▼

Saturday, 21 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** झायडस कॅडिला या कोविड प्रतिबंधक लसीबाबत पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन

** कोविडचा धोका लक्षात घेऊन जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

** स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथं फिट इंडिया फ्रिडम रनला उत्स्फुर्त प्रतिसाद

आणि

** अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यू

****

कोविड १९ आजारासाठीच्या झायडस कॅडिला या प्रतिबंधक लसीबाबत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. " भारत कोविड  विरुद्ध अभियानात संपूर्ण ताकतीने लढत आहे. जगाची पहिली डीएनए आधारित ' झ्याकोव-डी ' झायडस द्वारा निर्मित ही लस भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनाचं फलित आहे, हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे "असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराला देशाच्या औषध नियंत्रक महासंचालकांकडून मंजुरी देण्यात आली आहे.

****

देशभरात आज ५८ कोटी नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात आली. लसीकरणाचा ५८ कोटींचा आकडा पार करणं ही मोठी नोंद असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटीपार्कमध्ये उभारलेल्या मुलांसाठीच्या कोविड सुश्रुषा केंद्राचे लोकार्पण करतांना बोलत होते.

कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक तसंच इतर कार्यक्रम आयोजित करणं आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकतं, फक्त अर्थचक्र सुरळीत व्हावं, यासाठी आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या तसंच इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करू  नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.  

लहान मुलांसाठी कोविड कृती दल स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. मुंबईत आधुनिक जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती मिळत राहील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. ते आज पुण्यात बोलत होते. शाळा सुरू करण्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. तिसऱ्या लाटेची ही शक्यता लक्षात घेऊनच यासंदर्भातल्या कृती दलानं दिवाळीनंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना केली आहे. मात्र, महाविद्यालये सुरू करताना कोविड नियमांचं पालन करण्याबरोबरच ज्या विद्यार्थी-शिक्षकांचं लसीचे दोन डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील,'' अशी माहिती पवार यांनी दिली.

****

राज्यातल्या ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. केंद्रीय सैनिक मंडळातर्फे बारावीत उत्तीर्ण झालेल्या तसंच पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. राज्यभरातून ५०० विद्यार्थांनी शिफारस अर्ज केले होते, त्यापैकी ४१३ विद्यार्थ्यांना म्हणजे जवळपास ८२ टक्क्यांहून अधिक पाल्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या टक्केवारीत राज्याचा देशात पाचवा क्रमांक आहे.

****

व्यापाऱ्याकडून नऊ लाख रुपयांची वसुली केल्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यासह सहा जणांविरोधात गोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या जानेवारी- ते मार्च  बारमालक आणि रेस्टॉरंट चालकाकडून ते चालवण्यासाठी वाझे आणि दुसऱ्या आरोपींनी नऊ लाख रुपये तसंच दोन मोबाईल हफ्ता म्हणून घेतले होते, असं विमल अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

****

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी आज जनआशीर्वाद यात्रेदरम्यान, औरंगाबाद शहरात विविध भागातून मार्गक्रमण करत, नागरिकांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोविड काळात काम केलेल्या कोविड योद्ध्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या यात्रेचा आज कन्नड तालुक्यात समारोप होत आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशातल्या तरुणाईला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देण्यासाठी, देशात ७५ ठिकाणी, फिट इंडिया फ्रिडम रन आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगानं नेहरु युवा केंद्राच्या वतीनं आज औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही दौड घेण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत, झालेल्या या दौडमध्ये अनेक तरुण तरुणी सहभागी झाल्याचं, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांनी सांगितलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या  हिंगोली -सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर कोळशा शिवारात ट्रक उलटून झालेल्या अपघातात एका मजूरासह ८० मेंढ्या दगावल्या. राजस्थानहून हैद्राबादकडे जाणाऱ्या  ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक उलटून हा अपघात झाला. किरकोळ जखमी झालेल्या ट्रक चालकासह पाच जणांना गावकऱ्यांनी वाचवलं, मात्र ट्रकच्या मागील बाजूस बसलेल्या एका मजूराचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे-मुंबई महामार्गावर भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातले तीन तरुण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना धुळ्याच्या हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कन्नड तालुक्यातले आठ तरुण एका कारने इंदौरकडे जात असतांना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

****

परभणी जिल्हा परिषदेच्यावतीनं २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान वृक्षवंदन-रक्षाबंधन सप्ताह साजरा केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा,अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीमध्ये वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे रक्षाबंधन करून भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो अगदी त्याप्रमाणे गावातील प्रत्येक विद्यार्थी, युवक, नागरिक, कर्मचारी यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्विकारावी असा या उपक्रमा मागचा हेतू आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं आज ५० पोती गुटखा जप्त करण्यात आला. गुटख्यांनी भरलेला कंटेनर कर्नाटकातून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. गुटखा आणि कंटेनरसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करत, पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.

****

पंजाबमध्ये सुरु असलेल्या किसान आंदोलनामुळे अमृतसरहून आज सुटणारी अमृतसर-नांदेड सचखंड गाडी रद्द झाली आहे. त्यामुळे उद्या नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड जलदगती रेल्वेगाडी रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

//********//

 

No comments:

Post a Comment