▼

Saturday, 21 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज फिट इंडिया फ्रिडम रनचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशातल्या तरुणाईला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देण्यासाठी, देशातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ७५ ठिकाणी, फिट इंडिया फ्रिडम रन घेण्यात आली. नेहरु युवा केंद्राच्या वतीनं आज औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत, या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

भंडारा इथंही महात्मा गांधी चौकात फिट इंडिया फ्रीडम रन घेण्यात आली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या दौडला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम स्थळी देशाच्या स्वातंत्र्यावर एक पथनाट्य सादर करण्यात आलं. या दौडमध्ये जवळपास दीडशे तरुण सहभागी झाले होते.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेनं ५७ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात ३६ लाख ३६ हजाराहून अधिक नागरीकांना लस देण्यात आली. आतापर्यंत या लसीच्या ५७ कोटी ६१ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ३४ हजार ४५७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३३ हजार ९६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३६ हजार रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १५ लाखाहून अधिक रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ६१ हजार ३४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविड १९ आजारासाठीच्या झायडस कॅडिला या प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला देशाच्या औषध नियंत्रक महासंचालकांकडून मंजुरी देण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉक्टर रेणू स्वरूप यांनी ही माहिती दिली. झायडस कॅडिला ही जगातील पहिलीच डीएनए आधारित कोविड प्रतिबंधक लस आहे. या लसीच्या तीन मात्रा घ्याव्या लागणार असून, ती १२ वर्षांवरील मुलांनाही देता येऊ शकते. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २८ हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर केलेल्या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या निकालात लसीचा प्रभाव दिसून आला.

****

पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात आज दुर्गम, जोखमग्रस्त आणि आदिवासी पाड्यां मध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाकडून महानगरपालिकेला १४ हजार कोविशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले असून, महानगरपालिकेच्या २२ केंद्रांवर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत हे लसीकरण करण्यात येत आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपोराच्या नागबेरन वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले. आज पहाटे सुरक्षा बलांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली.

****

देशात आगामी तीन वर्षांच्या कालावधीत हातमाग उत्पादन दुप्पट आणि उत्पादनांची निर्यात चौपट करण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील सेठी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत महाराष्ट्रातले शेफाली वैद्य, अनघा घैसास, सुनील अलग या सदस्यांचा समावेश आहे. विणकरांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं हातमाग उत्पादन दुप्पट करण्यासाठी आणि उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरणात्मक चौकट सुचवण्याचं काम ही समिती करणार आहे.

****

आगामी काळात भारतीय प्रशासकीय, पोलीस, महसूल सेवा यासारख्या भारतीय सेवांमध्ये महिलांचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक असेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांना काल राज्यपालांच्या हस्ते 'स्त्री शक्ती सन्मान' प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मराठी तसंच अर्थविषयक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला लिखाण करताना दिसतात, ही आपल्याकरता सुखद बाब असल्याचं राज्यपाल म्हणाले.

****

धुळे  जिल्ह्यात मुंबई- आग्रा महामार्गावर कार पलटून झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. आज पहाटे बाभळे शिवारात हा अपघात झाला. मृत आणि जखमी तरुण हे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातले रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर धुळ्याच्या हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

****

संत वचनांच्या आधाराने एकल पायवाटेवरून चालणं सोपं झालं, असं ज्येष्ठ लेखिका डॉ मंगला वैष्णव यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं डॉ वैष्णव यांच्या 'एकल पायवाट' या आत्मकथनपर पुस्तकाचं प्रकाशन डॉ. अर्चना मोहगांवकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. संत साहित्याच्या अभ्यासक असलेल्या डॉ वैष्णव यांचं हे ४५ वं पुस्तक आहे.  समाजातले कटू अनुभव कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन, डॉ मोहगांवकर यांनी यावेळी केलं.

****

No comments:

Post a Comment