Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 August 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २२ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत
देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी
ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे.
महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी
नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर
राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
**
कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदार नागरिक
म्हणून वागण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
**
राज्यात चार हजार ५७५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात
आठ जणांचा मृत्यू तर २२१ बाधित
** उत्तर
प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, कल्याण सिंह यांचं काल निधन
**
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा औरंगाबाद
शहरात जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जनतेशी
संवाद
**
सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग
विरोधात राज्यातील सराफांचा उद्या एक दिवसाचा लाक्षणिक संप
आणि
** धुळे-मुंबई
महामार्गावर भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड
तालुक्यातले तीन तरुण ठार
****
कोविडचा धोका टळलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून
वागण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयटीपार्कमध्ये उभारलेल्या मुलांसाठीच्या
कोविड सुश्रुषा केंद्राचे लोकार्पण करतांना बोलत होते.
कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक
तसंच इतर कार्यक्रम आयोजित करणं आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकतं,
फक्त अर्थचक्र सुरळीत व्हावं, यासाठी आपण काही
प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी
पडून स्वत:च्या तसंच इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करू नये असं आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी केलं.
लहान मुलांसाठी कोविड कृती दल स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे.
मुंबईत आधुनिक जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरु करण्यात आली असून त्या
माध्यमातून आपल्याला संसर्गाविषयी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थित आणि त्वरेने माहिती
मिळत राहील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच
घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल
सांगितलं. ते पुण्यात बोलत होते. शाळा सुरू करण्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.
तिसऱ्या लाटेची ही शक्यता लक्षात घेऊनच यासंदर्भातल्या कृती दलानं दिवाळीनंतरच शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना केली आहे. मात्र, महाविद्यालये सुरू
करताना कोविड नियमांचं पालन करण्याबरोबरच विद्यार्थी आणि
शिक्षकांचे
लसीचे दोन डोस पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे
याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतील, अशी माहिती पवार यांनी दिली.
****
राज्यात काल चार हजार ५७५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख २० हजार ५१०
झाली आहे. काल १४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३५
हजार ८१७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के
झाला आहे. काल पाच हजार ९१४ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६२ लाख २७ हजार २१९ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक
९९ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५३ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन तर हिंगोली आणि जालना
जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११५ रुग्ण आढळले. उस्मानाबाद
जिल्ह्यात ६८, औरंगाबाद १६, लातूर
११, जालना सहा, तर नांदेड जिल्ह्यात
काल तीन रुग्ण आढळले. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एक
नवा रुग्ण आढळला.
****
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, भारतीय
जनता पक्षाचे जेष्ठ नेते कल्याण सिंह यांचं काल लखनऊ इथं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ इथल्या संजय गांधी आयुर्विज्ञान
संस्थेत उपचार सुरू होते. तीन वेळा
मुख्यमंत्री राहिलेले कल्याणसिंह आठ वेळा आमदार म्हणून
निवडून आले होते. राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी
काम पाहिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविन्द, उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक
राजकीय नेत्यांनी कल्याण सिंह यांच्या निधनामुळं दु:ख व्यक्त केलं आहे.
****
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर
भागवत कराड यांनी काल
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान, औरंगाबाद शहरात विविध भागातून मार्गक्रमण
करत, नागरिकांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या विविध
योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. डॉक्टर कराड यांची साखरतुला करण्यात आली तर कोविड काळात काम केलेल्या कोविड योद्ध्यांचा यावेळी गौरव
करण्यात आला.
दरम्यान,
डॉक्टर
कराड यांच्या नेतृत्वात काढण्यात
आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत कोरोना विषाणूच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी
संयोजकांसह कार्यकर्त्यांविरूद्ध औरंगाबाद शहरातल्या १३ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत. या यात्रेत शहरात ठिकठिकाणी व्यासपीठ उभारून कराड यांचा
सत्कार करण्यात आला, यावेळी कोरोना विषाणूच्या नियमांचं पालन
केलं नसल्याचं आढळून आलं आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग पथकासह अतिक्रमण हटाव पथकानं या यात्रेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री दानवे आणि डॉक्टर
कराड यांचे बेकायदा लावलेले पोस्टर्स, बॅनर्स,
आणि झेंडे काल काढून टाकले. यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली
नव्हती.
****
युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
मार्गदर्शनाखाली देशात होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी
युवा वारियर्स म्हणून काम करण्याचं आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष
विक्रांत पाटील यांनी केलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं घेण्यात
आलेल्या युवा वारियर्स मेळाव्यात ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते.महाराष्ट्रातील
आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासिन असून मराठ्यांना
न्याय देऊ शकत नाही, जोपर्यंत इतर मागास वर्गीय समाजाला आरक्षण
मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा
इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी यावेळी दिला.
****
रक्षाबंधनाचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या या
सणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
रक्षाबंधनाचा सण समाजातील समस्त माता-भगिनींबद्दलचा मान-सन्मान, आदर वाढवणारा असेल. भावा-बहिणीचं पवित्र नातं साजरं करत असताना समाजातील
स्त्री-पुरुष समानतेची भावना या सणामुळे अधिक दृढ होईल, असा
विश्वासही
उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेच्यावतीनं २३ ते ३० ऑगस्ट दरम्यान वृक्षवंदन-रक्षाबंधन
सप्ताह साजरा केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत रक्षाबंधनाचे औचित्य साधून
जिल्ह्यातील प्रत्येक शाळा,अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीमध्ये वृक्षांची
लागवड करून त्यांची जोपासना करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे रक्षाबंधन करून भाऊ
आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो अगदी त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक
विद्यार्थी, युवक, नागरिक,
कर्मचारी यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्विकारावी असा या
उपक्रमा मागचा हेतू आहे.
****
सोन्याच्या दागिन्यांवर शुद्धतेसाठी करण्यात येणारे हॉलमार्किंग चुकीचं आणि
असंविधानिक असून याच्या निषेधार्थ राज्यातील सराफी बाजारपेठेत येत्या सोमवारी एक
दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार
संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली. पूर्वी दागिन्यांवर ब्युरो ऑफ इंडियन
स्टॅंडर्ड आणि हॉल मार्क सेंटर यांचे बोध चिन्ह, शुद्धतेचा
शिक्का आणि दुकानाचं नाव असायचे. नव्या नियमानुसार दागिन्यांवर हॉल मार्क सेंटर
आणि दुकानाचं नाव काढून टाकण्यात आलं आहे. हॉलमार्किंग प्रक्रियेला लागणारा वेळ,
दागिना मोडताना ग्राहकांवर पडणारा आतिरिक्त आर्थिक ताण आणि या
अनुषंगानं व्यापाऱ्यांवर चालवले जाणारे फसवणुकीचे खटले याच्या निषेधार्थ संप
करण्यात येणार आहे असंही रांका यांनी नमूद केलं. १६ जूनपासून
हॉलमार्किंग टप्प्याटप्प्याने अमलात आणण्यात येत असून संपूर्ण भारतातील २५६
जिल्ह्यांमध्ये ते लागू करण्यात आले आहे.
****
व्यापाऱ्याकडून नऊ लाख रुपयांची वसुली केल्या प्रकरणी माजी पोलिस आयुक्त
परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यासह सहा जणांविरोधात गोरेगाव
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या जानेवारी - ते मार्च दरम्यान
बारमालक आणि रेस्टॉरंट चालकाकडून ते चालवण्यासाठी वाझे आणि दुसऱ्या आरोपींनी नऊ
लाख रुपये तसंच दोन मोबाईल हफ्ता म्हणून घेतले होते, असं विमल अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटलं
आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या ग्रंथ पुरस्कारांच काल औरंगाबाद इथं वितरण
करण्यात आलं. यावेळी बोलतांना जेष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी चांगला लेखक
होण्यासाठी चांगलं वाचन करून अधिक चांगलं लिहिण्याचं आवाहन केलं. फक्त
पुरस्कारासाठी लेखन करू नये असंही ते
म्हणाले. सध्या साहित्याचे निकष नसलेल्या पुरस्कारांचा सुळसुळाट झाल्याची खंतही
त्यांनी व्यक्त केली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशातल्या तरुणाईला तंदुरुस्त
राहण्याचा संदेश देण्यासाठी, देशात ७५ ठिकाणी,
फिट इंडिया फ्रिडम रन आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगानं नेहरु
युवा केंद्राच्या वतीनं काल औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात ही दौड घेण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य
इमारतीपर्यंत, झालेल्या या दौडमध्ये अनेक तरुण तरुणी
सहभागी झाल्याचं, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी
संकल्प शुक्ला यांनी सांगितलं आहे.
****
धुळे-मुंबई महामार्गावर भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातले तीन तरुण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. काल
पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना धुळ्याच्या हिरे वैद्यकिय
महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कन्नड तालुक्यातले
आठ तरुण एका कारने इंदौरकडे जात असतांना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा
अपघात झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या
महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा
सुलोचना आरसुडे, तालुकाध्यक्षा अंजली पाटील, शहराध्यक्षा नंदिनी सानप, माजी जिल्हा उपाध्यक्ष
सविता जाधव यांनी महागाई आणि इंधन दरवाढ विरोधात आंदोलन केलं. यावेळी तहसीलदाराला एर निवेदन देण्यात आलं.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात राष्ट्रवादी महिला
कॉंग्रेसच्यावतीनं इंधन आणि गॅस दरवाढ, महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नंदा राठोड, संगीता कडेकर, सुमित्रा लझडे, रेखा
आवटे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं काल ५० पोती गुटखा जप्त करण्यात आला.
गुटख्यांनी भरलेला कंटेनर कर्नाटकातून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही
कारवाई केली. गुटखा आणि कंटेनरसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करत, पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं कोरोना विषाणूवर मात केलेल्या रुग्णाची
पेढेतुला करण्याचा अनोखा उपक्रम करण्यात आला. बाळसाहेब म्हस्के या रुग्णाची आमदार
राजु नवघरे यांच्यासह गावकऱ्यांच्या उपस्थितीत तुला करण्यात आली.
****
हवामान
राज्यात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुण्याच्या हवामान विभागानं
वर्तवली आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
//****************//
No comments:
Post a Comment