेचा कन्नड इथं उद्या समारोप होणार आहे. परळी इथल्या गोपीनाथगडा हुन सुरु झालेली ही यात्रा बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना असे पाच जिल्ह्यातून येऊन आज औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली आहे.

****

No comments:

Post a Comment